मुलाला असे पढवून त्याला घेऊन रोजच्याप्रमाणे ती कामाला आली. सावत्र राणीची वेणीफणी ती करु लागली. जवळच बाळ खेळत होता. तो एकाएकी रडू लागला. राणी म्हणाली, 'त्याला आधी उगी कर. वेणीफणी मागून कर.' काही केल्या बाळ रडायचा थांबेना.
त्याची आई त्याला म्हणाली' का रे असा ओक्साबोक्शी रडतोस? काय झाले? काय हवे तरी? मुलाने राणीच्या गळयातील साखळीकडे बोट केले. राणी म्हणाली, ' लबाडा, सोन्याची साखळी हवी का? माझ्या पोटी का आला नाहीस? देव भिकार्यांना खंडीभर पोरे देईल, परंतु श्रीमंताला देणार नाही., त्या मुलाची आई त्याला म्हणाली,' माझ्या पोटी कशाला आलास? पुढच्या जन्मी राजाराणीच्या-पोटी जन्म घे व सोन्यामोत्यांचे दागिने घाल, उगी.' परंतु मुलाचे रडणे थांबेना शेवटी राणीला त्या लेकराची कीव आली 'घाल त्याच्या गळात थोडा वेळ. जरा थांबला रडायचा म्हणजे निजेल. मग हळूच घे' असे राणी म्हणाली. सोन्याची साखळी मिळताच बाळ रडायचा थांबला. आईच्या मांडीवर तो झोपी गेला. ती राजपुत्राची बायको राणीला म्हणाली, 'मी याला घरी निजवून येते. हळूच तुमची साखळी काढून आणून देते. 'राणी म्हणाली, 'जा, परंतु साखळी लवकर घेऊन ये. ती साखळी माझा जीव की प्राण आहे. त्या साखळीला मी कधी विसंबत नाही. फक्त निजताना उशाखाली ठेवते. नाही तर अक्षयी गळयात असते.'
ती वेषधारी दासी मुलाला घेऊन गेली. ती निघाली आणि बागेत आली; तेथे येऊन पाहते तो राजपुत्र जिवंत झालेला. दोघांना फार आनंद झाला. मुलाच्या गळयातील सोन्याच्या साखळीकडे बोट करुन ती म्हणाली, 'हा पाहा तुमचा प्राण. हा मी परत आणला आहे. 'राजपुत्र म्हणाला, 'आईने सांगितली होती, तीच ही साखळी.'
इतक्यात प्रधानाचा मुलगा पण तेथे आला. डाव सिध्दीस गेला हे पाहून त्याला धन्यता वाटली. तो म्हणाला, 'आता मी राजाला जाऊन सांगतो. तुम्हास हत्तीवरुन मिरवीत नेऊ.'