’पांडवांचा वध करणार नाही’ या अटीवर भीष्मांनी सेनापतिपद घेतले होते. शत्रुपक्षाकडील दहा सहस्त्र योद्धे व अनेक रथी युद्धकाळात रोज ते ठार करीत होते. त्यांचा प्रताप केवळ अलौकि होता. एक वेळ अशी आली की अर्जुनाचेही त्यांच्यापुढे काही चालेना. ते पाहून कृष्ण रथातून उतरुन त्यांच्यावर धावून गेला. अर्जुनाने त्याची प्रार्थना केली ’हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा तू मोडू नकोस’ असे सांगून त्याला रथात परत आणले. शेवटी अगतिक होऊन कृष्णाच्या सल्ल्याने पांडवांनी भीष्मांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या मृत्यूचा उपाय सांगण्यासाठी विनंती केली. भीष्मांनी सांगितले की ते स्त्री योद्‌ध्याशी लढणार नाहीत. तसेच त्यांचे पतन झाल्याशिवाय पांडवांना विजय मिळणे शक्य नाही. पांडवांकडे शिखण्डी हा वीर असा होता की जो स्त्री म्हणून जन्मला व पुढे त्याला पुरुषत्व प्राप्त झाले. कृष्णाने रात्री मसलत करुन शिखण्डीला पुढे करुन त्याच्या मागून अर्जुनाने पितामहांशी लढा द्यावा असे ठरविल. दहाव्या दिवशी भयंकर रणधुमाळी माजली. भीष्म मध्यान्हीच्या सूर्याप्रमाणे तळपत होते. शिखण्डी समोरुन बाण सोडीत होता. त्याला पाहताच आपल्या व्रताप्रमाणे भीष्मांनी त्याच्यावर वार करणे बंद केले. अर्जुनाने शिखण्डीच्या आडून त्यांच्यावर शरवृष्टी केली; त्यांनी अर्जुनाचे मर्मभेदी वार ओळखले. बाणांनी जर्जर होऊन भीष्म रथातून खाली पडले. सगळीकडे रणांगणात हाहाःकार झाला. युद्ध अचानक थांबले. त्यांच्यासाठी शरशय्या रचण्यात आली व ते तेथे उत्तरायणाची वाट पहात राहिले.

भीष्मपतन

जे अवध्य होते जगी तिन्ही

ते भीष्म पितामह पडति रणी ॥धृ॥

सेनापतिचे युद्ध भयंकर

भीष्मपराक्रम दारुण दुर्धर

प्राण भयाने सैन्यहि जर्जर

जाहला कृष्ण दिङ्‌मूढ मनी ॥१॥

नवव्या रात्री रचिले डावा

कृष्ण धाडितो ज्येष्ठ पांडवा

लागु न दिधला कुणा सुगावा

जाणण्या तयांचे मर्म झणि ॥२॥

भीष्म सांगती नियम आपुला

"स्त्रीशी लढणे मान्य ना मला

टाकिन हातातिल शस्त्राला"

कृष्णास दिसे पथ त्याच क्षणी ॥३॥

नृपे डिवचिले सेनानीला

"पांडवस्नेहा आपण आवरा

माझ्यासाठी लढा द्या खरा"

ऐकता भीष्म हे व्यथित मनी ॥४॥

पार्थ टाकि शर भीष्मांवरती

ठेवि शिखण्डिस अपुल्यापुढती

शिखण्डिचे शर सहज झेलती

दाटला क्रोध त्यांच्या नयनी ॥५॥

आठवे त्यांना ते स्त्रीत्वाचे

पूर्ववृत्त त्या द्रुपदसुताचे

रथी टाकिले शस्त्र हातिचे

ते स्वस्थ उभे कुरु-शिरोमणी ॥६॥

एकामागुन शर ते शिरती

कवच फोडुनी देही रुतती

पार्थ बाण उरि बसला अंती

कोसळे गिरी जणु रथातुनी ॥७॥

अजिंक्यतारा कसा निखळला

नभाचाच जणु श्वास रोखला

अवचित तो संग्राम थांबला

मावळे सूर्य हा रणांगणी ॥८॥

निधन गृहातिल शाप क्षत्रिया

म्हणुन ठेविली तिथेच काया

शराशरांची करुन शय्या

पहुडले तिथे इच्छामरणी ॥९॥

सांगति सर्वा द्या मज पाणी

अर्जुन स्नेहे येत धावुनी

जल काढी तो बाण मारुनी

तयांचे नेत्र येत भरुनी ॥१०॥

त्यासम योद्धा नसे भूमिवर

ज्ञानाचा जणु मेरु गिरिवर

सर्व रणांगन जणु शोकाकुल

धरेवर देवच होता कुणी ॥११॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel