युधिष्ठिर द्यूतात प्रत्येक डाव हरत गेला. त्याने भावांना व द्रौपदीलाही पणाला लावले. द्रौपदीला जेव्हा पणाला लावले तेव्हा सभेतील भीष्मादिकांनी ’धिक्कार’ असा उद्‌गार काढला. कर्ण, धृतराष्ट्र, दुःशासन यांना हे पाहून आनंद झाला. सभाजनांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. दुर्योधनाने उन्मादाच्या भरात द्रौपदीला दासी ठरवून तिला सभेत आणण्यास सांगितले. दुःशासनाने त्या सम्राज्ञीचे केस ओढीत निर्दयपणे ’दासी’ म्हणून हिणवत तिला सभेत आणले. "तू कृष्ण, हरी कोणालाही बोलाव, पण ते व्यर्थ आहे. तू जिंकली गेली आहेस. दासी म्हणून सेवा कर" अशा वल्गना त्याने केल्या. द्रौपदी असहाय्यपणे अश्रू ढाळीत होती. तरीही स्वतःला सावरुन तिने सभेपुढे प्रश्न मांडला-----’नृप हो, युधिष्ठिराने प्रथम स्वतःला पणाला लावले. अशा वेळी मी खरोखर दासी ठरते काय ?’ भीष्मांनी हा नीतीचा प्रश्न असे सांगून गुळगुळीत उत्तर दिले. राजे तर भयापोटी काहीच बोलले नाही. कर्णाने सांगितले की ती दासी ठरते. दुःशासनाने तिचे वस्त्र फेडण्याचा प्रयत्‍न केला. निराधार द्रौपदीने मनात कृष्णाला आळविले. त्याक्षणी तिच्या अंगावर एकावर एक वस्त्रं निघू लागली. दुःशासन थकून खाली बसला. भीमाने दुःशासन व दुर्योधनाला मारण्याच्या प्रतिज्ञा घेतल्या. अर्जुनाने निक्षून सांगितले की पांचाली दासी ठरत नाही. धृतराष्ट्र हे मानून द्रापदीला वर प्रदान केले व पांडवांचे राज्य परत केले.

 

द्रौपदी-वस्त्रहरण

सोशिते सम्राज्ञी यातना ।

नृपांना, करिते ती प्रार्थना ॥धृ॥

"दासी बटकी’ असे हिणवुनी

निर्दयतेने केश ओढुनी

दुःशासन कृष्णेला आणी

करी तो, सभेत अवहेलना ॥१॥

सभा जाहली विस्मित निश्चल

आक्रोशात सम्राज्ञी हतबल

शिणलेल्या तिज येई भोवळ

बघे ती, आशेने अर्जुना ॥२॥

बोले नंतर क्रोधे उसळुन

"थांबव दुष्टा असभ्य वर्तन

भोगशील तू कठोर शासन

ज्येष्ठहो या माझ्या रक्षणा ॥३॥

पणी आधीच्या राजा हरला

नंतर मज लाविले पणाला

योग्य कशी की दास्यत्वाला ?

मांडते, माझ्या या प्रश्ना ॥४॥

भीष्मद्रोणही काहि न बोलत

मूक बैसती हे कुंतीसुत

स्नुषा कुळाची मी आक्रोशत

लोपली, इथलीका करुणा ?" ॥५॥

भीष्म म्हणाले --- प्रश्न नीतिचा

भार्येवरल्या अधिकाराचा

कसा देउ मी निर्णय याचा ?

जाहली, धैर्यहीन, कृष्णा ॥६॥

विकर्ण बोले, ’दासि न राणी’

कर्ण वदे ’हिज लाविले पणी

दासिच ठरते ही सम्राज्ञी

पात्र हे दासांच्या वसना" ॥७॥

राजवस्त्र त्या क्षणीच काढुन

ठेवति पांडव कष्टी होउन

तिचे वस्त्र ओढी दुःशासन

सोडुनी लाज, करि वल्गना ॥८॥

मनी द्रौपदी करिते धावा

शरणागत ती होइ माधवा

क्षणात घडले अद्‌भुत तेव्हा

फेडिता, वस्त्रे निघती पुन्हा ॥९॥

भीम वदे क्रोधे चवताळुन

"ह्या दुष्टाचे प्राणच घेइन

वक्षा फोडुन रक्‍तहि प्राशिन"

शब्द ते गमले रणगर्जना ॥१०॥

पुसे द्रौपदी पुन्हा सभेसी

कुणि न वाचवी त्या अबलेसी

सहवेना ही पीडा तिजसी

करी ती दयेचीच याचना ॥११॥

विटंबनेची निंदा करुनी

विदूर बोले उघड त्याक्षणी

"विनाश होइल नृपा यातुनी

कुळाला कलंक हा जाणा" ॥१२॥

सभेस सांगे धूर्त सुयोधन

पांडव म्हणतिल ते मी मानिन

श्वास सभेने धरले रोखुन

धर्मसुत काहिच बोलेना ॥१३॥

मांडी दावी मत्त सुयोधन

भीम गर्जला, क्रोधित होउन

’अधमाचे या ऊरु फोडिन’

कौरवा घेरी भयभावना ॥१४॥

अर्जुन उठुनी सांगे निक्षुन

"निर्णय देतो पणास लक्षुन

याज्ञसेनिला नसे दासिपण

सत्य हे, हेच असे जाणा" ॥१५॥

धृतराष्ट्रे अपशकुन ऐकले

पाञ्चालीला स्वये वर दिले

सर्व मुक्‍त दास्यातुन केले

अर्पिले, राजमुकुट त्यांना ॥१६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel