प्रधानपुत्र म्हणाला, 'ठीक, मित्राची तुम्हाला जरूर नसेल तर मी तरी कशाला जगू? तुमचे प्राण वाचवण्यासाठी मी जगू इच्छित होतो. अत:पर तुम्हास धोका नाही. मी मेलो तरी चालेल. ऐका. काल रात्री पाखरांचा संवाद मी ऐकला. तुम्ही झोपला होतात. मी पहारा करीत होतो. नर मादीला म्हणाला, 'जर घोडयावरून राजपुत्र गेला तर तो घोडा पडेल व राजपुत्र मरेल' म्हणून मी तुम्हाला घोडयावर बसू दिले नाही. अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. प्रधानाचा मुलगा एवढे म्हणून थांबताच गुडघ्यापर्युंत तो दगडाचा झाला. तो राजपुत्रास म्हणाला, 'पाहा माझे पाय दगडाचे झाले. पुढे सांगू का?'
'सांग, सर्व सांग. 'राजपुत्र म्हणाला.
'राजपुत्र दरवाजातून आत जाताच दरवाजा अंगावर कोसळून राजपुत्र मरेल. तो आधी पाडला तर राजपुत्र जगेल, असे ती पाखरे म्हणाली. म्हणून मी दरवाजा पाडवला. 'प्रधानपुत्र एवढे म्हणताच कमरेपर्यंतचा भाग पाषाणमय झाला.
'पाहा, कमरेपर्यंत मी दगडाचा झालो. आणखी सांगू का?' प्रधानपुत्राने विचारले.
'सांग. पुन्हा पुन्हा काय विचारतोस?' राजपुत्र म्हणाला.
'राजा मेजवानी देईल, त्या वेळेस राजपुत्राच्या ताटात एक उत्कृष्ट जातीचा मासा तळून वाढलेला असेल. जर राजपुत्र तो खाईल, तर तो मरेल.'
प्रधानपुत्र एवढे म्हणताच मानेपर्यंतचा भाग दगडाचा झाला.
'आणखी सांगू का?' प्रधानपुत्राने विचारले.
'सांग म्हणून कितीदा सांगू?' राजपुत्र म्हणाला.
'आता शेवटची गोष्ट सांगताच मी सर्व दगडाचा होईन. मागून तुला पश्चाताप होऊन आपला मित्र जिवंत व्हावा असे वाटले तर त्याला एकच उपाय आहे. तुला जे पहिले मूल होईल, ते मारून त्याच्या रक्ताने ह्या माझ्या दगडाला स्नान घाल म्हणजे मी उठेन; परंतु मला उठण्याची इच्छा नाही. मी मित्रावर प्रेम केले. माझे काम झाले. ऐक, शेवटची त्या पाखरांची गोष्ट ऐक. ती म्हणाली, राजपुत्र झोपला म्हणजे एक सर्प येऊन पलंगावर चढेल व दंश करील. जर कोणी तो सर्प आधी मारील तर राजपुत्र जगेल. 'एवढे म्हणत आहे, तोच प्रधानाचा मुलगा सबंध पाषाण होऊन पडला.
राजपुत्र आता विचार करू लागला. आपला मित्र किती थोर मनाचा होता ते मनात येऊन तो रडू लागला. त्या दगडावर तो अश्रूंचा वर्षाव करू लागला. परंतु तेथे अश्रूंचा उपयोग नव्हता. त्याला होणार्या पहिल्या मुलाचे रक्त पाहिजे होते.
दुसर्या दिवशी राजपुत्राने सारी कथा आपल्या पत्नीस सांगितली व म्हणाला, 'आपले पहिले मूल द्यावयाचे का? तुला धैर्य होईल का?' त्याची पत्नी म्हणाली, 'देवाची कृपा असेल तर आणखी बाळे होतील; परंतु आपला मित्र जगवला पाहिजे. त्याचे उतराई झालेच पाहिजे.'