नारायण - मोठया माणसांचं ऐकावं, पित्राशा मोडूं नये, हें सारं मला समजतं; परंतु मोठी माणसंसुध्दा चुकण्याचा संभव नसतो का ? भीष्मांनीं परशुरामाचं थोडचं ऐकलं ? जी वडील माणसं वाईट करावयास सांगतील त्यांना वामन पंडित पापतरू म्हणतात. मुलांना उध्दटपणा शिकविणारे आईबाप, मुलाला देवापासून, धर्मापासून, स्वर्गापाहून दूर नेत आहेत, अस तुम्हांस वाटत ? बाबांचे पाय मला सदैव पूज्य आहेत, त्यांचे अनुदार विचार मात्र मला पूज्य नाहींत.
लक्ष्मीधरपंत - कारटया, मला दोष देणा-या महामूर्खा, चालता हो माझ्या घरांतून ! नीच, तुझा माझा संबंध आजपासून तुटला !
माधव - नारायणा, असं अविचारी वर्तन करूं नकोस. ऐक, तुझ्या पित्याचं ऐक. घरांत एवढी संपत्ति, हीं प्रेमाची माणसं, हें तुला इतरत्र कुठं मिळणार ? रोज तुला भीक मागावी लागेल समजलास ? दुपारच्या वेळी पोटांत घांस गेला नाहीं, म्हणजे पंचप्राण कंठांत गोळा होतील व मग घरच्या मायेच्या माणसांची तुला आठवण येईल. भणंगभिका-याप्रमाणं तुला दिवस काढावे लागतील, अब्रू गमावून बसावं लागेल.
नारायण - गरीब माणसास अब्रूच नसते जणूं ! मला गरिबींत, हालअपेष्ठीत दिवस काढण्यांत कांहींच वाईट वाटणार नाहीं. दुस-याच्या उपयोगी पडावं, दीनदुबळयांची सेवा करून त्यांचं दैन्य दूर करण्याचं सत्कार्य सर्दव माझ्या हातून घडावं, हीच एकमेव इच्छा रात्रंदिवस माझ्या मनांत बसत आहे. या घरांत गादीवर लोळणं म्हणजे मला निखा-यावर भाजून निघाल्याप्रमाणं वाटतं. ज्या संपत्तीचा एवढा मोह तुम्ही सारे मला घालतां, ती संपत्ति मला काय कामाची ! म्हणे घरी सुख आहे. खरोखर घरीं रोजचा हा सुखाचा गोड घांस खातांना माझे डोळें शतदां भरून येतात ! गळा दाटून येतो. याला ह्रदयस्थ परमेश्वरच साक्ष ! बाबा, मी बोलूं नये पण बोलतो. तुम्ही हा जमीनजुमला, ही मालमत्ता कशी मिळविली याचा काळाकुट्ट इतिहास सा-या जगास माहीत आहे. तुम्ही हजारों गोरगरिबांना व्याजानं पिळून काढलं; ख-याचं खोटं केलं; शंभराचे हजार केले; जप्त्या आणाल्या; गुरंढोरं पै किंमतीनं लिलावांत विकली. बाबा, तुमची ही संपत्ति म्हणजे परक्यांच्या ह्रदयाची पेटलेली होळी आहे. या संपत्तींत अनेक बायाबापडयांचे हुंदके, अनेकांचं कढत दीर्घ सुस्कारे, मला ऐकूं येत आहेत. नको, ही आसुरी संपत्ति मला नको ! बाबा, हा मी तुमच्या घरांतून निघालों. तुमच्या दृष्टीनं चुकणारा; परंतु मनुष्याच्या, माणुसकीच्या दृष्टीनं न चुकणारा, हा तुमचा पोटचागरीब मुलगा गृहत्यागापूर्वी तुम्हांला वंदन करीत आहे. (नमस्कार.)
लक्ष्मीधरपंत - (लाथ मारून) हरामखोर ! बापास शिव्याशाप देऊन त्याचा उध्दार करून, पुन्हा साळसूदपणाचा आव आणतोस ! तुझं भाषण म्हणजे माझ्या जखमेवर मीठ आहे; ढोंगी ! (नारायण जातो.)
सर्व - अहो, हें काय पंत ! राग आवरा ! नारायणा, अरे नारायणा !
लक्ष्मीधरपंत - जाऊं दे काटर्याला ! चांभाराच्या देवाला अशीच खेटराची पूजा पाहिजे.