भीष्मांना रणांगणाच्या सरहद्दीवर शरशय्येवर ठेवण्यात आले. सर्व कौरव-धुरिणांवर आघात झाला. पृथ्वी कंपायमान झाली. आकाशातून शब्द ऐकू आले की गांगेय दक्षिणायनात कसे बरे प्राण सोडीत आहेत. भीष्मांची शरशय्येवरुन उत्तर दिले----’उत्तरायणापर्यंत मी प्राण धारण करीन.’ अर्जुनाचे त्यांनी कौतुक केले. दुर्योधनालाही तह करण्याचा सल्ला दिला. सर्वत्र नैराश्याचे वातावरण होते. कर्णाला त्यांच्या पतनाने फार वाईट वाटले. जरी त्यांनी कर्णाला बर्‍याचवेळा फटकारले होते, अर्धरथी म्हटले होते तरी कर्णाच्या मनात त्यांच्याबद्दल खरा आदर होता. तो त्यांच्या भेटीस आला. त्याने वाकून नमस्कार केला. त्यांचा आशीर्वाद त्याने मागितला. या अखेरच्या भेटीत भीष्मांनी त्याला जवळ घेऊन आपले मनोगत व त्याचे जन्मरहस्य त्याला सांगितले. तो अर्जुनाइतका प्रतापशाली आहे व खरोखर दानशूर आहे. त्याला आपण मुद्दाम कमी लेखीत आलो; नाहीतर कौरवपांडवात अधिकच फूट पडली असती. त्यांचे आशीर्वाद घेऊन तो परतला ते युद्धात भाग घेण्यासाठी !

भीष्म-कर्ण-भेट

आज मनातिल सर्व सांगतो, कर्णा तुज शेवटी ॥धृ॥

ज्ञात तुला मी इच्छामरणी

पडलो होउन विद्ध मी रणी

करिन प्रतिक्षा शुभ-अयनाची, शरशय्येवरती ॥१॥

सूतपुत्र तू नच राधेया

पांडव असशि तू कौंतेया

कुंतीचे ते पाचहि पांडव, बंधु तुझे ठरती ॥२॥

नारद व्यासाकडून कळले

आजवरी मी गुप्त ठेविले

सख्य करी बंधुंशी सत्वर, त्यात मला शांती ॥३॥

क्षात्रतेज जरि तुझे आगळे

परी तुला मी कमी लेखिले

अर्धरथीही तुला ठरविले, एक भयापोटी ॥४॥

कौरव पांडव या भावांतिल

वाढावी नच दुही मनातिल

कठोर बोलुन तुला दुखविले, द्वेष नसे चित्ती ॥५॥

पांडवांस तू कडू बोलला

म्हणून तेजोवध मी केला

सत्य सांगतो स्नेहभावना, मनी सदा होती ॥६॥

राजपुरी तू केले कंदन

रणी घेतले राजे जिंकुन

जरासंधही तूच जिंकला, बाहुबलावरती ॥७॥

दुःसह असशी तू शत्रुंना

प्रतापात तू तुल्य अर्जुना

दानांमधले नाव तुझे रे श्रेष्ठ असे जगती ॥८॥

कुला रक्षिण्या सदैव झटलो

युद्ध विनाशी टाळु न शकलो

इच्छामरणी परि इच्छांची झाली नच पूर्ती ॥९॥

अंत होउ द्या या वैराचा

होम पुरे हा या जीवांचा

रणांगणातिल ठरु दे माझी शेवटची आहुती ॥१०॥

सूर्यनंदना क्षमा मागशी

लढण्याची तू इच्छा धरिसी

स्वर्गप्राप्तीसाठी लढ तू, देई मी अनुमती ॥११॥

आज मनीचा कोप लोपला

नृपकार्यास्तव जा लढण्याला

यत्‍न, पराक्रम ठरती निष्फळ दैवगती-पुढती ॥१२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel