शंतनू राजाला मत्स्यगंधा म्हणजेच सत्यवतीपासून दोन मुलगे झाले; चित्रांगद व धाकटा विचित्रवीर्य. चित्रांगद ज्येष्ठ असल्याने तो राजा झाला. तो फार पराक्रमी होता. अनेक राजे त्याने अंकित केले. पण चित्रांगद नावाच्या गंधर्वाशी लढताना तो मारला गेला. त्याच्यानंतर वयाने लहान असूनही विचित्रवीर्याल राज्याभिषेक झाला. काशीराजाने आपल्या तीन कन्यांचे राजनगरीत स्वयंवर मांडले होते; भीष्म तेथे विचित्रवीर्यासाठी गेले व त्यांनी त्या कन्यांचे अपहरण केले. साहजिकच उपस्थित राजांनी विरोध केला. त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. पण त्यांचा टिकाव लागला नाही. आपले शाल्व राजावर प्रेम आहे असे अम्बा नावाच्या ज्येष्ठ कन्येने सांगितल्यामुळे भीष्मांनी तिला त्याच्याकडे जाण्याची अनुमती दिली. अम्बिका व अम्बालिका या दोघी बहिणींचा विचित्रवीर्याशी विवाह झाला. पण विवाहानंतर सातच वर्षांनी त्या राजाला क्षयरोग होऊन तो निधन पावला. कुरुकुलाच्या राजगादीला कुणी वारस राहिला नाही. विचित्रवीर्य निपुत्रिकच वारला. सत्यवतीला या समस्येने पुरते घेरले. ती चिंतामग्न राहू लागली. तिने भीष्माची भेट घेऊन त्याला विधवा सुनांशी विवाह करण्याचा व राजा होण्याचा आग्रह केला.

सत्यवतीची चिंता

राजकुळिचा दीप भीष्मा, पुत्र माझा लोपला

तूच हो आधार आता, वंश आपुला खुंटला ॥धृ॥

जाहले चित्रांगदाचे युद्ध गंधर्वासवे

त्यात झाला अंत त्याचा दुःख मज ते आठवे

धाकटा बाल्यात होता तो परी नृप जाहला ॥१॥

काशिराजाच्या दुहीता आणिल्या भ्रात्यास्तव

जिंकले तू सर्व राजे भासला तू भार्गव

शोभल्या राण्या नृपाला, भव्य झाला सोहळा ॥२॥

सात वर्षे राहिल्या दोघी नृपाच्या संगती

राजयक्ष्मा होउनी गेला अकाली भूपती

ग्रासतो अंधार चित्ता धैर्य राही ना मला ॥३॥

पट्टराण्या त्या परी मातृत्वहीनच राहिल्या

वंशजाच्या ह्या घडीला सर्व आशा संपल्या

तूच हो भर्ता तयांचा, प्रार्थना माझी तुला ॥४॥

सोडुनी दे रे प्रतिज्ञा वंशजासाथी सुता

दोष नाही यात कुठला ब्रह्मचर्या त्यागता

धर्मनिष्ठा, जाणसी तू धर्म आपत्तीतला ॥५॥

हस्तिनापुरची प्रजाही पोरकी राजाविना

पाहुनी हित या प्रसंगी घेइ बा सिंहासना

तू जरी माझ्या पित्याला शब्द आहे रे दिला ॥६॥

तूच ज्ञानी अन् प्रतापी थोर तू वीराग्रणी

तूच घ्यावे सुत्र हाती हे हिताचे या क्षणी

मान तू कर्तव्य ह्यासी, शपथ घालू का तुला ? ॥७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel