इकडे काय झाले, तुळशीच्या अंगणातील ते झाड गदगदा हलू लागले. राणीला दासदासी सांगू लागल्या. राजाराणी अंगणात आली. धाकटा राजपुत्र तेथे धावत धावत आला. तो म्हणाला, 'आई, दादा संकटात आहे, त्याची ही खूण. मला जाऊ दे. दादाला मी सोडवून घेऊन येतो. 'राणीला रडू आले, एक गेला व आता दुसरा चालला. काय होईल कोणास कळे. कठीण प्रसंग शेवटी शोक आवरून तिने निरोप दिला. आईबापांच्या पाया पडून राजपुत्र निघाला.
वाटेत एके ठिकाणी ते सशाचे दुसरे पिलू होते. तेआपल्या आईस म्हणाले, 'आई, तो दुसरा राजपुत्र निघाला. मी पण जाऊ?' आई म्हणाली, 'जा' गुबगुबीत सशाचे पिलू राजपुत्राच्या पाठोपाठ निघाले. राजपुत्राने ते उचलून घेतले व आपल्या पिशवीत ठेवले. तो पुढे गेला. तो ते दुसरे साळूंकीचे पिलू तेथे होते. ते पिलू आपल्या आईस म्हणाले, 'आई, तो बघ दुसरा राजपुत्र चालला, मी पण जाऊ?' आई म्हणाली, जा बेटा. ' ते साळुंकीचे पिलू राजपुत्राच्या खांद्यावर येऊन बसले. राजपुत्राने त्याचा मुका घेतला व आपल्या खिशात ते ठेवून दिले. आणखी पुढे जातो तो तेथे कुत्रीचे दुसरे पिलू होते. ते आपल्या आईस म्हणाले, 'आई, तो बघ छोटा राजपुत्र पण चालला, मीही जाऊ?' आई म्हणाली, 'जा. 'ते कुत्रीचे पिलू राजपुत्राच्या पाठोपाठ जाऊ लागले. राजपुत्राने ते उचलून घेतले व त्याला मोठया पिशवीत ठेवून दिले. असे करताकरता तो राजपुत्र घनदाट रानात शिरला. झाडांवर रसाळ फळे होती; ओढयांना स्वच्छ पाणी होते. त्याने पोटभर फळे खाल्ली; तो मनमुराद पाणी प्यायला. फुलांच्या माळा करून त्याने गळयात घातल्या. असे करीतकरीत तो उत्तर दिशेला चालला, इतक्यात त्याला एक सुंदर हरिण दिसले. तो हरणाच्या पाठोपाठ लागला. दूरवर तो पळत पळत आला. परंतु एकाएकी हरिण अदृश्य झाले. ते कोठेच दिसेना. राजपुत्र चारी दिशांस पाहात उभा राहिला. त्याला एका झाडाखाली एक सुंदर स्त्री दिसली. तो तिच्याजवळ गेला व म्हणाला, 'बाई, तुम्हाला एखादे हरिण दिसले का? मी त्याच्या पाठोपाठ येत होतो, परंतु ते एकाएकी नाहीसे झाले.'
ती स्त्री म्हणाली, 'मला हरिणबिरीण माहीत नाही, मी येथे बसलेली असते. येणार्या जाणार्यास खेळण्यासाठी बोलावते. या. तुम्ही माझ्याबरोबर खेळा. हे फासे तुमची वाट पाहात आहेत. नुसते खेळू नका. त्यात राम नसतो. काही पणास लावा.'
राजपुत्रास नाही म्हणवेना. तो स्वाभिमानी होता. तो खेळू लागला. तो म्हणाला, 'मी हे सशाचे पिल्लू पणास लावतो. परंतु तुम्ही काय पणास लावता?' ती स्त्री म्हणाली, 'मी जर हरले, तर असेच एक सशाचे पिलू मी देईन.'
दोघे खेळू लागली. शेवटी राजपुत्राने तिला जिंकले. त्या स्त्रीने तसेच एक सशाचे पिलू त्या राजपुत्राला दिले. सशाची दोन्ही पिले एकमेकांस भेटली, नाचली. पुन्हा खेळ सुरू झाला. राजपुत्र म्हणाला, 'आता मी साळुंकीचे पिलू पणास लावतो, तुम्ही काय लावता?' ती स्त्री म्हणाली, 'मी जर हरले, तर असेच एक साळुंकीचे पिलू तुम्हास देईन.'
दोघे खेळू लागली. जोराजोराने फासे पडू लागले. पुन्हा एकदा राजपुत्राने तिला जिंकले. तिले साळुंकचे पिलू काढून राजपुत्राला दिले. साळुंकीची दोन्ही पिले एकमेकांस भेटली, नाचली. खेळ पुन्हा सुरू झाला. राजपुत्र म्हणाला, 'आता मी कुत्रीचे पिलु पणास लावतो, तुम्ही काय लावता?' ती स्त्री म्हणाली, मी त्या कुत्रीच्या पिलासारखेच पिलू तुला देईन.'