फार प्राचीन काळी महाभिष नावाचा राजा होऊन गेला. त्याने शंभर वाजपेय यज्ञ व एक हजार अश्वमेध यज्ञ केले. या पुण्याच्या बळावर त्याला स्वर्गप्राप्ती झाली. इतर देवांसमवेत तो राजा एकदा ब्रह्मदेवाच्या सभेत बसला असताना स्वर्गातली गंगाही त्या सभेला आली. येताना तिच्या अंगावरील वस्त्र वार्‍यामुळे ढळले; सर्व देवांनी माना खाली घातल्या पण महाभिष पहात राहिला. ब्रह्मदेवाने त्याला या अपराधाबद्दल ’तू मनुष्यलोकात जाशील’ असा शाप दिला. प्रतीपाचा पुत्र शंतनु म्हणून त्याने जन्म घेतला. गंगेला स्वर्गातील अष्टवसू हे देव भेटले. त्यांनी कामधेनू या गाईचे अपहरण केले होते म्हणून त्यांना वसिष्ठांकडून शाप मिळाला होता की ते मर्त्यलोकात जन्म घेतील. त्यांच्यातील सात वसू अल्पकाळ शाप भोगतील पण द्यौ नावाचा वसू मात्र एक जन्म मानव म्हणून जगेल. ते वसू गंगेला विनवितात की तिने त्यांची माता व्हावे व शक्यतो लवकर शापातून मुक्‍त करावे. मानवी स्त्रीपेक्षा त्यांना गंगाच माता म्हणून हवी होती. गंगा शंतनूशी विवाहबद्ध होऊन त्यांच्या इच्छेप्रमाणे वागते. आपल्या सात पुत्रांना ती जलसमाधी देते व द्यौ नावाच्या वसूला मात्र जिवंत ठेवून राजाला अर्पण करते. तिचा हा आठवा पुत्र म्हणजेच देवव्रत भीष्म होय.

कुरुकुलातील देवव्रत

पुत्र लाभला कुरुवंशाला मोद शंतनूला

स्वर्गिचा वसू इथे जन्मला ॥धृ॥

चोरुन नेती वसू धेनुला

या कृत्याने शाप लाभला

मावरुपे जन्म पावले सोडिति स्वर्गाला ॥१॥

स्वर्गंगा ती येइ पृथ्विवर

दिव्य तेज अन् रुपहि सुंदर

तिला पाहता शंतनु मोहित, घालि मागणी तिला ॥२॥

"करु नको जे विप्रिय मजला"

गंगा घाली अटि राजाला

मान्य करी नृप, सत्वर, झाला मंगल तो सोहळा ॥३॥

अष्टवसू, गंगेस विनविती

जन्म घेउ दे तुझ्याचपोटी

दीर्घशाप जन्माचा केवळ आहे एकाला ॥४॥

यथाकाल ती झाली माता

जळी बुडविले आपुल्या सुता

दुरुन स्तंभित राजा पाही निष्ठुर कृत्याला ॥५॥

नदीवरी एकेका आणिले

सात सुतांना जळी बुडविले

अल्पशाप तो होता त्यांना, शीघ्र दिली मुक्‍तता ॥६॥

सुतास आठव्या आणिले तीरी

अश्रू ढाळित घेतसे करी

"थांब थांब गे निर्दय माते" नृप कोपे बोलला ॥७॥

बाळ आठवा हृदयी धरला

नृपास सांगे वसू-कथेला

"दिव्य अंशधर देवव्रत हा, राहिल आपणाला" ॥८॥

सोडुन गेली ती राजाला

विप्रिय तिज तो असे बोलला

काळ लोटता आली परतुन देण्या पुत्राला ॥९॥

शस्त्रशास्त्र पारंगत केला

गंगेने सुत नृपा सोपिला

हर्ष माहि ना मनि राजाच्या पाहुन पुत्राला ॥१०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel