एका गावात एक ब्राह्मण होता. त्याची बायको होती. त्याला पाचसहा मुले होती. प्रपंच मोठा परंतु घरात एक पै असेल तर शपथ. घरात नको काय? संसार मांडला की सारे त्रिभुवन हवे. कपडालत्ता हवा, खायला प्यायला हवे, दवापाणी हवे; परंतू त्रिंबकभटजीच्या घरात सर्वच गोष्टींची टंचाई. त्याची बायको रमाबाई दिवसभर खपे. कोणाची धुणी धुवी, कोणाकडे दळायला जाई; परंतु तेवढयाने एवढे मोठे घर कसे चालणार?
एके दिवशी रमाबाई फारच रागावली होती. त्रिंबकभट ओटीवर बसला होता. ती तणतणात बाहेर आली व म्हणाली, 'नुसते गुळाचे गणपती बसा तेथे, काही लाज कशी ती मुळी नाही. त्या चिंत्याची मुंज करायला हवी, नमीला स्थळ पाहायला हवं; परंतु तुम्हाला त्याचे काही तरी आहे का? एवढे पुरूषासारखे पुरूष परंतु खुशाल ऐदीनारायण तेथे बसून राहाता. जणू शेणाचा पो. शेणाच्या पोचाही उपयोग होतो; परंतु तुमचा काडीचाही उपयोग नाही. खायला काळ व भुईला भार!'
रमाबाईचे तोंड सारखे चालले होते. त्रिंबकभटाला फारच लागले ते बोलणे त्याने कोठे तरी दूरदूर निघुन जावयाचे ठरविले. तो बायकोला म्हणाला, 'आजपर्यंत मी पुष्कळ सहन केले, लोकसुध्दा बोलणार नाहीत इतके तू रोज बोलतेस; परंतु आज कमाल केलीस. आज घरातून मी जातो. चारपाच हजार रूपये जमवीन तेव्हाच तुला तोंड दाखवीन. समजलीस ना?'
वैतागाने ब्राह्मण खरोखरच निघून गेला. शेजारच्या बायका रमाबाईस म्हणाल्या, 'आता आणतील हो थैल्या भरून. आता तुम्हाला तोटा पडणार नाही. सोन्याने तुम्हाला मढवून काढतील. 'रमाबाई म्हणाली, 'अहो, कसले आणातात पैसे! उद्या स्वारी घरी परत येईल. अगदी कसे ते साहस नाही. चार ठिकाणी जावे, काही उद्योग पाहावा. ते काही नाही. गेल्या आल्याशिवाय का काही होते? परंतु यांना घर सोडायला नको. उद्या हात हलवीत परत येतील.'
त्रिंबभटजीच्या परसावात एक फार जुने झाड होते. त्याचा विस्तार मोठा होता. त्या झाडावर एक भूत राहात असे. उंच विशाल अशी जुनी झाडे भुतांना राहावयास आवडतात. त्याभुताने ठरविले की आपण त्रिंबकभटजी व्हायचे. त्याने त्रिंबकभटजीचे रूप हुबेहूब धारण केले. तसेच रूप, तसेच बोलणेचालणे, तसाच पंचा, तशीच ती बंडी व तसेच ते मोठे पागोटे. त्रिंबकभटजी उजाडत अंगणात उभे. रमाबाई सडा सारवण्यासाठी बाहेर आली तो नवरा दृष्टीस पडला. तिचे तोंड सुरू झाले. 'आलेत ना परत? जाल कोठे मसणात? तेथे ओटीवर फतकल मारून बसायची झाली आहे सवय. हं. या घरात. तेथे खांबासारखे उभे नको राहायला. 'परंतु ते भूत म्हणाले, 'अग, घरी आलो परंतु हात हलवीत नाही आलो. मंत्र शिकून आलो. ऋध्दिसिध्दीचा मंत्र. तुला हवे असेल ते मी आता देईन. बोल काय हवे?'
रमाबाई म्हणाली, 'द्या पाचशे रूपये.'
भुताने सांगितले, 'डोळे मीट.'
रमाबाईने डोळे मिटले. भुताने सांगितले, 'उघड डोळे. ' तिने डोळे उघडले. खरोखरच तिथे पाचशे रूपयांची थैली. तिने ती थैली एकदम उचलली व घरात कुलपात ठेवली. तिला खूप आनंद झाला. ती आता नवर्याजवळ गोड बोलू लागली, गोड हसू लागली. पैशाने सारे प्रसन्न होतात.