गोपाळ -  अरे, महारांना शिवून नरकांत पडशील.

नारायण -  अनाथ मनुष्यास मदत केल्यानं जर मला नरकप्रात्ति होत असेल तर तो नरकच मला नंदनवनाप्रमाणे आहे, समजलांत ?

लक्ष्मीधरपंत -  काटर्या, ते सांगतात तें खोट आणि तुला वाटतं तेवढं खरं ! तूं का मोठा शंकराचार्य झालास ? का मोठा धर्मसंस्थापक झालास ?

नारायण -  बाबा, मानवजातीचा मी एक नम्र सेवक आहें. बाबा, मनांत सद्विचार येणं व सदाचार हातून होणं म्हणजेच स्वर्ग ! मनांत वाईट विचार येणं व वाईट कृत्यं हातून होणं म्हणजे नरक ! मला हेच स्वर्ग नरक माहीत आहेत. महाराला मदत करणं मी सदाचार समजतों.

लक्ष्मीधरपंत - त्यांना शिवणं हा सुध्दां ?

नारायण -  होय, त्यांना शिवणं हा सुध्दां ! तुम्हांला मांजर, पोपट, कुत्रं हीं चालतात आणि चौ-यायशीं लक्ष योनींनंतर जन्म घेतलेला मनुष्य मात्र चालत नाहीं ! बाबा, अस्पृश्यांनीं पांडवप्रमापाची मिरवणूक काढली, म्हणून अस्पृश्यांवर हल्ले करून पांवप्रताव जाळणारे स्पृश्य हे का स्वर्गाचे धनी होतील ? पांडवप्रताप जाळून मिळणारा स्वर्ग खात्रीनं निराळाच असला पाहिजे. ज्या स्पृश्यांनीं श्रीकृष्ण परमात्म्याला पांडवप्रताव - रूपानं जाळला, त्या स्पृश्यांत माझा जन्म न होता तरी बरं झालं असतं.

लक्ष्मीधरपंत - बापाच्या घरीं खायला मिळत आहे म्हणूनच या लंब्या गप्पा १ पैसे उधळावयास आहेत, म्हणूनच परोपकार आठवत आहेत. घरांतून घालवून देतों म्हणजे समजेल महारामांगांवर उपकार कसे करावे तें.

नारायण -  बाबा, पैशाच्या मदतीपेक्षां सहानुभूतीनं व प्रेमानं ओथंबलेला एक शब्द हाच जास्त श्रेष्ठ आहे. माझ्याजवळ पैसे नसले तरी गोड शब्द आहेत. त्या शब्दांनीं मी गोरगरिबांस धीर देईल. मी धट्टा कट्टा आहें; मोलमजुरी करीन, स्वत:चें पोट भरीन, आणि माझ्या अस्पृश्य बंधूंस हातभार लावीन. फक्त तुमचा आशीर्वाद मात्र असावा.

लक्ष्मीधरपंत - जा तर, चालता हो. माझ्या घरांत पुनश्च हें काळं तोंड दाखवूं नकोस. शबरदार या घराची पायरी चढलास तर ! एक सुतळीचा तोंडाहि या घरांतून तुला मिळणार नाही.

नारायण -  बरं आहे. तुमच्या मालमत्तेची मीं कधींच आशा केली नव्हती हजारों गोरगरिबांना पिळून मिळवलेली ही तुमची मालमत्ता माझ्या हातांत येती, तर मी ती सर्वच्या सर्व गरिबांच्या- दरिद्रीनारायणाच्या सेवेस सादर केली असती.

लक्ष्मीधरपंत -  म्हणे गरिबांच्या सेवेस दिली असती ! लाज नाही वाटत बोलायला ? मला पैसे मिळवावयास काय श्रम पडले आहेत, ते माझें मला माहीत ! तुला गाढवाला काय त्याचं ? रात्रंदिवस खटाटोपी केल्या, कोर्ट - दरबार केले, तेव्हां कुठं आज सुखाचा घांस मिळतो आहे. खरं की नाहीं, रामराव ?

राम -  यांत काय संशय ! अहो, आम्ही तें सारं पाहातच आहों. एक पैसा दृष्टींस पडणं म्हणजे कोण कष्ट पडतात ! '' जावं त्याच्या वंशा, तेव्हां कळे. '' नारायणा, ऐक बाबा, असा हट्टाला पेटूं नकोस. वडीधा-या माणसांचं ऐकणं त्यांतच खरं कल्याण आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel