शंतनू राजाने मत्स्यगंधेला वनप्रदेशात पाहिले व तिच्यावर त्याचे मन बसले. तिच्या वडिलांकडे म्हणजेच दाशाकडे जाऊन त्याने मागणी घातली. दशराजाने अट घातली की तिच्या पुत्रालाच त्याच्यानंतर राज्य मिळायला हवे. राजाला देवव्रत हा ज्येष्ठ पुत्र असताना ही अट मान्य करता आली नाही. राजा अत्यंत निराश झाला. देवव्रताने सचिवांकरवी सर्व माहिती मिळविली. त्याने दाशाला जाऊन सांगितले की त्याची अट राजाला मान्य आहे. दाशासमोर त्याने प्रतिज्ञा घेतली की तो हस्तिनापुराचे सिंहासन कधीच घेणार नाही. दाशाचे तरीही समाधान झाले नाही. त्याने सांगितले की मत्स्यगंधेच्या पुत्राच्यानंतर ते राज्य त्याच्या पुत्राला मिळायला पाहिजे; देवव्रताच्या पुत्राला ते मिळता कामा नये. देवव्रताने ही अट मान्य करताना दुसरी प्रतिज्ञा घेतली की तो आजन्म ब्रह्मचर्यव्रताने राहील. अटी मान्य झाल्यामुळे दाशाला अत्यानंद झाला. गांगेयाने मोठा त्याग करुन पित्याची इच्छा पूर्ण केली. देवव्रताच्या दोन्ही प्रतिज्ञा अत्यंत कठोर व खडतर होत्या; अशा भीषण प्रतिज्ञा करणारा तो भीष्म (भयंकर कर्म करणारा) ठरला.

भीष्मप्रतिज्ञा

शीलेवरची रेघ प्रतिज्ञा भीष्माचार्यांची ॥धृ॥

गंधवती ती रुपसुशोभित

धीवरकन्या पाहुन अवचित

राजा शंतनु झाला मोहित

विव्हळ नृपती करी याचना दाशनरेशाची ॥१॥

"माझ्या कन्येच्याच सुताला

राज्याचा अधिकार जर दिला

तर ही अर्पिन राजा तुजला"

दाश-वचन ऐकता जाहली शकले आशेची ॥२॥

खिन्न उदासिन राजा राही

कळे न कारण भीष्मालाही

सचिवाकरवी जाणुन घेई

द्वन्द्‌व उभे मनि शांतनवाच्या, वेळ कसोटीची ॥३॥

दूर करावी व्यथा कशी ती

भीष्म तळमळे शय्येवरती

त्यागाचा करि विचार चित्ती

निश्चय हा सांगण्या घेतसे भेट वनी त्याची ॥४॥

"कधी न घेइन मी सिंहासन

तुला नको चिंतेचे कारण

आजीवन ह्या वचना पाळिन"

नभांतरी दुमदुमली उक्‍ती गंगापुत्राची ॥५॥

तृप्ति न झाली परि दाशाची

गंधवती-पुत्राच्या वंशी

राज्य रहावे मनिषा त्याची

भीष्म बोलले करीन पूर्ती याही आशेची ॥६॥

"ब्रह्मचर्यव्रत, हा मी घेतो

पाळिन खडतर प्राण असे तो

पितृसुखास्तव तुला प्रार्थितो

कन्या अर्पुन पूर्ण करी रे इच्छा नृपतीची ॥७॥

हिमालयाची शिखरे हलतिल

समुद्रही मर्यादा लांघिल

गगनातुन तारेही ढळतिल

वचनभङ्‌ग परि कधी न होइल, शपथ हि प्राणांची" ॥८॥

"देइन कन्या तुझ्या पित्याला;

दिला शब्द जो पाळ तयाला"

संतोषाने दाश म्हणाला

पुष्पवृष्टि भीष्मांवर झाली, बघुन कृती त्यांची ॥९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel