कृष्णाच्या प्रभावी भाषणानंतर परशुराम, कण्व, नारद या मुनींनी दुर्योधनाला मार्गदर्शन केले. परशुरामाने सांगितले की अर्जुन आणि श्रीकृष्ण हे पूर्वीचे नर-नारायणच आहेत. त्यांना जिंकता येणे शक्य नाही. नारद व कण्व यांनीही मोठया राजांची उदाहरणे देऊन दुर्योधनाला समजावले. धृतराष्ट्रानेही यापूर्वी दुर्योधनाला सांगितले होते की त्याने दुराग्रहाने युद्धावर पाळी आणू नये.कृष्णाला त्याने सांगितले की आपण पराधीन आहोत व दुर्योधन मुळीच ऐकत नाही. कृष्णाने पुन्हा दुर्योधनाला उपदेश केला. ’पांडवांशी समेट करणे धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, विदुर व इतरांनाही हितावह वाटत आहे. तू दुष्ट बुद्धीने वागू नको. तुझा राज्याचा लोभ कमी कर. पांडवांना कमी लेखू नको. युद्धात अर्जुनाला व भीमाला कोणीही तोंड देऊ शकणार नाही. सारासार विचार करुन शमाचा स्वीकार कर.’ त्यावर दुर्योधनाने उत्तर दिले. त्याने म्हटले की सर्वजण त्याला निष्कारण दोषी धरीत आहेत. द्यूत धर्माला प्रिय म्हणून तो खेळला. त्याचा पराजय झाल्यावर वनात जाणे भाग आले. ’मी कुणालाही भीत नाही. युद्ध हा क्षत्रियांचा धर्म आहे. युद्धात आम्ही जिंकू किंवा हरु. मेलो तरी आम्हाला स्वर्ग मिळेल. मी पांडवांना राज्यांश देणार नाही. एवढेच काय मी जिंवंत असेपर्यंत त्यांना सुईच्या अग्राइतकी भूमीही परत देणार नाही.’

दुर्योधनाचे उत्तर

ज्येष्ठ सर्व का मलाच बोल लाविता ?

समजेना परि माझा दोष कोणता ? ॥धृ॥

कृष्णा करितोस सदा

पार्थस्तुति कुरुनिन्दा

गैर काय केले मी सांग एकदा ॥१॥

पार्थ म्हणे अतीरथी

क्षुद्र कुरु त्यापुढती

पक्षपात यात दिसे, देवकीसुता ॥२॥

धर्मा रुचि द्यूताची

राज्य पणा लावि तोचि

गेले ते इंद्रप्रस्थ, डाव हारता ॥३॥

हार-जीत फाशांवर

जिंके तो बलवत्तर

यात मला का कपटी तुम्ही ठरविता ? ॥४॥

राज्य, वित्त ते हरले

वनी वनी ते फिरले

द्यूताचे मिळते हे फळ पराजिता ॥५॥

शौर्याची स्तुतिगाने

भीमबलाची कवने

भय मजला शक्‍तीचे व्यर्थ दाविता ॥६॥

कर्णासह भीष्म द्रोण

यांसम जगि असे कोण ?

देवासहि ते अजिंक्य हे यदुनाथा ॥७॥

समर धर्म क्षत्रियास

रणाचीच धरु कास

स्वर्ग मिळे रणाङ्‌गणी देह ठेविता ॥८॥

वडिलांनी जो त्याला

पूर्वी राज्यांश दिला

त्यावरती अता कसा हक्क सांगता ? ॥९॥

जोवर या कुडित प्राण

ऐकुन घे यदुनंदन

राज्य कधी नच देइन, पाण्डुच्या सुता ॥१०॥

सुई-अग्राइतुकी मी

नच देइन त्या भूमी

ठेविन मी सत्ता ही हाती सर्वथा ॥११॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel