प्रधानाचा मुलगा एक दिवस सकाळी बागेत गेला. तो त्या इमारतीत शिरला. राजपुत्र एका कुशीवर झोपल्यासारखा पडला होता. राजपुत्राने तोंड टवटवीत दिसत होते. देह सडला नाही, कुजला नाही. घाण सुटली नाही. प्रधानाच्या मुलास आश्चर्य वाटले. रात्री येऊन पाहावे असे त्याने ठरविले.

रात्र झाली. बाहेर सुंदर चांदणे पडले होते. सावत्र राणी झोपली होती. तिने गळयातील साखळी काढून ठेवली. इकडे राजपुत्र जागा झाला. खावयास न मिळाल्यामुळे तो अशक्त झाला होता. अंथरूणातच तो पडला होता व विचार करीत होता इतक्यात प्रधानाचा मुलगा तेथे आला त्याला पाहाताच तो उठून बसला. मित्र मित्राला भेटला. क्षणभर दोघांना बोलवेना, हृदये भरून आली होती. दोघांना गहिवर आला होता. राजपुत्र म्हणाला, 'मी रोज रात्री जागा होता; परंतु उजाडते कधी ते समजतच नाही. मी दिवसा मरून पडतो व रात्री जिवंत असतो. 'प्रधानाचा मुलगा आश्चर्य करू लागला, परंतु तो आपल्या मित्रास म्हणाला, 'आधी ही फळे आणली आहेत, ती तर खा. रोज तुला मी रात्री खावयास घेऊन येईन. तू काळजी करू नकोस. हे कोडे काय ते उलगडलेच पाहिजे.' दोघे मित्र बागेत हिंडते, फिरले. शेवटी येऊन दोघे निजले. बाहेर उजाडले. पाखरांच्या किलबिलीने प्रधानचा मुलगा जागा झाला, परंतु त्याचा मित्र तेथेच मरून पडला होता.

प्रधानाचा मुलगा रोज रात्री तेथे खावयास येऊन येई. कधी तेथेच झोपे. कधी घरी जाई. कधी गावाला जावयाचे असले म्हणजे तो दोनचार दिवसांना पुरेल इतके खाणे तेथे कपाटात ठेवून जाई. असे चालले होते.

एके दिवशी दूर एका रस्त्याने एक गरीब बाई चालली होती. ती म्हातारी होती. तिच्याबरोबर तिची मुलगी होती. मुलगी मोठी देखणी होती. आपल्या म्हातार्‍या आईला तिचा हात धरून ती नेत होती. इतक्यात कोणी तरी एक विचित्र प्राणी त्यांना दिसला. म्हातारी त्या प्राण्याला म्हणाली 'तू कोण? आमच्याबरोबर तू का येतोस? तुझी आम्हास भीती वाटते. 'तो प्राणी म्हणाला, 'मी तुझ्या मुलीचे नशीब. मी तिच्याबरोबर नाही जाणार, तर कोणाच्या? तू बुढढी झालीस. तुझ्या नशिबाचे सारे खेळ संपले. आता मुलीच्या नशिबाचे खेळ सुरू होतील.'

ती म्हातारी म्हणाली, 'माझ्या मुलीच्या नशिबी काय आहे? कशी सोन्यासारखी पोर आहे; परंतु आम्ही पडलो गरीब. राजाला राणी शोभेल अशी आहे माझी मुलगी; परंतु काय तिच्या नशिबी आहे कोणास कळे? माझ्यासारख्या भिकारणीच्या पोटी तिने जन्म घेतला, म्हणून हे हाल. तिचे पाय फुलाहून कोवळे आहेत, प्राजक्ताच्या फुलाहून नाजुक आहेत; परंतु अनवाणी चालावे लागते. ते पाही तिचे पाय सोलून निघाले आहेत. 'तो प्राणी म्हणाला, 'म्हातारे, उगीच ऐट कशाला सांगतेस? तुझ्या मुलीचे नशीब वाईट आहे. तिचे प्रेताजवळ लग्न लागणार आहे!'

ते शब्द ऐकून म्हातारी धाडकन् खाली पडली. तो प्राणी दिसेनासा झाला. ती मुलगी धीराची होती. तिने पळसाच्या पानांचा द्रोण करून पाणी आणले. आईच्या डोळयांना लावले. झाडाच्या पानांनी ती वारा घालीत बसली. म्हातारीने डोळे उघडले. 'पोरी, कसे ग तुझे होणार? असा ग कसा देव!' असे म्हणून म्हातारी लहान मुलाप्रमाणे रडू लागली. ती शहाणी मुलगी आईला धीर देऊन म्हणाली, 'आई, ऊठ. देव करतो ते सारे बर्‍यासाठी. त्याचा हेतू चांगलाच असतो. तो विष देवो, अमृत देवो; पाऊस देवो, ऊन देवो; सर्व आपल्या कल्याणासाठीच असते. देवाच्या दयेबद्दल शंका का घ्यावी? ती बघ झाडे हलत आहेत, तुला वारा घालीत आहेत. देवाचे हातच जणू तुला विंझणे वारीत आहेत. ऊठ आई.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel