एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य होता. त्याला दोन बायका होत्या. एक होती आवडती व एक होती नावडती. जी नावडती होती ती दिसायला चांगली नव्हती. तिला फार कष्ट पडत. कोंबडा आवरल्यापासून ती कामाला लागे. ती दिवसभर सारखे काम करी. विहिरीचे पाणी तीच भरी. नदीवर धुण्याची मोट घेऊन तीच जाई. गुराढोरांचे तीच करी. दळणकांडण तीच करी. खटाळभर खरकटी भांडी तीच घाशी. झाडलोट, सडा-सारवण, दिवाबत्ती, सारे तीच करी. क्षणाचीही तिला विश्रांती नसे. इतके काम करूनही तिच्याजवळ कोणी गोड बोलत नसे. तिला गोड घास मिळत नसे. तिच्या वाटयाला रोज उठून शिळवड असायची. नेसू फाटके जुनेर असायचे. निजायला फटकुर मिळायचे. तिच्या अंगाखांद्यावर मणीमगळसूत्राशिवाय काही नव्हते. हातात नीटसा बिल्वरही नव्हता. दागदागिन्यांचे एक असो मेले. त्याच्यावाचून माणसाचे अडत नाही; परंतु फुकाचा गोड शब्द, तोही महाग असावा? परंतु या जगात गोड बोलण्याचाही पुष्कळदा दुष्काळच असतो.

नावडतीची सवत तिला चारचौघांदेखत घालूनपाडून बोलायची. सर्वांच्यादेखत अपमान करायची. चारचौघांत अपमान होण्यापेक्षा मरण बरे असे माणसास वाटते. नावडती मनात म्हणे, 'मेलं मर मर मरावं, उरापोटी काम करावे; परंतु त्याचं चीज नाही. शिव्या, शाप व निंदो. अपमान यांची वर बक्षिशी'' मनुष्य कामाला कंटाळत नाही. 'दमलास हो' असे गोड शब्द त्याच्या जवळ बोला की त्याचा थकवा दूर जातो. मनुष्य प्रेमाचा भुकेलेला आहे. नावडतीला या जगात प्रेम मिळेना. ज्याला सहानुभूती मिळत नाही, प्रेम मिळत नाही, त्याच्याहून अधिक अभागी व दु:खी दुसरे कोण आहे?

मनुष्याच्या सोशिकपणालाही काही मर्यादा आहे. अधिक ताणल्याने तुटते. नावडती एक दिवस वैतागली. ती जिवाला कंटाळली. देव निष्ठुर आहे असे तिला वाटले. कशाला या जगात राहा, असे मनात म्हणून ती बाहेर पडली. त्या जिवंत नरकातून, त्या कोंडवाडयातून ती बाहेर पडली. बाहेर बरीच रात्र झाली होती. सर्वत्र सामसूम होते. दूर काही कुत्री भुंकत होती. कोल्हयांची हुकीहुकी मधून मधून ऐकू येत होती. एखाद्या पक्ष्याचे मध्येच दीनवाणे ओरडणे कानावर येई. आकाशात चंद्र नव्हता. कृष्णपक्ष होता. बाहेर अंधार होता. तार्‍यांचा काय प्रकाश मिळेल तो खरा.

ती नावडती चालली. एकटी चालली. तिचे दु:ख तिच्याबरोबर होते. तिचे अश्रू तिच्याबरोबर होते. तिच्या पायांत काही नव्हते. रस्ता दिसत नव्हता. काटे बोचत होते, दगड टुपत होते, परंतु सवतीने दिलेल्या शिव्याशापांपेक्षा त्या काटयांचे बोचणे, त्या दगडाधोंडयांचे टुपणे अधिक दु:खदायी नव्हते. ठेचाळत, अडखळत ती जात होती.

आत रात्र संपत आली. झुंजमुंज झाले. दंवबिंदू टपटप पडत होते. ते का नावडतीसाठी रडत होते? झाडांवर बसल्या बसल्या पाखरांची किलबिल सुरू झाली. झाडांच्या आकृत्या हळूहळू स्पष्ट दिसू लागल्या. दिशा फांकू लागल्या. प्रकाश पसरू लागला; परंतु नावडतीच्या मनात अंधारच होता. जग जागे होत होते. नावडती कायमचीच झोपायला जात होती.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel