कोठून आले ते शब्द? अनाथांचा नाथ, दीनांचा कैवारी असा कोण तेथे होता? तेथे एक साधू राहात असे. बाईच्या हावभावांवरून ती जीव देणार असे त्याने ओळखले. त्याचेच ते शब्द होते. ते शब्द ऐकून नावडती चपापली, दचकली. हे जग मला नीट जगूही देत नाही, सुखाने मरूही देत नाही. दुष्ट आहे जग असे तिला वाटले.
तो साधू जवळ आला. तो प्रेमळपणे बाईला म्हणाला, 'तुम्ही जीव का देता? देवाने दिलेला सोन्यासारखा देह का बरे पाण्यात फेकता? हा देह सेवेत राबवावा, परोपकारात झिजवावा, आत्महत्या म्हणजे सर्वांत मोठे पाप नका असा अविवेक करू नका माझे ऐका.'
नावडती म्हणाली, 'महाराज, तुम्ही म्हणता ते खरे. आत्महत्या करणे हे मोठे पाप म्हणून तर आजपर्यंत थांबले; परंतु अत:पर थांबवत नाही, धीर धरवत नाही. कशाच्या आशेवर मी जगू, जगात दिवस काढू? प्रेमाचा एक शब्द मला मिळत नाही. मरू दे मला. मी मेले तर कोणी रडणार नाही. मरणाचे सुख तरी मिळू दे मला.'
साधू म्हणाला, 'कसले तुम्हाला दु:ख आहे?'
नावडती म्हणाली, 'मी आहे नावडती. आवडतीचे सारे गोड. माझे सारे कडू. देवाने रूपलावण्य नाही मला दिले. यात माझा काय दोष? परंतु म्हणून मला छळतात, गांजतात; वाटेल तसे बोलतात. हाल करतात. कुरूप स्त्रीने कशाला जगावे? देव फुलांना, फुलपाखरांना कसे नटवता; परंतु माझ्याच वेळी त्याचं सारं संपलं वाटतं. असो. आपले नशीब. जाऊ दे मला, घेऊ दे उडी.'
साधू म्हणाला, थांब. नको उडी घेऊ. मी तुला रूपलावण्य देतो. देवाचे नाव घेऊन या पाण्यात तीन वेळा बुचकळून बाहेर ये. अप्सरेप्रमाणे दिसू लागशील. खरेच सांगतो.
नावडतीने विश्वास ठेवला. साधूला तिले नमस्कार केला. साधू निघून गेला नंतर तिने देवाचे नाव घेऊन तीन वेळा पाण्यात बुचकुळी मारली आणि खरेच ती फार सुंदर दिसू लागली. जणू राजाची राणी. स्वर्गातील रंभा अशी दिसू लागली.
ती घरी परत जावयास निघाली. मनात साधूचे उपकार मानीत, त्याची स्तुती गात ती निघाली. आपला नवरा आता आपल्यावर प्रेम करील, हिडिसफिडिस करणार नाही असे मनात येऊन तिला किती तरी आनंद होत होता. संपली साडेसाती असे तिला वाटले. तिला आता दगड टुपत नव्हते, काटे बोचत नव्हते. जणू पायाखाली सर्वत्र फुलेच पसरली होती.
पुन्हा ते जंगल आले. त्या जंगलातून ती जात होती. वेगाने जात होती. इतक्यात 'अहो बाई, थांबा, इकडे या.’ असे शब्द तिच्या कानांवर आले आजूबाजूस कोणी माणूस तर दिसेना. कोणी मारली हाक, कोणाचे ते शब्द? भ्रम झाला असाव असे मनात येऊन ती पुन्हा चालू लागली परंतु ते शब्द पुन्हा कानांवर आले. भास नाही, कोणी तरी खास बोलावते आहे असे तिला वाटले. तोच तिला ते पेरूचे झाड दिसले. ते झाड जणू आनंदाने डोलत होते. नावडती त्याच्या जवळ गेली व म्हणाली, 'काय रे पेरूच्या झाडा, तू का हाक मारलीस?