लक्ष्मीधरपंत - मग मीहि इथंच राहात जाईन. माझं बाळ आतां क्षणभरहि डोळयांआड झालेलं मला खपणार नाहीं. मी माझ्या नारायणाला आतां इतरांवर विसंबणार नाहीं हो ! तुम्ही मला कृपा करून इथं राहण्याची मात्र परवानगी द्या. मी तुम्हांला जागा दिली नाहीं, पण मला द्या.
बा. शि. - मोठया आनंदानं रहा. तुमच्या मदतीस दोन बालवीर राहतील.
राघू - मी सारखा आहेंच.
लक्ष्मीधरपंत - रहा बरं. तूं माझा दुसरा मुलगा आहेस, असें मी समजतों. मास्तर, तुमचा मी आभारी आहे.
बा. शि. - आभार कसचे मानतां ? एकमेकांना शक्य तें साहाय्य करणं हें प्रत्येक सुजाण मनुष्याच कर्तवयच आहे. बरं तर, मी आतां जातों. राघू, तूं औषध घेऊन ये जा.
(जातात. एकटे लक्ष्मीधरपंत आहेत.)
लक्ष्मीधरपंत - देवा, माझ्या बाळास लौकर आराम पाड बरें ! रामराया, तुझ्या उत्सवांत मी चौघडा लावीन, तुला मुकुट करीन. नारायणा बाळ, कां रं डोळे उघडून तूं मजकडे प्रेमानें पाहात नाहींस ? माझ्याशीं बोलत नाहींस ? तुझ्या पापी पित्याची तुला लाज वाटते का ? मी तुझें तोंड पाहणार नव्हतों, आतां तूं माझें तोंड न पाहण्याची प्रतिज्ञा केली आहेत वाटतं ! तुझं फुलांसारखं ह्रदय आज कठोर कां बरं झालं ! दीनदयाळा, देवाधिदेवा, तुला मी अनन्य शरण आहें.
पद. (चाल - धांवरे रामराया)
प्रार्थना देवा तूंसी । दीन झालेल्या माझी ।
प्रेमाच्या लहरींतूनी । येवो तुझ्या पदाशीं ॥ ध्रृ० ॥
पापांच्या केल्या राशी । सा-या जाळावयासी ।
ओलीस बाळा घेसी । झालों कारण मी त्यासीं ॥ १ ॥
सौदा हा याच्यासाठीं । झालों अतीच मी कष्टी ।
नको तूं अंत पाहूं । सिध्द प्रायश्रित्तासी ॥ २ ॥
नारायणा, बाळ डोळे उघडून माझ्याकडे बघ. मी अंत:शुध्दीप्रत पोहोंचलेला तुझा पिता आहें.
अहंकार गेला-मेला । केला षडरीचाही मेळा ।
यावया पुण्यराशी । देवा, झालो संन्यासी ॥ ३ ॥
देवा, माझा नारायण मला दे, मी गोरगरीब ऋणकोंच्या अंतरात्म्यांना ऋणमुक्तींनें आनंदित करून तुझी प्रथम सेवा करीन ! तसेंच -----
लाभल्या दौलतीला । मी न म्हणेन माझी ।
जगवितां बाळ माझा । दैइन जनताहितासी ।
नारायणा, तुझ्या भक्ताच्या इच्छेस - या नारायणाच्या इच्छेस मी मान देईन !
नको तूं ओढूं भारी । निवळलों मी संसारी ।
झडपीतां बाळ माझा । झालोंची मी वनवासी ॥ ५ ॥
यातूनी उद्वराया । तूजवीना न कोणी ।
धरीले मी पाय तुझे । तारीं शरणागतासी ॥ ६ ॥
(पडदा पडतो.)