बा.शि. -  मी इकडेच नारायणाची प्रकृति पहावयास येत होतों, तोंच वाटेंत हा राघू भेटला.

लक्ष्मीधरपंत -  मास्तर, मी आज तुम्हांस मुद्याम बोलावणं धाडलं. माझ्या नारायणाची प्रकृति तुम्हां सर्वाच्या सदिच्छेनें व देवाच्या दयेनें आतां सुधारली आहे. नारायणाचा दैहिक पुनर्जन्म झाला व माझा आंतरिक पुनर्जन्म झाला ! मास्तर, पांडबा, परमेश्वरास साक्ष ठेवून नारायणाच्यादुखण्यांत मी केलेल्या प्रतिज्ञांना आज प्रात्यक्षिक स्वरूप देणार आहे. त्या करतांच तुम्हांस बोलाविलें. आजपासून माझी सारी धनदौलत मी दरिद्रीनारायणांसाठीं खर्च करीन. मास्तर, तुम्ही व तुमचे बालवीर फार चांगल काम चालवीत आहांत अशी माझी खात्री झाली. त्या कामाला भरपूर जागा असावी म्हणून माझा बंगला असलेला मळा मी तुम्हांस देऊन टाकतों. नारायणाची रात्रीची शाळा चालावी, म्हणून गांवांतील बंगला देतों. माझीं सारीं घरं तुमचींच आहेत. देशांतील माणसं हीच माझी खरी संपत्ति !  ही संपत्ति उदार ह्रदयावर वृध्दिंगत होते, याची जागृति मला झाली, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतों.

बा.शि. -  आम्ही आपले आभारी आहोंत. तुमच्या या रूपांतरास कारण जसा नारायण, तसेंच त्यानें आम्हालाहि स्फूर्ति दिली. पहिली ज्योत त्यानं पेटवली. नारायणाप्रमाणं सर्व जर वागूं लागतील, तर समाजांतील दु:ख व कलह किती कमी होतील ! जगांत पैशाच्या अभावापेक्षां सहानुभूति व प्रेम यांचा अभाव फार जाणवतो.

नारायण -  खरं बोललांत, मास्तर. आम्ही पैशानं गरीब झालों तरी मनानं सारे श्रीमंत होऊं या ! देवाचीं लेंकरं आहोंत म्हणून भावंडासारखें वागूं या.

पांडबा -  गोड बोलण्यानं कांहीं बेंचत नहीं.

राघू -  म्हणून तर राघूला लोक जवळ करतात, पण कावळयाला खडे मारतात.

रामजी -  बरें, दयालोभ असूं द्या ! जातों आम्ही ! रामराम !

विश्राम -  जातों मी ! रामराम !

बा.शि. - बरें येतों. आनंद झाला.

लक्ष्मीधरपंत
-  बरं आहे, जावें !
(जातात, पडदा.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel