द्रोणांनी पाच दिवस सेनापतिपद भूषविले. त्यानंतर युद्धाच्या सोळाव्या दिवशी कर्ण कौरवांचा सेनापती झाला. भीम आपल्या अचाट सामर्थ्याने रोज दहा ते अकरा कौरवांना कंठस्नान घालत होता. विकर्णाला मारल्यावर मात्र त्याला वाईट वाटले कारण तो दुष्ट नव्हता, सद्विचारी होता. कर्णाने दुर्योधनाला शल्य सारथी हवा म्हणून सांगितले. शल्याने कर्ण सूत असल्याने नकार दिला. पण दुर्योधनाने मध्यस्थी केल्यावर तो राजी झाला. शल्याने कर्णाचा पाणउतारा केला व धर्माला दिलेले वचन पूर्ण केले. कर्णार्जुन युद्ध सतराव्य दिवशी झाले. शल्याला कर्णाने आपल्याला मिळालेल्या दोन्ही शापांबद्दल सांगितले. परशुरामाला आपण ब्राह्मण आहोत असे खोटे सांगून कर्णाने दिव्य अस्त्र मिळविले. पण जेव्हा परशुरामाला तो सूत असल्याचे कळले तेव्हा त्याने शाप दिला की हे अस्त्र त्याला ऐन युद्धात आठवणार नाही. दुसरा शाप ब्राह्मणाकडून मिळाला होता. त्या ब्राह्मणाच्या होमधेनूचे वासरु कर्णाच्या हातून चुकून मारले गेले होते. त्याने शाप दिला की युद्धात त्याच्या रथाचे चाक पृथ्वी गिळील. कर्णार्जुन दोघेही तुल्यबळ होते. युद्ध अतिशय दारुण स्वरुपाचे झाले. कर्णाच्या सर्पमुखबाणाने अर्जुनाचा मुकुट पडला; कारण कृष्णाने घोडयांना गुडघ्यावर बसविले होते. नंतर निकराचे युद्ध होत असताना कर्णाला अस्त्र आठवेना व त्याच्या रथाचे चाक पृथ्वीत रुतले. रथाखाली उतरुन कर्ण ते चाक वर काढीत असताना अर्जुनाने प्रखर बाण मारला व कर्ण जागीच ठार झाला.

 

कर्णार्जुनयुद्ध

कर्णार्जुन लढले महाप्रतापी वीर

ते युद्ध अलौकिक दोघातिल घनघोर ॥धृ॥

शल्याने केला तेजोवध कर्णाचा;

तो क्रोध आवरुन विचार करि कार्याचा

स्वप्‍नी जे होते युद्ध होत साकार ॥१॥

दोघेही आले गर्जत, समरी भिडले

ते द्वन्द्‌व पाहण्या नभी देव अवतरले

दोघेहि धनुर्धर करिती भीषण वार ॥२॥

आठवे प्रतिज्ञा कर्ण आपुल्या चित्ती

करि जर्जर पार्था करुन शरांची वृष्टी

बाणांचा झाला मेघ नभी विक्राळ ॥३॥

अर्जून भासला कर्दनकाळ रणात

तो क्षणात टाकी सहस्त्रशर वेगात

आठवे प्रतिज्ञा, येई उसळुन वैर ॥४॥

सैनीक पाहती श्वास रोखुनी युद्ध

गज दोन झुंजती वनी जणू बेधुंद

शस्त्रास्त्रे भिडता ज्वाळा उठति अपार ॥५॥

चिंतेने बघती सूर्य सुरपती देव

घे भीषण रण ते हृदयाचा जणु ठाव

"हा बंधू अपुला" कर्णमनी काहूर ॥६॥

कर्णाने केला सर्प-शराचा वार

दडपला केशवे पाहुन रथ तत्काळ

शर भेदे मुकुटा; अर्जुन संकटपार ॥७॥

चवताळुन सोडी अस्त्र धनंजय तीव्र

परि क्षणात विसरे कर्ण अस्त्रसंभार

त्या शापच तैसा होता अटळ, कठोर ॥८॥

शरवृष्टी इतुकी कधि न कुणाला दिसली

ते तांडव बघता धरणी भयभित झाली

जणु शौर्य प्रकटले घेउन दोन शरीर ॥९॥

विप्राच्या शापे रुतले चाक रथाचे

ते मुळी हलेना, लावी बळ अंगीचे

पार्थाला सांगे---’थांब, धर्म तू पाळ’ ॥१०॥

क्रोधाने उसळुन बोले त्यासी कृष्ण

स्मर कपटद्यूत, तो कृष्णेचा अवमान

केला का तेव्हा सूता धर्मविचार ? ॥११॥

कर्णाचे झाले उदास मन त्यावेळी

झणि शर तो मारी पडले गाण्डिव खाली

धनु रथात टाकुन, काढि पुन्हा ते चक्र ॥१२॥

कृष्णाच्या शब्दे सज्ज होइ अर्जून

निःशस्त्र तयावर सोडि बाण मंत्रून

शर नव्हे वज्र ते - छेदि तयाचे शीर ॥१३॥

आकांत माजला पळती सैनिक दूर

ताराच निखळला, पसरे जणु अंधार

अर्जून जयाने झाला त्रिभुवन-वीर ॥१४॥

जणु वृक्षच पडला याचक-पक्षिगणांचा

जणु प्राण हरपला कौरवराजकुळाचा

धर्मास गवसले परी जयाचे दार ॥१५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel