वनात राहात असताना पांडवांनी खडतर जीवनाला तोंड दिले. कौरवांकडे भीष्म, द्रोण, कर्ण असे अस्त्रवेत्ते होते; त्यांचे हे सामर्थ्य लक्षात घेऊन अर्जुनाने शंकराकडून पाशुपतास्त्र व स्वर्गास जाऊन इंद्राकडून अनेक अस्त्रांची प्राप्ती करुन घेतली. इकडे दुर्योधनाने वेगळाच कुटिल डाव रचला. लव्याजमासह वनात जाऊन आपले राजवैभव पांडवांपुढे मिरवावे व लक्ष्मीशून्य अशा त्यांना लज्जित करावे व त्यांची मानहानी करावी अशा उद्देशाने तो वनात गेला. त्यासाठी त्याने गोशाला व गुरे तपासण्याची सबब पुढे केली. तो एका सरोवरापाशी आला. तिथे आधीच गंधर्व जलक्रीडा करीत होते. दुर्योधनाची आज्ञा त्यांनी मानली नाही. त्यातून युद्धाला सुरवात झाली. दुर्योधन पकडला गेला. पांडवांना हे कळल्यावर अर्जुनाने तेथे येऊन गंधर्वांशी युद्ध केले. त्यांचा पराभव करुन दुर्योधनाला सोडविले. दुर्योधनाला पांडवांनी वाचविले. तो लज्जित झाला. त्याचीच या प्रकरणात मानहानी झाली.

दुसरे पांडवांवर संकट आणले ते जयद्रथाने. पांडव मृगयेला गेलेले पाहून जयद्रथाने द्रौपदीला एकटे पाहून तिचे अपहरण केले. पुढे पांडव तिचा शोध घेत तेथे आले व त्यांचे त्याच्याशी युद्ध झाले. त्याला कैद करुन युधिष्ठिरासमोर उभे केले. त्याने क्षमा मागितल्यावर त्याला अवमानित करुन सोडून देण्यात आले.

 

द्रौपदीचे अपहरण

पांडवांनी भोगिली दुःखे वनीची दारुण

सत्पथासी सोडिले ना चालता काटयांतुन ॥१॥

राहिले अज्ञातवासी ते विराटाच्या गृही

मेघछादित भास्करासम लपवुनी निजतेजही ॥२॥

दीर्घ होता काळ वनिचा वर्ष बारा सोसणे

जो सुखातुन येई दुःखा, यातनामय ते जिणे ॥३॥

रत्‍नमाणिक लेवुनी जे चांदण्यातुन चालले

वल्कले नेसून ते वनि कुटिनिवासी जाहले ॥४॥

पांडवांना वनप्रदेशी धौम्य होते मदतिला

द्रौपदीची साथ खंबिर, धीर कधि ना सोडला ॥५॥

द्वैत काम्यक - गंधमादन गिरि - महेंद्री राहिले

राम नल - आख्यान ऐकत तीर्थक्षेत्रा पाहिले ॥६॥

भीष्म द्रोणादी रथींची अस्त्रशक्‍ती जाणुन

स्वयसाची दिव्य अस्त्रे मिळवि स्वर्गी जाउन ॥७॥

कुरुपती येई वनासी दुष्ट हेतू ठेवुनी

गौळवाडयांचे निरीक्षण हा बहाणा सांगुनी ॥८॥

दैन्यपीडित वल्कलातिल हिणविण्यास्तव पांडवा

राक्षसी आनंद घेण्या, दावुनी निज वैभवा ॥९॥

दुखविले गंधर्व तेथे, युद्ध त्यातुन जाहले

शत्रुने केले पराजित कुरुपतीला पकडले ॥१०॥

घोर हा अपमान कथिला सैनिकांनी पांडवा

अर्जुनाने रिपुस जिंकुन सोडवीले कौरवा ॥११॥

पांडवांचे साह्य घेउन वाचला दुर्योधन

बोचले हे शल्य त्याला जाहले दुःखी मन ॥१२॥

काळ ऐसा जात असता क्लेशकर घटनासवे

दुःशलेचा पति जयद्रथ आणितो संकट नवे ॥१३॥

एकदा मृगयेस गेले दूर कुंतिसुत वनी

सिंधुपति कृष्णेस पाही एकटी ती त्याक्षणी ॥१४॥

नेइ तिजला निज रथातुन, तेथवा ते परतती

वृत्त कळता, क्षुब्ध होउन शोध घेतच धावती ॥१५॥

ठार करिती सैनिकांना, सोडुनी रथ तो पळे

गाठुनी त्या बंदि करिती, युद्धजर्जर कळवळे ॥१६॥

’दास तुमचा’ तो म्हणाला म्हणुन त्या माफी दिली

पाट काढुनि सोडिले त्या, द्रौपदी संतोषली ॥१७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel