कारकून -  रामजी, तुझ्यासाठी मात्र मी मालकाजवळ जीव तोडतोडून सांगावं, आणि तुझ्याजवळ मी ही गाय - फुकट नव्हे, - विकत मागतों, आणि ती तूं मला देऊं नये ? रामजी, जग हें असं कृतघ्नच आहे. उद्यां मालकानं जप्ती आणली व पै किंमतीनं गाय हांकलीत नेंली, तरी तें चालेल नाहीं ? अरें, विचार कर, गाय ती काय आणि त्याचा केवढा मोठा प्रश्र तुला पडला आहे ?

रामजी -  न्या तर तिला !

कारकून -  मी जरा तिला पहून येतों. (जातों.)

रामजी -  काय बोलावं; अन् काय करावं ! सगुणा गेली, कपिला चालली. या कर्जापायीं काय काय संकटं व प्रसंग येणार कुणाला माहीत ? कर्ज म्हणजे जिवंतपणींचा नरक ! भोंव-यांत सांपडलेला मनुष्य जसा बाहेर येऊं शकत नाहीं, त्याप्रमाणें मनुष्य एकदां का कर्जात बुडाला कीं, वर मान होणं अशक्य ! त्याचं सर्वस्वीं वाटोळंच व्हायचं ! (कारकून येतो.)

कारकून -  रामजी, बरी आहे गाय. मला एक गडी दे बघून. म्हणजे बरोबरच घेऊन जातों. मी त्या शेजारच्या घरीं आहें. गडी मिळाला म्हणजे सांग. (जातो.)

रामजी -  देवा ! काय रे ही दशा आणलीस ? उद्यां पोरांनी दुधाचा थेंब मागितला तर काय देऊं ? त्यांच्या औषधपाण्याला दूध लागलं तर कुठून आणूं ? गाय विकली, हें ऐकून पोरें रडतील, बायको शिव्या देईल कर्जबाजारी मनुष्याला बाहेर शिव्या; घरांत शिव्या सर्वत्रा शिव्या आणि अपमान ! नको हें कर्ज. आज तीन वर्षे, देवा, पाऊस पाडतास, शेतभात पिकवतास तर नसते रे असे दिवस आहे ! पण आतां रडून काय करणार ? रावसाहेबांस गडी पाहून द्यायचा आहे. (विश्वास येतो.)

विश्वास
-  बाबा, तुम्हीं गाय विकली का हो ? मला विका ना बाबा, पण गाय नका विकूं. आई रडते आहे हो !

पद ( चाल ------- पांडवा)
गाय जातां जाइ सारें । राहि जातां काय बोला ॥
दूध जाई, वासरुंही । काय शोभा या गृहाला ॥ ध्रु०॥
आजचाही लाभ गेला । पुढिल आशासिंधु गेला, ।
वैभवांच्या निर्झरांचा । गाय जातां नाश झाला ॥ १॥


बाबा, गाय दिली ना हो ! (रामजी जातो, विश्राम त्याला धरून रडत जातो.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel