प्रवेश तेरावा
(दिवाणखाना, लक्ष्मीधरपंत सर्चित बसले आहेत.)
लक्ष्मी - त्या दिवशीं नारायणास लाथ मारून घालवलें; परंतु काय असेल तें असो, मन आंतल्या आंत खात आहे. मी जर खरा धार्मिक असतों, तर माझं मन शांतिहीनन कां बरं झालं असतं ? निरपराधी माणसाजवळच सुख व शांति नांदतात. आणि खरें पाहूं जातां, नारायण करतो तें सनातनी वैष्णवधर्मीत आहेच; पण रूढीचा पीळ उलगडत नाहीं. काय करावं ? काल रात्रीचं काय भयंकर स्वप्न ! ' माझ्या नारायणाच्या डोक्यांत कु-हाड घालणारा तो भयंकर काळपुरूष ! परंतु त्या दुस-या मालाधारी शुभ्रवर्ण पुरूषानं त्याचा हात पकडला ! ' काय या स्वप्नाचा अर्थ ? माझा नारायण तरी सुरक्षित आहे ना ? खोटया समजुतीचा भरीस पडून मीं त्यास घालविलं. तो जातांना वंदन करावयास आला तर त्याला लाथ हाणली ! अरेरे ! देवा, माझा नारायण पुन्हां येऊं दे रे ! मी त्याचं कोमल मन दुखवणार नाहीं. आतां कधीं ! त्याची आई स्वर्गातून मला दोष देत असेल.
(पडद्यांत ' अहो लक्ष्मीधरपंत, अहो लक्ष्मीधरपंत ' अश हांका ऐकूं येतात.)
लक्ष्मीधरपंत - या हो या,कोण ? वासुदेवराव ?
वासुदेवराव - (प्रवेश करून ) अहो लक्ष्मीधरपंत, तुम्हाला अजून कळलं नाहीं का हो ? वार्ता बरी नहीं तुमचा मुलगा नारायण परवां रात्रीं रस्त्यांत घेरी येऊन पउलेला आढळला. त्याला भयंकर तापही येत आहे.
लक्ष्मीधरपंत - कोण ! माझा नारायण ? त्याला ताप आला ? काय, तो रस्त्यांत पडला ? अरेरे ! कुठं आहे तो ?
वासुदेवराव - असे घाबरूं नका. त्याची सर्व व्यवस्था झाली आहे. रस्त्यांतून एक बालवीर चालला होता. त्याला तो आढळला. त्यानं शिटी फुंकली व इतर बालवीर जमा झाले; आणि त्यांनीं त्यास उचलून स्वत:च्या संघमंदिरात नेलें. सध्यां तो तिथंच आहे. त्याचे शिक्षक व डॉक्टर यांनीं त्याची नीट शुश्रूषा चालवली आहे. तुम्हांस बालवीर -शिक्षक सांगावयास कसें आले नाहीत ? ते तर खास यावयाचे !
लक्ष्मीधरपंत - मी त्यांना पूर्वी टाकून बोललों होतों; म्हणून ते रागावले असतील ?
वासुदेवराव - छे: ! बालवीर-शिक्षक हे कधीं रागबीग मनांत धरीत नाहीत ! ते एवढया तेवढयावरून राग मनांत धरतील तर बालवीरांचे गुरूच शोभर नाहींत ! मनांत अढी धरून बसेल तो बालवीर कसला ?
लक्ष्मीधरपंत - वासुदेवराव ! मला धीर धरवत नाहीं. केव्हां एकदां डोळयानीं नारायणास पाहीन, असं झालं आहे. पूर्वीचा माझा त्याच्यवरील राग सर्व मावळला. वासुदेवराव, माझा नारायण हाच आमच्या घरचा आधार ! आमचा तारक ! माझा मार्गदर्शक आहे. चला, येतां माझ्याबरोबर ? आपणच त्याच्या शिक्षकाकडे जाऊ. माझे अहंकाराचे डोंगर वितळून सपाट झाले ? त्यांची ह्रदयांत कारूण्याची गंगा वाहूं लागली आहे. वासुदेवराव, चला !