पांडव वनवास भोगण्याकरिता वनप्रदेशात आले. त्यांनी द्वैतवनात राहाण्याचे ठरविले कारण ते वन फळाफुलांनी व वनसंपत्तीने बहरलेले होते. वनात राहात असताना युधिष्ठिर ऋषिमुनींचे, श्रेष्ठ ब्राह्मणांचे अतिथ्य करीत असे. पुरोहित धौम्य त्यांच्याबरोबर होते, ते पांडवांचे याग, पितृकर्मे करीत असत. अनेक सुहृद, वृष्णि अंधक यांचे वंशज कृष्णासह पांडवांच्या भेटीस वनात आले. कृष्ण शाल्वाशी युद्ध करण्यात दीर्घकाळ गुंतला होता म्हणून द्यूतप्रसंगी त्याला येता आले नाही; अन्यथा हे सर्व त्याने घडूच दिले नसते. द्रौपदीने कृष्णापुढे तिच्या व्यथा मांडल्या; अश्रू ढाळीत हृदय मोकळे केले. कृष्णाने तिला आश्वासन दिले की कौरवांचा रणात निःपात होईल व ती पुन्हा राजवैभव भोगेल. मार्कंडेय तसेच बक मुनी आले; त्यांनीही युधिष्ठिराला या संकटात सत्यनिष्ठ राहायला सांगितले व तो पराक्रमाने सर्व परत मिळवील असे सांगितले. काही काळ लोटल्यावर द्रौपदीस आपले क्लेश सहन होईना. पांडवांसमवेत बोलत असताना तिने युधिष्ठिरावर टीका करुन आपला संताप व्यक्‍त केला.

द्रौपदीचा संताप

वैभव गेले, राज्यहि गेले, सर्व काहि द्यूतात

नृपाळा, गेले एक क्षणात ॥धृ॥

असह्य दुःखे अमुची पाहुन

व्यथित नसे तो मुळी सुयोधन

कठोर बोलुन उलट करी तो मर्मावर आघात ॥१॥

वनात निघता अजिन नेसुनी

पितामहांच्या नयनी पाणी

लोहहृदय त्या सुयोधनाच्या होता हर्ष मनात ॥२॥

कशास राजा द्यूत खेळला ?

हेतू कपटी कसा न कळला ?

दुःखे ही जन्माची लिहिली होती का नशिबात ? ॥३॥

होते र‍त्‍नांचे सिंहासन

आज तुझे परि तृणमय आसन

दुर्दैवाचा फेरा पाहुन मनी उठे आकांत ॥४॥

सहस्त्रबाहूसम ज्या कीर्ती

श्रेष्ठ धनुर्धर जगात ख्याती

बसे बघत तो नभात अर्जुन, तरी कसा तू शांत ? ॥५॥

सम्राज्ञी मी राजकुलाची

पतिव्रता भार्या पाचांची

क्रोध कसा ना येई पाहुन वनी मला दुःखात ? ॥६॥

तुमच्या अंगा लेप चंदनी

आज लिप्त ते धूलिकणांनी

हीन आपुली दशा कोणत्या सांगू मी शब्दात ? ॥७॥

कपट, अनीती दूर ठेविली

कास सदा सत्याची धरली

जपले धर्मा, तरि धर्माने नाहि दिला तुज हात ॥८॥

क्षमा कशासी अशा शत्रुवर

मारण्यास जो होता तत्पर

चाल करुन क्रोधाने त्याचा शीघ्र करावा घात ॥९॥

दिसती मज दुःखांचे डोंगर

नसे कुठे आशेचा अंकुर

विसरलास का नैराश्याने तू होता सम्राट ॥१०॥

क्षत्रिय नसतो कधी क्रोधहिन

तुझे परी हे उलटे वर्तन

बुद्धी ही विपरीत कशी तुज पाडितसे मोहात ? ॥११॥

अग्निस यज्ञामध्ये पुजिले

ज्या हातांनी वित्त वाटले

राज्य परत घेण्याची शक्‍ती आहे त्याच हातात ॥१२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel