एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य राहात होता. त्याचे नाव होते भिकंभट तो फारच गरीब होता; परंतु त्याचे कुटुंब फार मोठे होते. बायको होती. चार कच्चीबच्ची होती. घरात खाण्यापिण्याची सदैव पंचाईत पडायची. कधी कधी नवराबायकोचे कडाक्याचे भांडणही होई. त्या वेळेस मुले रडू लागत. शेजारीपाजारी मात्र हसत व गंमत बघत.
एके दिवशी तर गोष्ट फारच निकरावर आल्या. भिकंभट ओसरीत बसले होते. घरात खाण्यासाठी पोरे आईला सतावीत होती. सावित्रीबाई शेवटी एकदम ओसरीत येऊत गर्जना करू लागल्या, 'काय द्यायचे पोरांना खायला? घरात एक दाणा असेल तर शपथ. बसा येथे ओटीवर मांडा ठोकून. संसार चालवता येत नाही तर लग्न कशाला केलेत? नेहमी गावात चकाटया पिटा. पानसुपार्या खायच्या, पिचकार्या मारायच्या. दुसरा उद्योग नाही तुम्हाला. काही जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज. लोकांजवळ तरी कितीदा तोंड वेंगाडायचे? ही पोरे घेऊन विहीरीत जीव द्यावा झाले. शंभरदा सांगितले कि काही थोडे फार तरी मिळवून आणा. कोठे बाहेर जा, उद्योगधंदा पाहा; परंतु घरकोंबडे येथेच माशा मारीत बसता. मला तर नको हा संसार असे वाटत आहे.'
सावित्रीबाईंचा पट्टा सारखा सुरू होता. बिचारे भिकंभटजी. त्यांना कोण देणार नोकरी चाकरी? कोणतेही काम त्यांना येत नसे; परंतु त्या दिवशी त्यांना फार वाईट वाटले. बायको रोजच बोलत असे; परंतु आज त्यांचा स्वाभिमान जागा झाला होता. त्यांची माणुसकी जागी झाली. एकदम उठले व म्हणाले, 'आज पडतो घराबाहेर. काही मिळवीन तेव्हाच घरी परत येईन. पोराबाळांचे पोट भरण्यास समर्थ होईन तेव्हाच परत तोंड दाखवीन. ही तोपर्यंत शेवटचीच भेट. 'परंतु सावित्रीबाईंस त्या बोलण्याने तेवढेसे समाधान झाले नाही, त्या चिडविण्याच्या आवाजात म्हणाल्या, 'आहे माहीत तुमची प्रतिज्ञा. आजपर्यंत सतरांदा जायला निघालेत; परंतु अंगणाच्या बाहेर पाऊल पडले नाही. जाल खरोखरच तेव्हा सारे खरे. 'भिकंभट खरोखरच घरातून बाहेर पडले. लांबलांब चालले. पाय नेतील तिकडे जात होते. कोणाकडे जाणार, कोठे जाणार? ना कोठे ओळख, ना कोणापाशी वशिला. दमेपर्यंत चालत राहावयाचे असे त्यांनी ठरविले होते. शेवटी ते अगदी थकून गेले. पोटात काही नव्हते. एक पाऊलही पुढे टाकवेना. शेवटी एका झाडाखाली ते रडत बसले.
त्या वेळेस शंकर आणि पार्वती तिकडून जात होती. पार्वती शंकरला म्हणाली, 'देवा, रडण्याचा आवाज कानांवर येत आहे. कोणी तरी दु:खी मनुष्य जवळपास असावा. चला, आपण पाहू. 'ती दोघं कोण रडतो ते शोधू लागली. त्यांना झाडाखालचा भिकंभट दिसला.
'तो पाहा रडणारा माणूस. चला का रडतोस ते त्याला विचारू. चला देवा.' पार्वती म्हणाली.
भगवान शंकर म्हणाले, 'या जगातील लोक एकाच गोष्टीसाठी रडत असतात. त्यांना पैसा पाहिजे, धनदौलत पाहिजे, परंतु जगाला देऊन देऊन आपण भिकारी झालो. आता आपणाजवळ देण्यासारखे काय बरे आहे? नाही म्हणायला भस्म आहे. त्याला का पडगुलीभर भस्म देऊ?'