राजसूय यज्ञ करुन युधिष्ठिराने सम्राट म्हणून मान्यता मिळविली. त्या यज्ञाची सर्व व्यवस्था करताना त्याने अर्जुनादी भावांना, दुर्योधनाला वेगवेगळ्या कामांवर नेमले होते. त्यात दुर्योधनाला राजाला इतरांकडून मिळणारे रथ, अश्व, रत्‍न, सुवर्ण इतर नजराणे हे स्वीकारण्यासाठी नेमले होते. ही संपत्ती धर्माला इतक्या मोठया प्रमाणावर मिळाली की तिचा जणू डोंगर तयार झाला व त्याच्या आड राजा युधिष्ठिरही त्याला दिसेनासा झाला. त्यानंतर दुर्योधनाने अवर्णनीय अशी मयसभा पाहिली. ती स्फटिकांनी व विविध रत्‍नांनी बनविली होती. ती पाहताना जमिनीच्या जागी पाणी व जलाच्या ठिकाणी जमीन भासायची. त्यामुळे तिथे चालताना दुर्योधनाची फजिती झाली. सर्व पांडव त्याला हसले. हा अपमान त्याच्या वर्मी बसला.

दुर्योधन मयसभेत

सोन्याच्या राशि बघुन थक्क जाहला ।

धार्तराष्ट्र मय-निर्मित पाहि सभेला ॥धृ॥

झाला मख तो अपूर्व

नृप होती स्तिमित सर्व

सात्वतवर त्वरे निघे द्वारवतीला ॥१॥

अद्‌भुत ती सभा असे

कौरवनृप पाहतसे

रत्‍नांच्या तेजाने दिपवि दृष्टिला ॥२॥

स्फटिक असे त्या स्थानी

जल भासे त्यास मनी

वस्त्र उंच करुन जाई-भीम हासला ॥३॥

स्फटिकांचा डोह असे

नृपा परी भूमि दिसे

वस्त्रानिशि पडुन जळी चिंब जाहला ॥४॥

माद्रिपुत्र भीमार्जुन

हसले त्या, ते पाहुन

नववस्त्रे आणुन देत, हसुन तयाला ॥५॥

अन्य स्थळी फसति नयन

मोकळेच दिसे स्थान

दार तिथे त्यावरती देह आपटला ॥६॥

सेवकजन हे पाहुन

हसले त्या खदखदून

दुःख नृपा झाले त्या, खजिल जाहला ॥७॥

जळजळ ही हृदयातिल

येई उसळून प्रखर

प्रवासात एकांती वदे शकुनिला ॥८॥

धर्माचा तो गौरव

ती सत्ता, ते वैभव

सहवेना क्षणभरही मला, मातुला ॥९॥

वधिले त्या शिशुपाला

गुन्हा तयाचा कुठला ?

क्रूरकृत्य करणारा कुणि न निंदिला ॥१०॥

उदय नित्य शत्रूचा

सतत र्‍हास परी अमुचा

दैव श्रेष्ठ व्यर्थ गमे पौरुष मजला ॥११॥

घ्यावि उडी रे अग्नित

द्यावा जिव वा जळात

विटलो मी,सुबलसुता,अशा जिण्याला ॥१२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel