भिकंभट म्हणाले, 'कशी छान बोलतेस? तू पुराणिकबाई का नाही होत? माझे मुलाबाळांचे पोट तरी भरेल.
सावित्रीबाई म्हणाली, घरचे पुराण संपून वेळ असेल तेव्हा की नाही?'
भिकंभट म्हणाले, 'बरे, ते राहू दे. अग हे मडके आहे ना, ते मंतरलेले मडके आहे. याच्यातून डाळेमुरमुरे बाहेर पडतात. सारखी अखंड धार सुरू होते. आपण दुकान घालू. श्रीमंत होऊ. मग तुला सोन्यामोत्यांनी नुसती मढवीन.'
सावित्रीबाई हसून म्हणाली, 'मडक्यातून का कोठे डाळेमुरमुरे बाहेर पडतात? वेड लागले तुम्हाला.'
भिकंभट म्हणाले, 'तुला प्रत्यक्षच दाखवतो. तू पोती आण भरायला. 'असे म्हणून ते ते मडके हलवू लागले. 'पड पड' म्हणून हलवू लागले; परंतु एक दाणा पडेल तर शपथ!
'आता किती वेळ ते मडके हलवीत घुमणार? ठेवा खाली. दमलेत, घामाघूम झालेत. 'सावित्रीबाई रागातही हसून म्हणाली.
परंतु भिकंभट हसला नाही. त्या वाण्याने आपणास फसविले असे त्याला वाटले. ते मडके त्याने हातात घेऊन तो तसाच घराबाहेर पडला. सावित्रीबाई रडणार्या मुलांना समजावीत बसली.
अंधारातून भिकंभट जात होता. उजाडते न उजाडते तोच तो वाणीदादाच्या घरासमोर दत्ता म्हणून उभा राहिला. 'वाणीदादा, माझे मडके तुम्ही लांबवलेत. हे नव्हे माझे मडके. तुम्ही अदलाबदल केलीत. होय ना? द्या माझे मडके. 'असे तो ब्राह्मण म्हणाला.
वाणीदादा संतापून भिकंभटाच्या अंगावर धावून गेला. तो रागाने म्हणाला, 'मला काय करायचे तुझे मडके? मला का भीक लागली आहे? मी का चोर आहे? नीघ येथून. नाहीतर थोबाड रंगवीन. नीघ.'
ती बाचाबाची ऐकून शेजारची मंडळीही तेथे आली. त्या सर्वांनी भिकंभटाची हुर्यो केली. त्याला हाकलून लावले. बिचारा भिकंभट पुन्हा रडत निघाला. रानात जाऊन त्या पूर्वीच्याच झाडाखाली रडत बसला.
तिकडून शंकर पार्वती जात होती. त्याचे रडणे त्यांच्या कानी पडले. पार्वती शंकरास म्हणाली, 'देवा, कोणी तरी दु:खीकष्टी प्राणी रडत आहे. चला. आपण पाहू. 'शंकर म्हणाले, 'पुरे झाले तुझे. या जगाला रडण्याशिवाय धंदा नाही व तुला त्याचे रडणे थांबविण्याशिवाय धंदा नाही. या रडारडीला मी तरी कंटाळलो आता आणि आपल्याजवळ तरी असे काय उरले आहे?' पार्वती म्हणाली, 'अजून दोन मडकी शिल्लक आहेत. तोपर्यंत काय द्यायचे ही चिंता नको. चला जाऊ त्या दु:खी प्राण्याकडे.
'ती त्या झाडापाशी आली. तो तोच पूर्वीचा ब्राह्मण. शंकरांनी विचारले, 'का रडतोस, काय झाले?' भिकंभट म्हणाला, 'काय सांगू महाराज? त्या एका वाणीदादाकडे मी मडके ठेवून आंघोळीला गेलो. आंघोळ केल्यावर मडके घेऊन घरी गेलो. 'पड पड' म्हणून मडके हलविले; परंतु एक दाणा पडेल तर शपथ. त्या वाण्याने मडके बदलले असावे अशी शंका येऊन मी त्याच्याकडे गेलो. त्याला विचारले; परंतु तो माझया अंगावर धावून आला. शेजारीपाजारी त्याच्याच बाजूचे. खर्याची दुनिया नाही. मी गरीब, एकटा पडलो. आलो पुन्हा या झाडाखाली व बसलो रडत.'