राजपुत्र म्हणाला,' तो सर्प तर वर मरुन पडला आहे. हा पाहा त्याच्या डोक्यावरचा मणी. 'तुम्हाला भय नको. आमच्याबरोबर चला. 'प्रधानाचा मुलगा म्हणाला, 'राजपुत्रासाठी या माझ्या मित्रासाठी योग्य अशी वधू पाहावयास आम्ही जात होतो. तुम्हीच योग्य दिसता. राजपुत्र तुम्हाला पसंत असेल, तर तुम्हा दोघांचा मी विवाह लावतो.'
ती दोघे लाजली. मुकेपणाने त्यांनी संमती दिली. प्रधानपुत्राने हार तयार केले. त्याने त्यांचा विवाह लावला. राजपुत्र म्हणाला, 'चला, आता घरी जाऊ. 'प्रधानपुत्र म्हणाला, 'आधी मी एकटाच घरी जातो. घराहून लवाजमा घेऊन येतो. हत्ती, घोडे, वाजंत्री घेऊन येतो. राजपुत्राने असे एकटे अनवाणी जाणे बरे नव्हे. ते शोभत नाही राजपुत्राला असे ते म्हणणे पटले. प्रधानपुत्राने जावे असे ठरले. दोघे मित्र हातात मणी घेऊन तळयाच्या बाहेर आले. एकमेकांस सोडताना त्यांना वाईट वाटले. प्रधानपुत्र म्हणाला, 'मी बरोबर एक महिन्याने येथे येईन. त्या दिवशी येथे तू वर ये. मी तुझी वाट पाहीन. तो दिवस विसरु नकोस.'
प्रधानपुत्र निरोप घेऊन गेला. राजपुत्र त्याच्याकडे बराच वेळ पाहात होता. तो दिसेनासा झाल्यावर राजपुत्र पुन्हा खाली गेला. तेथे दोघेजणे राहिली. फळे खावयास भरपूर होती. तेथे कसला तोटा नव्हता. दुपारी फलाहार झाला म्हणजे राजपुत्र थोडी वामकुक्षी करी. त्या मुलीच्या मनात आले की तो मणी हातात घेऊन आपण वर जावे. बाहेरचे जग पाहावे. किती तरी दिवसांत ती पाण्याच्या बाहेर गेली नव्हती. राजपुत्र झोपला होता. ती हळूच निघाली. तिने हातात मणी घेतला. एकदम ती पाण्याच्या वर आली. बाहेरचे आकाश, बाहेरची सृष्टी, पशुपक्षी, गाईगुरे सर्व पाहुन तिला आनंद वाटला. राजपुत्राची उठावयाची वेळ झाली असेल असे मनात येऊन ती पुन्हा खाली गेली. राजपुत्र जागा झाला नव्हता. आपण वर गेलो होतो हे राजपुत्राला कळू नये म्हणून ती जपत होती. राजपुत्र दुपारी झोपला म्हणजे ती वर येई व बाहेरची हवा खाई.
एके दिवशी नेहमीप्रमाणे ती पाण्याच्या वर येत होती, इतक्यात तेथे तिला पुरुषाची चाहूल लागली. जवळच्या राजाचा मुलगा तिथे शिकारीस आला होता. तो राजपुत्र दृष्टीस पडतासच ती मुलगी एकदम पाण्याखाली गेली. तो राजपुत्र तळयाच्या काळीवर येऊन उभा राहिला व सारखा बघत राहिला. पुन्हा ती मुलगी दिसावी म्हणून तो वाट पाहात होता. परंतु कोणी दिसले नाही. राजपुत्राच्या बरोबरचे शिपाई तेथे आले व म्हणाले, 'महाराज, आता घरी चलावे, राजेसाहेब वाट पाहात असतील. 'परंतु राजपुत्र काही बोलेना, जागचा हलेना. त्या शिपायांना काय करावे ते कळेना तो राजपुत्र म्हणाला, 'आता दिसली, नाहीशी झाली; त्याच्या म्हणण्याचा अर्थ त्या शिपायांस समजेना. कोणी म्हणाला, 'यांना पिशाच्चबाधा झाली. 'कोणी म्हणे, 'वेड लागले' कोणी म्हणाले, 'जलदेवतेचा कोप झाला. 'शिपायांनी राजपुत्राला उचलून घोडयावर घातले व त्याला घटट बांधले. शिपाई राजपुत्राला घेऊन राजवाडयात आले. शिपाई राजाला म्हणाले, 'महाराज, यांना कसली तरी बाधा झाली आहे. तळयाच्या काठी उभे होते व 'आता दिसली, नाहीशी झाली.' एवढेच हे सारखे म्हणतात. 'असे म्हणून शिपाई निघून गेले.
राजाला हा एक मुलगा होता व एक मुलगी होती. गादीचा मालक राजाच्या नंतर हाच होता. एकुलता एक मुलगा-आणि त्याला वेड लागले! राजा दु:खी झाला. गावोगावचे वैद्य आले, हकीम आले; परंतु उपाय चालेना. मांत्रिक आले, तांत्रिक आले; परंतु कशाने गुण पडेना. राजाने आपल्या राज्यात दवंडी दिली, 'जो कुणी माझा मुलगा बरा करील, त्याला माझे अर्धे राज्य व माझी मुलगी देईन. 'अनेकांनी प्रयत्न केले; परंतु कोणास यश येईना.