शेवटच्या दिवशी रणांगणावर हाहाःकार माजला होता. भीमसेनाने धृतराष्ट्राच्या शेवटच्या सुदर्शन नावाच्या पुत्राला शराच्छादित करुन ठार मारले. धृष्टद्युम्नाने दुर्योधनाच्या सैन्याचा फडशा पाडला. दोन घटकापर्यंत पांडवांकडील रथींनी व विशेषतः अर्जुनाने शत्रूच्या सैन्याची कत्तल चालविली. दुर्योधनाकडील एक हजार राजेही या महायुद्धात आतापर्यंत प्राणास मुकले होते. दुर्योधनाने पाहिले की त्याला सहाय्यक असा वीर कोणी उरलेला नाही. घायाळ झालेला दुर्योधन भकास नजरेने रणांगण पहात होता. पांडवांकडेही दोन हजार रथ व सातशे हत्तीदळ राहिले होते. त्यांच्या विजयघोषणा दुमदुमत होत्या. दुर्योधनाने चारी दिशांकडे नजर टाकली व तो रणातून पळून गेला. पायी चालत असलेला राजा संजयाला दिसला. त्याने दुर्योधनाला तीन महारथी जिवंत असल्याचे सांगितले.दुर्योधनाने संजयापाशी आपले दुःख व्यक्‍त केले. धृतराष्ट्रासाठी निरोपही दिला की तो जलस्तंभन विद्येच्या साह्याने डोहात लपला आहे, तसेच तो अत्यंत घायाळ असून जिवंत आहे.

दुर्योधनाचे पलायन

वज्रासम भीमाची कोसळे गदा

नाश बघुनि दुर्योधन खिन्न सर्वथा ॥धृ॥

समराचा अंतिम दिन

तळपत ते भीमार्जुन

देत रिपुस वीरमरण

भीमाने कुरु वधिले वचन पाळता ॥१॥

मद्रपती पडला रणि

नष्टप्राय सैन्य झणि

जीवित ना सुहृद कुणी

कुरुराजा तो जखमी उभा एकटा ॥२॥

युद्धाचा होत कहर

पडति शिरे भूमीवर

आनंदित पांडु-शिबिर

विजयाचा घोष करित वीर नाचता ॥३॥

भयविव्हल दुर्योधन

मृत अश्वा तो सोडुन

पळुन जाइ रणातून

लपण्यास्तव शोधे तो निकटच्या र्‍हदा ॥४॥

हाती गदा असलेला

घायाळही झालेला

संजयास नृप दिसला

क्षीणस्वरे सूत वदे कंठ दाटता ॥५॥

सैन्य नष्ट सर्व रणी

कृतवर्मा कृप द्रौणी

असती जीवीत तिन्ही

आनंदित झाला नृप वृत्त ऐकता ॥६॥

"झालो मी राज्यहीन

आप्त-स्वजन-सुहृदांविण

जीवन हे गमे शून्य

नृप बोले - ’आशा रे खुंटल्या अता ॥७॥

सांग पित्या तू जाउन

बचावलो युद्धातुन

झालो मी निष्कांचन

थकलो मी दुःखभार शिरी वाहता ॥८॥

राहिन मी ह्या र्‍हदात

जलामधे परि जिवंत

जलविद्या मजसि ज्ञात

रक्षिन मी प्राण इथे जळी राहता" ॥९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel