प्रवेश सतरावा
(लक्ष्मीधरपंताचा वाडा. सर्व मंडळी बसली आहेत. राघू दूर उभा राहून बोलत आहे.)

राघू -  हे समाजनारायणा ! आमच्यावर जुलूम करून आम्हांस कोणी दूर ठेवलं नाहीं ! गलिच्छ कामं समाजसेवेकरतां केली व आम्हींच दूर राहिलों, त्यांत इतरही न संस्कारलयामुळें बहिष्कृत झालेले लोक मिळत गेले ! त्यामुळें दूर राहण्यास अधिक कडकपणा आला. आतां हें समाज नारायणा, अस्पृश्याची सविनय प्रार्थना आहे.

(अभंग)
दूरावतां दूरावलो । तुझ्या पायां अंतरलों ॥
हें मी सांगायासी भ्यालों । म्हणुनि पारखा रे झालों ।
मी तर तुझेंच लेंकरूं । नको मला बा धि:कारूं ॥
माझें काय सारें तुझें । आस मला म्हण माझें ॥
जाति युगें जशिं आलीं । एकनिष्ठा नाहीं गेली ॥
उष्टयावर जगलेला । प्रसादाचा देह झाला॥
प्रसादाच्या अभिमानें ।  देवा, आम्हां उद्दारणें ॥

नारायणा, काळ सारखा या अस्पृश्य जातीचे लचके तोडीत आहे. बेवारशी माल पाहून त्याला सारखा जोर येत आहे !

काळ ग्रासायासी येई । राखणारां तूंच पाहीं ॥
तूं रे राजा तालेवार । शत्रू लुटितों तूझा कर॥
शह द्यावयासी त्याला । माझें तूं रे म्हणा मला ॥
तूं जर केला माझा त्याग । त्याचा होइन भक्ष्मभाग ॥
पायीं तूझ्या ज्याचा माथा। हाणूं नको तया लाथा ॥
आस-यावीण हा पोरका । करूणाकरा ध्यानीं न का ॥

नारायणा, तुझ्या स्पर्शानं अस्पृश्य जात उध्दरून जावयास पाहिजे; तूं भ्रष्ट कसा होशील, तूं पुण्यवान् आहेस !

लक्ष्मीधरपंत
-  हें अस्पृश्याचें मुख्य झालेल्या राघू, ये, ये ! गेली, गेली अस्पृश्यता ! माझ्या गांवांतून ती ठार मेली ! राघू, पांडबा, या असे बैठकीवर या ! माझ्या घरांत वावरा. आम्हीं आजपर्यंत केलेल्या चुकीचं परिमार्जन करणं अवश्य आहे. जा. तुमच्या इतर मानीय अस्पृश्यांनाही घेऊन जा. त्यांना मी माझ्या देवघरापर्यत हिंडवीन ! त्यांच्या बायकांना घरांतून माझ्या मुलीबाळींकडून हळदीकूंकू देववीन ! मंडळी, आपणहि अस्पृश्यता घालविली पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel