प्रवेश सातवा

(लक्ष्मीधरपंत व नारायण)

लक्ष्मीधरपंत -  नारायणा, खरं सांग, गांवांत तुझ्याबद्दल लोक जे बोलतात, त्यांत सत्याचा कितपत अंश आहे तें.

नारायण -  काय म्हणताता लोक ? बाबा, तुमचा मुलगा देवास न आवडणारी गोष्ट कधींच करणार नाहीं.

लक्ष्मीधरपंत -  तशी माझी खात्री होतीच ! तूं माझ्या मर्जीविरूध्द कधीं वागावयाचा नाहीस, हें पण मला माहित होतं. हें बघ, खरं सांग; तूं त्या महारवाडयांत अलीकडे जातोस व कुणा महाराच्या घरी तास तास बसतोस खरं का ?

नारायण -  बाबा, माझ्याच्यानं खोटं बोलवत नाही. महारवाडयांत तो पांडू महार आहे ना, त्याचा एकूलता एक मुलगा राघू फार आजारी आहे. त्या अडाण गरीब पांडून त्याची नीट शुश्रूषा ठेवतां येईना, त्याला थर्मामीटर लावतां येईना, बेडपॅनही देतां येईना ! 'आमच्या बाळाला शीतळ वारा '  असलीं गाणी म्हणून मुलाला शीतळ वाटेल, असल्या त्याच्या कल्पना ! म्हणून बाबा, मी त्याच्या मदतीला जातों. त्या डॉक्टरांना मीच घेऊन गेलों होतों. प्रथम ते येत नव्हते, पण मग आले एकदाचे !

लक्ष्मीधरपंत -  नारायण, हें तूं चांगलं केलं नाहींस. माझं नांव सर्व स्पृश्यवर्गात बद्दद्न होत आहे. आज एके ठिकाणी गेलों; तेथील लाक मला लागेल असं उपरोधिक बोलूं लागले. मला प्रथम तें समजेना, पण पुढं कळलं. नारायणा, तुझ्या पित्याची अब्रू तुझ्या हातांत आहे. मला गांवांत तोंड बाहेर काढावयास जागा नाही. तूं उद्यांपासून त्या पांडूनकडे जाऊं नको. झाल्या गोष्टीबद्दल मुकटयानं प्रायश्चित घे. ऐकलंस ?

नारायण -  बाबा, वाईट गोष्ट हातून घडली तर प्रायश्चित घ्यावं. मी खरोखर वाईट का कांहीं केलं आहे ? भूतदया ही परमेश्वराला प्रिय नाहीं का ? भत्त्किविजयांत मीं एकनाथांची कथा लहानपणीं वाचली होती. त्यांनीं अत्यंजाचं मूल पोटाशीं धरलं. बाबा, ती गोष्ट काय शिकविते ? जें वाचायचं, तें प्रसंगविशेषीं आचारांत जर आणायचं नाहीं तर त्या शिकण्यावाचण्याचा उपयोग तरी काय ? मी वैष्णवांचाच मार्ग आचरीत आहें.

लक्ष्मीधरपंत -  (जरा रागावून) तूं मला शास्त्रार्थ नको शिकवायला ! लहान तोंडी मोठा घांस केव्हांपासून घेऊन लागलास ? मोठीं माणसं सांगतात तें काय खोटं ?

नारायण -  बाबा, एकनाथ, तुकाराम, विवेकानंद, श्रध्दानंद, महात्मा गांधी हे सारे मोठेच ना ? का या गांवांतील लोक तेवढेच मोठे ?

लक्ष्मीधरपंत - कारटया ! (इतक्यांत खंडेराव, रामराव, माधवराव, गोपाळराव येतात.) या बसा. काय करूं हो ! या पोराची समजूत कांहीं केल्या पटत नाहीं. तुम्ही तरी रामराव, सांगा दोन गोष्टी. वळला तर वळला.

राम -  नारायणा, तुला आम्ही इतके दिवस फार चांगला समजत होतों. अरे, पितृमुखाला काळिमा नको लावूं ! '' पितृदेवो भव '' अशी श्रुतींची आज्ञा आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel