युद्धात पांडवांचा विजय झाला असला तरी शिबिरात झालेल्या हत्याकांडामुळे त्यांचेकडील सर्व राजे व सात अक्षौहिणि सैन्य नष्ट झाले होते. पाच पांडव, सात्यकी, कृष्ण हे सात महारथी पांडवांकडचे व कृप, अश्वत्थामा आणि कृतवर्मा हे तीन महारथी कौरवाकडचे असे दहाच जिवंत राहिले होते. हस्तिनापुरास सर्व पांडव कृष्णासह आले तेव्हा त्यांना ते नगर भकास वाटले. बाल, वृद्ध व स्त्रिया यांच्यावर राज्य करण्याची पाळी युधिष्ठिरावर आली होती. आपल्या हातून हा कुलक्षय, ज्ञातिबांधवांचा संहार झाला आहे असे वाटून युधिष्ठिराच्या हळव्या मनाला अपराधीपणाने ग्रासले. आपले हात रक्ताने माखलेले आहेत. या हातांनी सिंहासन स्वीकारणे योग्य नव्हे. त्यापेक्षा तपासाठी वनात निघून जाणे जास्त श्रेयस्कर आहे असे त्याला वाटले. हा जय कसला? हा तर पराजयच म्हटला पाहिजे. त्याने आर्त उद्‍गार काढले- 'अर्जुना तू राज्य कर; मला वनात जाऊ दे.'

युधिष्ठिराचे मनोगत

अर्जुना, जय हा रे कसला? ॥धृ॥

जयात माझा असे पराभव

वधिले अम्ही गुरुजन कौरव

पिउनी जणु वैराचे आसव

दुराचार केला ॥१॥

रणात वध करुनी आप्तांचा

केलासे वध आम्ही अमुचा

करुन लोप शाश्वत धर्माचा

आलो दुर्गतिला ॥२॥

धिक्कारित मी या क्रोधाला

क्षात्रजनांच्या आचरणाला

ज्यायोगे हा काळही मजला

विपत्तिचा आला ॥३॥

क्षमा अहिंसा या तत्त्वांचे

पालन नाही केले साचे

सौख्य हरपले त्यांचे, आमचे

कलंकिले भाळ ॥४॥

मांस अमंगळ श्वान इच्छितो

तद्वत राज्यहि मागत होतो

उन्मळला परि वंशवृक्ष तो

व्यर्थ यत्न झाला ॥५॥

अपात्र मी घेण्या सिंहासन

रक्ताने लांछित कर निर्घृण

क्षत्रहानिचा शोकही दारुण

जाळी ह्रदयाला ॥६॥

खेळविले ज्यांनी मज अंकी

अमुचे हित ते भीष्म चिंतती

अल्पजिवी राज्याच्या साठी

वधिले त्या गुरुला ॥७॥

दुर्योधन हट्टासि पेटला

रणी ओढले त्याने मजला

देई ना मज राज्यांशाला

मला लोभ सुटला ॥८॥

नको अशी राज्याची प्राप्ती

श्रेष्ठ याहुनी भिक्षावृत्ती

नको कलंकित ही संपत्ती

काय मोह पडला? ॥९॥

सोडुन प्रियजन राज्यसुखांणा

तप करण्या जाईन मी वना

पावन करितो या हातांना

जये घात केला ॥१०॥

सोपवितो मी संतोषाने

राज्य तुला हे पाळ सुखाने

सांभाळी सर्वास प्रीतिने

दुःखी मातेला ॥११॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel