एक होता राजा. त्याला सर्व प्रकारचे सुख होते. त्याला कसली वाण नव्हती. एकच दु:ख होते व ते म्हणजे त्याला मूलबाळ नव्हते. राजा व राणी यामुळे नेहमी खिन्न व दु:खी असत. राणीने पुष्कळ उपासतापास केले, व्रतवैकल्ये केली; परंतु तिची इच्छा पुरी होईना. राजवाडा संपत्तीने भरलेला होता. दारी हत्ती झुलत होते. घोडे होते, रथ होते. दासदासींना तोटा नव्हता; परंतु मूल नव्हते. त्यामूळे सारे असून नसून सारखे असे राणीस वाटे.

एके दिवशी कोणी एक भिक्षेकरी गोसावी आला. त्याच्या अंगाला भस्म लावलेले होते. गळयात रूद्राक्षांच्या माळा होत्या. डोक्यावर मोठमोठया जटा होत्या. त्याला पाहून लहान मुले भिऊन पळू लागली. भिक्षा मागतामागता तो राणीच्या अंगणात आला. राणी दु:खी कष्टी होती. तो यती राणीला म्हणाला, 'तुम्ही दु:खी का? तुमचे राज्य मोठे, तुमची संपत्ती अगणित; मग तुम्हाला, दु:ख का?' राणी म्हणाली, 'जगात एक पुत्ररत्‍न

खरे, बाकीची रत्‍ने काय कामाची? पोटी संतान नाही, म्हणून जीव दु:खी आहे. माझया मनास चैन पडत नाही. खाणेपिणे सुचत नाही. 'तो गोसावी म्हणाला, 'मी तुम्हाला दोन पुत्र देतो. परंतु माझी एक अट आहे. तुम्हाला जर दोन मुलगे झाले, तर त्यांतील एक तुम्ही मला द्यावा. मी बारा वर्षांपर्यंत केव्हाही येईन. जर बारा वर्षांत आलो नाही तर दोन्ही मुलगे तुमचे. 'राणीने मनात विचार केला की एक मुलगा गेला तरी एक राहील. ती त्या गोसाव्याला म्हणाली, 'ठीक आहे. एक मुलगा देईन. तुमच्या कृपेने एक तरी आमच्याजवळ राहील. बारा वर्षे तुमची वाट पाहू. द्या, मला पुत्ररत्‍न द्या. माझया मांडीवर बाळ खेळो. माझी मांडी धन्य होवो.'

त्या गोसाव्याने राणीस कसली तरी मुळी दिली. तो म्हणाला, 'ही मुळी खा. पुढे तुम्हाला दोन आवळे जावळे मुलगे होतील. मी आता जातो. 'असे म्हणून गोसावी निघून गेला.

राणीने सारी हकीगत राजाला सांगितली. राजाला फार आनंद झाला. पुढे राणीला दोन मुलगे झाले. ते फारच सुंदर होते. जसे चंद्र सूर्य तसे ते दिसत. राजाने मोठा सोहळा केला. हत्तीवरून साखर्‍या वाटल्या. तुरूंगातले सारे कैदी सोडण्यात आले. शेतकर्‍यांना शेतसारा एक वर्षभर माफ करण्यात आला. शाळांना देणग्या मिळाल्या. प्रजेला सुख झाले. सारी प्रजा म्हणू लागली, 'राजाचे मुलगे उदंड आयुष्याचे होवोत.'

दिवसेंदिवस राजाचे मुलगे वाढू लागले. त्यांच्या अंगाखांद्यांवर हिर्‍यामोत्यांचे दागिने होते. त्यांचे केस काळेभोर होते डोळे कमळासारखे होते. नाके सरळ व तरतरीत होती. त्यांचे दात मोत्यांसारखे होते. मुलांवरून डोळे काढून घेऊ नये असे पाहणारास होई. राजाराणी आनंदी झाली. मुलांना खेळताना पाहून राणीला धन्य वाटे. आईच्या मांडीवर आधी जाऊन कोण बसतो अशा शर्यती ते लावीत. एकदम धावत येत व आईला मिठी मारीत. राणीला मुले कोठे ठेवू, कोठे न ठेवू असे झाले.

परंतु राणीच्या मनात एक दु:ख होते. दोन्ही मुलगे ती जवळ घेई व तिच्या डोळयांतून एखादे वेळेस पाणी येई. कुठला मुलगा यांतून जाईल, तो गोसावी कोणता मुलगा मागेल, हे मनात येऊन तिचा जीव खालीवर होई. एक दिवस गेला म्हणजे तिला हायसे वाटे.

त्या दोन मुलांतील एक राजाचा आवडता होता व एक राणीचा. एक राजाजवळ निजे, एक राणीजवळ निजे. एक राजाबरोबर फिरावयास जाई, एक राणीबरोबर.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel