संजयाने धृतराष्ट्राला निरोप सांगितल्यानंतर उपदेशाचे दोन शब्द ऐकवले. त्याने आपल्या स्वार्थी, अविचारी पुत्राच्या मताने न चालता, नीती व न्यायाला धरुन चालणे श्रेयस्कर ठरेल. राज्य न देण्याचा घाट हे कौरवनाशाचे बीज ठरेल, असे तो बजावतो. धृतराष्ट्र विचारात पडतो; विदुराला बोलावून घेऊन त्याला धर्मयुक्‍त व कल्याणप्रद सल्ला देण्यास सांगतो. विदूर त्याला आपल्या उपदेशात जीवनमूल्ये, नीतितत्त्वे, सदाचार, राजकर्तव्य इत्यादी विषयांचे शास्त्रीय ज्ञान देतो. यालाच ’विदुरनीति’ असे नाव आहे. इकडे युधिष्ठिराच्या मनातील घालमेल थांबलेली नाही. ज्ञातिवध होऊ नये म्हणून तो युद्धाच्या दुष्परिणामांचा विचार करु लागला. राज्य सोडून दिले तरी वैर संपेल व दुष्ट शत्रू सुखाने राहू देतील याची त्याला खात्री वाटत नाही. क्षात्रधर्म चांगला नाही. त्यात युद्ध व हिंसा आहे. युद्ध न करता राज्यहीन राहिलेले काय वाईट असेही विचार मनात घोळू लागले. तेव्हा तो कृष्णास सांगतो की कृष्णा तूच या विपत्तीतून मार्ग काढ.

युधिष्ठिराची चिंता

वनवास संपला संजय येउन गेला

परि पेच कसा तो नाही अजुनी सुटला ॥धृ॥

भोगल्या विपत्ती, केला पूर्ण करार

परि इंद्रप्रस्थ ते देण्या ठाम नकार

उपदेश शांतिचा वरुनि देति आम्हांला ॥१॥

जाणून तयांचा दुष्टभाव हृदयीचा

प्रस्ताव मांडला म्हणुन पाच गावांचा

मानिती न तोही त्यजुन सर्व नीतिला ॥२॥

जर नाही लढलो आम्ही न्यायासाठी

दैन्याचे जीवन येइल आमुच्या माथी

धनहीन नराच्या काय अर्थ जगण्याला ? ॥३॥

जो दारिद्रायतच आला रे जन्माला

त्याच्याहुन चौपट जिणे दुःखमय त्याला

जो वैभव भोगुन येई रंक दशेला ॥४॥

धर्मास सुयोधन गेला जणु विसरुन

करु आपण कृष्णा राज्य मिळविण्या यत्‍न

परि अनर्थ दिसतो युद्धामध्ये मजला ॥५॥

युद्धाहुन दुसरा नाही का पर्याय ?

तडजोड करावी - उत्तम हाच उपाय

सत्तांध परि त्या पटेल का शत्रूला ? ॥६॥

युद्धात भयंकर होईल जीवितहानी

गुरु आप्तही सगळे जातिल रे यमसदनी

त्या रक्‍तमाखल्या अर्थ काय विजयाला ? ॥७॥

स्वप्‍नात येतसे युद्धातिल कुलनाश

तो वणवा जाळील सर्वच योद्धे खास

हा उपाय अंती अपाय भासे मजला ॥८॥

हे द्वंद्व मनीचे कसे करु मी शांत ?

सामाचा यत्‍नहि बहुधा जाइल व्यर्थ-

मज काहि सुचेना, करी दूर चिंतेला ॥९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel