युधिष्ठिर जेव्हा आपल्या हक्काचा स्वर्ग सोडून पांडवांसाठी नरकात राहाण्यास तयार झाला तेव्हा इंद्राने त्याला आश्वासन दिले की पांडवांची खरी गती स्वर्ग हीच आहे. त्याने मायानिर्मित नरक नाहीसा केला व पांडव पुण्यवंत असून येथे नरकात का दिसले या विषयी स्पष्टीकरण दिले. मानव शुभ व अशुभ अशी दोन्ही प्रकारची कर्मे करीत असतो. शुभ कार्याचे फळ जे पुण्य त्याने स्वर्ग मिळतो व पापकर्मामुळे नरकाची प्राप्ती होते. पुण्य आणि पाप यात जे अल्प असते ते आधी भोगावयाचे असते, व जे अधिक असते ते नंतर भोगावयाचे असते. कौरवांचे पुण्य अल्प असल्याने ते आधी स्वर्गात आले व पांडवांचे पातक अल्प असल्याने त्याचे फळ भोगायला ते आधी नरकलोकात आले. द्रौपदी, कर्णासह पांडव लवकरच स्वर्गात येऊन तेथे ते दिव्यसुखे भोगतील. युधिष्ठिराला हे ऐकून समाधान वाटले. पुढे इंद्राने सांगितले की कौरव पांडव हे सर्वच देवदानवांचे अंशधारी असल्याने ते शेवटी आपापल्या मूळ पुरुषात विलीन होतील. मोठा संग्राम होऊन पृथ्वीचा भार कमी झाला व हे देवकार्य संपन्न झाले. आता हे सर्व मूळस्थानाप्रत जातील; भीम वायूत, दुर्योधन कलीत, कर्ण सूर्यात, विदुर यमात असे सर्व विलीन होतील.

अंतिम गती

पांडवा, कीर्ती तुझी अपार

जाण तू, कर्मगतीचे सार ॥धृ॥

असत्य भाषण युद्धामधले

द्रोण-वधास्तव जे तू केले

त्यास्तव तू हे दुःख भोगले

दाविला, नरक तुला क्षणकाल ॥१॥

नरदेहाने आला स्वर्गी

द्वेषभावना, वैरा त्यागी

पीडा येथे कुणी न भोगी

घेइ तू, नूतन येथ शरीर ॥२॥

नकोस देऊ दूषण दैवा

नको करू सुरनिंदा अथवा

कर्मभोग हे असती जीवा

गती ही, मिळे नरा क्रमवार ॥३॥

कर्मरूप ते - सुक्रुत - दुष्कृत

फळ त्यांचे सुखदुःखे निश्चित

फळा भोगणे अटळ, अवीरत

मानवा, सत्कर्मच आधार ॥४॥

अल्प जयांचे पातक असते

प्रथम भोगती ते नरकाते

नंतर येती स्वर्गलोकि ते

भोगिती, दिव्यसुखांचा काळ ॥५॥

अल्पपुण्य जे घेउन येती

स्वर्गसुखे ते प्रथम भोगती

कौरव म्हणुनी स्वर्गी दिसती

पांडवा, धर्माचे हे सार ॥६॥

रणात मृत्यू स्वर्गप्रद तो

पुण्य असे-तो, स्वर्गी वसतो

पुण्य संपता पुन्हा जन्मतो

नरांसी, धर्म-दया, उपकार ॥७॥

पांड कुरु होतात अंशधर

देव दानवांचे पृथ्वीवर

सुरकार्यास्तव झाले संगर

नाहिसा केला धरणीभार ॥८॥

अंश कौरवाधीश कलीचा

भीम वायुचा, विदुर यमाचा

कृष्ण असे अवतार विष्णुचा

अंश हे निजपुरुषा जाणार ॥९॥

पाण्डुपुत्र शौर्याच्या मूर्ती

दानशूर ही कर्णा कीर्ती

स्त्रीरत्नच जणु द्रुपदसुता ती

भूषणे, स्वर्गाची ठरणार ॥१०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel