फोन: 9421576069 / 8830770906
गीता जाणा हे वाङ्मयी। श्रीमूर्ती प्रभूची
ज्ञानेश्वरी हा गीतेवरील टीकाग्रंथ आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीस भगवद्गीता आधारभूत आहे. ज्ञानोबाराय महाभारताची आणि गीतेची महती जाणून होते. ज्ञानेश्वरीत अनेक अध्यायात त्यांनी गीतेची महती गायली आहे. गीतामहात्म्याचा आलेख सतत उंचावत गेला आहे. अठराव्या अध्यायामध्ये त्यांनी गीतेची महती कशी गायली आहे याचा परामर्श घ्यावयाचा आहे. ज्ञानेश्वरीतील अठरावा अध्याय हा कळसाध्याय असल्याचे ज्ञानेश्वर आवर्जून सांगतात. म्हणून या अध्यायात त्यांनी गायीलेली गीतेची महती जाणून घेतल्यास त्यांचा यासंबंधीचा विचार समजून घेता येतो.
जी गीतारत्नप्रासादाचा। कळसु अर्थ चिंतामणीचा।
सर्व गीतादर्शनाचा। पाढाउ जो ।। ज्ञा.अ.18.30
समर्थाचिये पंक्तिभोजनें। तळिल्या वरिल्या एक पक्वान्ने।
तेवीं श्रवणें अर्थे पठणें। मोक्षचि लाभे।। ज्ञा.अ.18.48
ऐसा गीता वैष्णवप्रासादु। अठरावा अध्याय कळसु विशदु।
म्यां म्हणितला हा भेदु। जाणोनिया ।। ज्ञा.अ.18.49
त्यांच्या मते हा अठरावा अध्याय म्हणजे गीतारूपी रत्नप्रासादाचा अर्थरूपी चिंतामणीने बनविलेला कळस आहे. या कळसामुळे संपूर्ण गीतेच्या दर्शनाचा प्रत्यय येतो. परंपरा असे मानते की मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले तरी देवाचे दर्शन झाल्याचा लाभ होतो. म्हणजे जर केवळ अठरावा अध्यायाचे जरी अध्ययन,चिंतन, मनन केले तरी समग्र भगवद्गीता वाचल्याचे पुण्य लाभते. म्हणून महर्षी व्यासांनी गीतेच्या कळसाध्यायाची रचना केलेली आहे. गर्भश्रीमंताच्या घरी खाली आणि वर बसलेल्या सर्व लोकांना एकाच प्रकारच्या पक्वानांचा लाभ होतो. त्याचप्रमाणे गीतेचे पठण करणारे, श्रवण करणारे आणि अर्थ लावणारे यांना एकाच प्रकारच्या मोक्षाचा लाभ होतो. गीता वैष्णवांचे मंदिर असून अठरावा अध्याय या मंदिरावरील कळस आहे. पुढेे ते म्हणतात की अठरावा अध्याय नसून एक अध्यायी गीताच आहे.(18.84) म्हणूनच श्रीकृष्णांनी गीता-समाप्तीच्या वेळी पुन्हा गीतेचा प्रारंभ केला आहे. एखादा तज्ज्ञ शिक्षक जसा एखादा विषय संपल्यानंतर षेवटी समग्र प्रकरणाचा आढावा घेतो, त्याच प्रकारे श्रीकृष्णांनी आदर्श गुरूंची भूमिका समर्थपणे पेलली आहे.
जे गीतार्थाचें चांगावे। मोक्षोपायपर आघवें।
आणि षास्त्रोपाय कीं नव्हे। प्रमाणसिद्ध।।ज्ञा.18.1230
मोक्षाचा संपूर्ण उपाय सांगणे हे गीतेचे मुख्य प्रयोजन आहे. म्हणून गीतार्थाला चांगलेपणा आहे. जी शास्त्रे गीतेला अनुसरत नाहीत ती शास्त्रे प्रमाणसिद्ध नाहीत. म्हणजे गीतेचा आधार घेतल्याशिवाय जर इतर शास्त्रे काही प्रतिपादन करीत असतील ते प्रमाण मानण्याचे कारण नाही. खालील ओव्यांद्वारे ज्ञानोबाराय भगवद्गीतचा महिमा, तिचे अनादीपण जसे प्रतिपादन करतात तसेच गीतेमध्ये वेदांचे सार आहे असेही सांगतात.
एवं वेदाचें मूळसूत्र।सर्वाधिकारैकपवित्र।
श्रीकृष्णें गीताशास्त्र। प्रकट केले।। ज्ञा.18.1426
येथ गीता मूळ वेदां।ऐसें पां केवीं आलें बोधा।
हें म्हणाल तरी प्रसिद्धा। उपप सांगो।। ज्ञा.18.1427
तरी जयाचां विश्वासीं। जन्म झाले वेदराशी।
तो सत्यप्रतिज्ञ पैजेसीं। बोलिला स्वमुखें।। ज्ञा.18.1428
म्हणौनि वेदां मूळभूत। गीता म्हणो हें होय उचित।
आणिकही येकी येथ। उपप असे।। ज्ञा.18.2429
जें न नशतु स्वरूपें। जयाचा विस्तारू जेथ लपे।
ते तयाचें म्हणिपे। बीज जगीं।। ज्ञा.18.1430
तरी कांडत्रयात्मकु। षब्दराशी अशेखु ।
गीतेमाजीं असें रूखु। बीजी जैसां।। ज्ञा.18.1431
म्हणौनि वेदांचें बीज। श्री गीता होय हें मज।
गमे आणि सहज । दिसतही आहे।। ज्ञा.18.1432
जें वेदांचे तिन्ही भाग। गीते उमटले असती चांग।
भूषणरत्नीं सर्वांग।शोभलें जैसें ।। ज्ञा.18.1433
श्रीकृष्णांनी याप्रमाणे वेदांचे सूत्ररूपाने असलेले मूळ रूप आणि सर्व अधिकारांचे जे अत्यंत पवित्र स्थान जे गीताशास्त्र प्रकट केले. ही गीता अनादी असून ती नित्यवेदाचे मूळ सूत्र आहे.हे आपल्या प्रत्ययास कसे आले असा प्रश्न श्रोत्यांच्या मनात असेल यास्तव त्यासंबधी अधिक विवरण देताना ज्ञानोबाराय म्हणतात की, ज्याच्या निःश्वासात वेदराशी उत्पन्न झाली, तो सत्यप्रतिज्ञ भगवान विष्णू प्रतिज्ञापूर्वक स्वमुखाने गीताशास्त्र सांगता झाला.गीता ही भगवंताच्या श्रीमुखातून अवतरलेली भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. गीतेच्या ष्वासातून वेद निर्माण झाले आहेत. म्हणून वेदाला गीता ही मूलभूत आहे. एखाद्या पदार्थाचा नाश न होता, त्याचा सर्व विस्तार ज्यात लयरूपाने साठविला जातो, ते त्या वस्तूचे बीज म्हणावे. जसा बीजात वृक्ष सूक्ष्म रूपाने असतो, त्याप्रमाणे कांडत्रयात्मक संपूर्ण वेदराशी गीतेत आहे. म्हणून वेदांचे बीज भगवद्गीता आहे. मानवी देह रत्नालंकारांनी षोभतो, त्याप्रमाणे वेदाचे कर्म, उपासना आणि ज्ञान हे तीन भाग गीतेत सुशोभितपणे प्रकट झाले आहेत. यावरून ज्ञानोबारायांना भगवद्गीता किती मोलाची वाटत होते याच प्रत्यय येतो. यानंतर ज्ञानोबारायांनी गीतेच्या प्रत्येक अध्यायात कोणते ज्ञान प्रकट झाले आहे, हे सांगितले आहे. ते म्हणतात की,पहिल्या अध्यापासून ते सतराव्या अध्यायापर्यंत भगवंतानी आपला जो निःश्वास जो वेद , तो उघड करून दाखविला आहे. त्या संपूर्ण अर्थाचा संक्षेपाने या अठराव्या अध्यायात अर्थ केला आहे.
एवं सकळसांख्यसिद्धी। श्रीभगवद्गीताप्रबंधु।
हा औदार्ये आगळा वेदु। मूर्त जाण।। ज्ञा.18.1456
वेदु संपन्न हाये ठाई। परी कृपणु ऐसा आनु नाहीं।
जे कानीं लागला तिहीं।वर्णाचांचि।। ज्ञा.18.1457
येरा भवव्यथा ठेलिया । स्त्रीशूद्रां प्राणियां।
अनवसरू मांडूनिया। राहिला आहे।। ज्ञा.18.1458
तरी मज पाहतां तें मागील उणंे। फेडावया गीतापणें।
वेदु वेठला भलतेणें। सेव्य होआवया। ज्ञा.18.1459
नव्हे अर्थे रिगोनि मनीं। श्रवणें लागुनि कानीं।
जपमिषे वदनीं। वसोनियां।। ज्ञा.18.1460
ज्ञानोबाराय म्हणतात की, श्रीमद्भगवद्गीतारूपी काव्यग्रंथ वेदाइतकाच उदार आहे. वेद हा मूळातच ज्ञानाने संपन्न आहे, तथापी त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणी नाही. कारण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांनाच वेदाध्यनाचा आणि श्रवणाचा अधिकार आहे. या तीन वर्णांशीच तो कानगोष्टी करतो. अन्य जे षूद्रादिक मानवी जीव आहेत,त्यांना वेदांच्या ज्ञानमंदिरात अध्ययनाचा आणि श्रवणभक्तीचा अधिकार नाही. यामुळे या जीवांवर भलताच प्रसंग ओढवला आहे. मला तर असे वाटते की, त्या प्राचीन काळाच्या दोषाचे परिमार्जन करण्यासाठी वेदच वेष बदलून भगवद्गीतेच्या रूपात प्रकट झाला आहे. भगवद्गीतेच्या रूपाने अर्थरूपाने अंतःकरणात शिरून, श्रवणाने कानी लागून आणि जपाच्या रूपाने मुखात राहून वेदच सर्व प्राणिमात्रांना भेटतो.
भगवद्गीता ज्यांच्या जवळ आहे, जे लोक ती वाचतात, श्रवण करतात किंवा तिचा जप करतात त्यांना कोणता लाभ होतो हे पुढील ओव्यांमधून ज्ञानेश्वर सांगत आहेत.
गीतेचा पाठु जो जाणे। तयाचेनि सांगातीपणे।
गीता लिहोनि वाहाणें।पुस्तक मिषें।। ज्ञा.18.1461
ऐसैसा मिकटा। संसारचा चोहटा।
मवादी घालीत चोखटा। मोक्षसुखाची।। ज्ञा.18.1462
परी आकाशीं वसावया। पृथ्वीवरी बैसावया।
रविदीप्ती राहाटावया। आवारू नभ।। ज्ञा.18.1463
तेवीं उगम अधम ऐसें। सेवितां कवणातेंही न पुसे।
कैवल्यदानें सरिसें। निववीत जगा।।ज्ञा.18.1464
यालागीं मागिलीं कुटी। भ्याला वेदु गीतेचां पोटी।
रिगाला आतां गोमटी। कीर्ति पातला।। ज्ञा.18.1465
म्हणौनि वेदाची सुसेव्यता।ते हे मूर्त जाण श्रीगीता।
श्रीकृष्णे पांडुसुता । उपदेशिली ।। ज्ञा.18.1466
परी वत्साचेनि वोरसें। दुभतें होय घरोद्देशे।
जालें पांडवाचेनि मिषे। जगदुद्धरण।ं। ज्ञा.18.1467
चातकाचिये कणवें। मेघु पाणियेंसि धांवे।
तेथ चराचर आघवें। निमालें जेवीं।। ज्ञा.18.1468
कां अनन्यगतीकमळा-। लागीं सूर्य ये वेळोवेळां।
कीं सुखियां होईजे डोळां। त्रिभुवनींचां।। ज्ञा.18.1469
तैसें अर्जुनाचेनि व्याजें। गीता प्रकाशुनि श्रीराजें।
संसाराएवढें थोर ओझे। फेडिलें जगाचें।। ज्ञा.181470
सर्वशास्त्ररत्नदीप्ती। उजळिता हा त्रिजगतीं।
सुर्यु नव्हे लक्ष्मीपती-। वक्त्राकाशींचा।। ज्ञा.18.1471
बाप कुळ तें पवित्र।जेथिचां पार्थु या ज्ञाना पात्र।
जेणें गीता केलें स्वतंत्र। आवारू जगा।। ज्ञा.18.1472
भगवंतानी स्वमुखाने सांगितलेल्या गीतेवर ज्ञानोबारायांचे अपार प्रेम आहे. म्हणूनच गीतेचे गुणगान करतांना त्यांच्या प्रतिभेला स्फूर्ती येते. गीता कोणत्याही स्वरूपात ज्याच्याजवळ असते त्याला ती लाभकारकच ठरते असा त्यांचा विश्वास आहे. गीतेचा पाठ जाणणारा असेल तर त्याच्या संगतीत राहून आणि ती लिहून पुस्तकरूपाने जो बाळगतो त्यालाही गीता लाभदायक ठरते. संसाराच्या चव्हाट्यावर मोक्षरूपाचे अन्नसत्र प्रत्यक्ष वेदच गीतेच्या रूपाने घालीत आहे. आकाशात राहाण्याला, अथवा पृथ्वीवर बसण्याला आकाश हेच जसे आवार असते. त्याप्रमाणे गीता हा ग्रंथ कोणाहीजवळ असला, मग तो उगम आहे, का अधम याचा विचार न करता, सर्वांना समान लेखून गीता कैवल्यसुखाचे दान करून जगाला षांत करते.म्हणून वेद मागच्या कृपणपणाच्या अपकीर्तीला घाबरला आणि वेदांनी गीतेच्या पोटात प्रवेश केला. त्यामुळे तो आता चांगल्या नावलौकिकाला प्राप्त झाला. लोक आता वेदांना तो चांगला आहे अशी भलावण करीत आहेत. वेदांचे सुसव्य रूप म्हणजे गीता होय, जी गीता प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण्णाने अर्जुनाला सांगितली व तिच्या माध्यमातून उपदेश केला आहे. गाय वासराच्या लोभाने आणि प्रेमाने पान्हा सोडून दूध देते, ते दूध घरातील सर्व लोकांच्या उपयोगास पडते. त्याच प्रकारे पांडवांच्या योगाने म्हणजे अर्जुनाच्या योगाने गीता विशद केली गेली, तिचा लाभ सर्व जगाला झाला.चातकाच्या करूणेने मेघ धाव घेतात पण त्यामुळे सर्व चराचर तृप्त होते. अन्य आधार नसलेल्या कमलपुष्पासाठी सूर्य दररोज उदयाला येतो, त्यामुळे सर्व जगाला प्रकाशाचा लाभ होतो. जगाच्या डोळ्यांचे त्या प्रकाशाने पारणे फिटते. अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपती श्रीकृष्णाने जगाचे जन्ममरणाएवढे ओझे दूर केले आहे. सर्व षास्त्ररूपी रत्नांच्या प्रकाशाला तिन्ही लोकात प्रकाशित करणारा हा गीता ग्रंथ लक्ष्मीपती श्रीकृष्णाच्या मुखरूपी आकशातला गीतारूपी सूर्य नाही काय? गीताज्ञानाला योग्य झालेला अर्जुन आणि त्याचे कुल धन्य होय.अर्जुनाने मोक्षसुख भोगण्यासाठी विश्वाच्या भोवती स्वतंत्र आवार केले आहे. या वर्णनातून आपल्या असे लक्षात येते की, अनेक प्रतीमांच्याद्वारे ज्ञानोबाराय गीतेचे गुणगान गात आहेत. हे गुणगान करताना ते अत्यंत आनंदात आहेत आणि आपल्या सुंदर विवेचनातून ते वाचकाला आनंदाचा प्रत्यय देतात. अर्जुनाला तर गीतेच्या रूपाने अक्षय ठेवाच प्राप्त झाला आहे.
मोक्षसुख सहजपणे प्रदान करणारे हे गीताशास्त्र कूणाला सांगावे आणि कुणाला याच्यापासून दूर ठेवावे याचेही सूत्र ज्ञानदेवांनी खालील ओव्यांमधून विशद केले आहे.
तरी तुवां हें जें पार्था।गीताशास्त्र लाधले आस्था।
ते तपोहीना सर्वथा। सांगावें ना हो।। ज्ञा.18.1486
अथवा तापसुही जाला। परी गुरूभक्तीं जो ढीला।
तो वेदीं अंत्यजु वाळिला। तैसा वाळी।। ज्ञा.18.1487
नातरी पुरोडाशु जैसा। न घापे वृृद्ध तरी वायसा।
गीता नेदी तैसी तापसा।गुरूभक्तिहीना।। ज्ञा.18.1488
कां तपही जोडे देहीं। भजे गुरूदेवांचां ठायी।
परी आकर्णनीं नाहीं। चाड जरी।। ज्ञा.18.1489
तरी तो मागील दोहीं आंगीं।उगम होय कीर जगीं।
परी या श्रवणालागी। योग्यु नोहे।। ज्ञा.18.1490
मूक्ताफळ भलतैसें। हो परी मुख नसे।
तंव गुण प्रवेशे। तेथ कायी।। ज्ञा.18.1491
सागरू गंभीर होये। हें कोण ना म्हणत आहे।
परी वृष्टी वायां जायें। जाली तेथ।। ज्ञा.18.1492
धालियाा दिव्यान्न सुवावें । मग जें वायां धाडावें।
तें आर्तीं कां न करावें। उदारपणे।। ज्ञा.18.1493
म्हणौनि योग्य भलतैसे। होतु परी चाड नसे।
तरी झणें वानिवसें। देसी हें तयां।। ज्ञा.18.1494
रूपाचा सूजाण डोळा। वोडवूं ये कायि परिमळा।
जेथ जें माने तें फळा। तेथचि ये गा।। ज्ञा.18.1494
म्हणौनि तपी भक्ति। पाहावे ते सुभद्रापती।
परी षास्त्रश्रवणीं अनासक्ति। वाळावेचि ते।।ज्ञा. 18.1495
नातरी तपभक्ति। होऊनि श्रवणी आर्ती।
आथी ऐसेही आयती।देखसी जरी।। ज्ञा.18.1496
तरी गीताशास्त्रनिर्मिता। जो सकळलोकशास्ता।
तया माते सामान्यता। बोलेल जो।। ज्ञा.18.1497
अर्जुनाने खूप पुण्य केले आहे म्हणून तो गीतारूपी श्रेष्ठ षास्त्र ऐकण्यास पात्र झाला आहे. म्हणून त्याने याच षास्त्राचा संप्रदाय अंगीकारून त्याचे योग्य आणि चांगल्या प्रकारे आचरण केले पाहिजे. श्रीकृष्ण असेही म्हणतात की, हे अर्जुना हे गीताशास्त्र तुला आस्थेने प्राप्त झाले आहे, ते तपोहीन मनुष्याला मुळीच सांगावयाचे नाही. एखादा माणूस तपी असेल, पण त्याला जर गुरूभक्तीमध्ये रस नसेल तर त्याचा त्याग करावा. त्याला गीताशास्त्र सांगू नये. कावळा जरी वृद्ध असला तरी त्याला यज्ञाचा अवशेष प्रसाद घालीत नाहीत. तसे जो माणूस कितीही तपी असेल पण जर तो गुरूभक्तिहीन असेल तर त्याला गीताशास्त्र सांगू नये. एखाद्याने तप केले, तो गुरूंची आणि देवाची भक्तीही करतो, पण त्याला जर ऐकण्याची इच्छा नसेल, तर तो या दोन गुणात जरी असेल, तरीही तो गीताश्रवणास अपात्र आहे. मोती उगम असेल पण त्याला जर छिद्र नसेल तर त्यात जशी सोन्याची तार घालता येत नाही. समुद्र धीरगंभीर असतो याचा नकार कुणी करेल काय? परंतु सागरावर पाऊस पडला तर तो व्यर्थ ठरतो.तृप्त झालेल्या माणसाला दिव्यान्न वाढल्यास ते वाया जाते. मग उदारपणे ते अन्न भुकेल्या माणसास का देऊ नये? म्हणून इतर बाबतीत कितीही योग्य असला तरी, त्याला श्रवणाची आवड नसेल तर त्याला गीताशास्त्र मुळीच सांगू नये. डोळा रूपविषयाला चांगल्या प्रकारे जाणतो,हे खरे, पण सुवास घेण्यासाठी त्याचा उपयोग नसतो. योग्य ठिकाणीच फलप्राप्ती होते.म्हणून ज्यांना गीता सांगावयाची असेल ते तपस्वी व गुरूभक्त आहेत हे तर पाहावेच, पण त्यांच्या ठिकाणी गीताशास्त्र श्रवण करण्याची इच्छा नसेल तर त्यांना गीताशास्त्र सांगू नये. पण या तिन्ही गोष्टी त्याच्याजवळ असतील, पण तो जर गीताशास्त्र निर्माण करणारा आणि सर्व लोकांचे नियमन करणारा जो श्रीकृष्ण त्याला जर सामान्य समजेल तर तो गीताशास्त्र सांगण्यास योग्य नाही. मला व माझ्या भक्तांना जे लोक दुष्टपणाने बोलतात ते गीता श्रवणास योग्य नाहीत. असा माणूस म्हणजे दिव्यावाचून रात्रीची जशी ठाणवई असते तसे समजावे.देह गोरा व अलंकार घातलेला आहे पण त्यात जर प्राण नसेल तर तो देह जसा रिक्त असतो त्याप्रमाणे असा माणूस समजावा. अशा विविध प्रकारांनी गीतशास्त्र श्रवण करण्यासाठी माणसाची पात्रता काय असावी याचे विवरण ज्ञानोबारायांनी केले आहे.
ज्ञानोबाराय पुढे असे सांगतात की, वरील निकषांना पात्र असलेल्या चोखट भक्तास भगवद्गीता हाच कोणी रत्नांचा ईश्वर, असे समजून त्याची प्राणप्रत्ष्ठिा कर. असे केल्यास तू जगात माझ्या योग्यतेला येशील. कारण ओमकार् हे एकाक्षरी ब्रह्म अ उ म या त्रिमात्रिकेच्या पोटात गर्भवासात अडकले आहे. ओमकार हे वेदाचे बीज असून ते गीतेच्या विस्ताराने विस्तारले आहे. अथवा ही गीता म्हणजे जणू काय गायत्रीच ष्लोकरूपी फळांनी आणि फुलांनी बहरली आहे. म्हणून गायत्री मंत्राचे रहस्य विशद करीत असलेल्या गीतेची मी भक्तांना ओळख करून देतो. याप्रमाणे जो कुणी भक्तांची गीतेशी प्रेमाने भेट घडवून आणेल तो मद्रूपच होईल. (ज्ञा.18.1509 ते 1513)
आणि देहाचेंही लेणें। लेऊनि वेगळेपणें।
असे तंव जीवें प्राणें। तोचि पढिये।। ज्ञा.18.1514
ज्ञानियां कर्मठां तापसां। यया खुणेचिया माणुसा-।
मजीं तो एकु गा जैसा। पढिये मज।। ज्ञा.18.1515
तैसा भूतळीं आघवा। आन न देखे पंाडवा।
जो गीता सांगे मेळावा।भक्तजनांचा ।। ज्ञा.18.1516
मज ईश्वराचेनि लोभें। हे गीता पढतां अक्षोभें।
जो मंडन होय सभे। संताचिये।। ज्ञा.18.1517
आता ज्ञानोबाराय गीतेशी एकनिष्ठ बाळगून तिचा भक्तांमध्ये प्रसार करीत असलेल्या भक्तांचे वर्णन करीत आहेत. अशी व्यक्ती किती श्रेष्ठ असते आणि भगवंताला ती किती प्रिय असते हेही ते सांगत आहेत. ते म्हणतात षरीररूपी अलंकार घालून तो भगवंताहून वेगळîा रूपात वावरत असला तरी मला तो जीव प्राणाने आवडतो. ज्ञानी,कर्मठ व तापसी अशी जी माझी अंतरंग माणसे आहेत, त्यामध्ये गीता सांगणार एक फक्त मला आवडतो. जो भक्तजनांमध्ये गीता सांगतो तसा पृथ्वीतलावर मला दुसरा कोणी आवडत नाही. मी गीता सांगणारा आहे याचा कसलाही अभिमान न बाळगता, जो केवळ माझ्या लोभाने गीता सांगत असेल तर तो संतांच्या सभेचे भूषण ठरतो. यानंतरच्या ओव्यांमध्ये अनेक प्रतिमांच्याद्वारे ज्ञानोबाराय गीतेचे महŸव श्रोत्यांच्या आणि वाचकांच्या मनावर बिंबवतात. अशा वेळी त्यांची प्रतिभा बहरून येते. त्यांच्या विवेचनाला एक आवेग असतो. इतकेच नव्हे तर श्रीकृष्णाच्या मुखाने ज्ञानोबाराय सांगतात की, गीता सांगणारा आपल्याला जितका आवडतो तितका दुसरा कोणीही आवडत नाही. यास्तव मी त्याला माझ्या अंतःकरणात स्थान देतो. पुढील ओव्यांमधून (ज्ञा.18.152ष् ते 1528) ज्ञानोबाराय असे प्रतिपादन करतात की, श्रीकृष्ण आणि अर्जुनामधील या संवादाचे जो केवळ आवर्तन करेल, तोही भगवंताला संतुष्ट करतो. जे पुरूष गीतेच्या ज्ञानाचा आढावा घेतात आणि ज्ञानी म्हणून ज्या ठिकाणाला प्राप्त करतात, गीतेचे केवळ गायन करणाÚयासही तेच स्थान प्राप्त होते. गीता ही आई असून ती जाणते व अडाणी मूल यात भेदभाव करती नाही. आचार्य विनोबा भाव्यांनी गीतेला 'गीताई' म्हणून संबोधले असल्याचे स्मरण आपल्याला सहजपणे होते.
आता गीता पठणाने आणि श्रवणाने काय प्राप्त होते याचे वर्णन ज्ञानोबाराय करीत आहेत. ते म्हणतातः
आणि सर्वमार्गी निंदा। सांडूनिया आस्था पैं षुद्धा।
गीताश्रवणी श्रद्धा। उभारी जो।। ज्ञा.18.1529
तयाचां श्रवणपुटीं। गीतेची अक्षरें जंव पैठीं।
होतीना तंव उठाउठी। पळेची पाप।। ज्ञा.18.1530
परमार्थाच्या सर्व मार्गाची निंदा टाकून जो गीतच्या श्रवणाच्या ठिकाणी षुद्ध आस्थेन श्रद्धा ठेवतो, त्याच्या कानात गीतेची अक्षरे प्रविष्ट होतात न होतात तोच, अरण्याला वणवा लागला असताना प्राणी जसे पळून जातात तसे सृष्टीच्या आरंभापासूनचे पाप पळून जाते. गीतेचे जितके पाठ केले तितके अश्वमेघ यज्ञांचे पुण्य लाभते. स्वर्गाच्या राज्याचे ऐश्वर्य प्राप्त होते. स्वर्गभोग भोगून नंतर तो मद्रुप होतो.
अर्जुनावर गीताश्रवणाचा आणि गीतेचे जे माहात्म्य सांगितले आहे त्याचा कितपत परिणाम झाला आहे हे भगवंताना माहीत आहे, पण ते त्याच्या तोंडून ऐकण्याची त्यांची इच्छा आहे. यासाठी ते अर्जुनास खालील प्रमाणे प्रश्न विचारतातः
तरी सांग पां पांडवा। हा षास्त्रसिद्धांतु आघवा।
तुज एकचिŸों फावा। गेला आहे।। ज्ञा.18.15ष्0
आम्हीं जैसें जया रीती।उगाणिलें कानाचां हातीं।
येरी तैसेचि तुझां चिŸाीं। पैठें केले कीं।। ज्ञा.18.1541
अथवा माझारीं। गेलें सांडिविखुरी।
किंवा उपक्षेवरी। वाळूनि सांडिले।। ज्ञा.18.1542
जैसे आम्हीं सांगितले। तैसेंचि हृदयीं पावलें।
तरी सांग पां वहिले।पुसेन तें मी।। ज्ञा.18.1543
हां गा स्वाज्ञानजनितंे। मागीलें मोहें तूतें।
भूलविलें तो येथें। असें कीं नाहीं।। ज्ञा.18.1544
श्रीकृष्णांना आपल्या उपदेशाचा अर्जुनावर काय परिणाम झाला हे जसे समजून घ्यावयाचे आहे तसेच त्याच मोह आणि लोभ नष्ट होऊन तो आपले विहित कर्म करण्यास तयार आहे की नाही याची खात्रीही त्याच्याच मुखाने करून घ्यावयाची आहे. म्हणून ते विचारतात की, अर्जुना, मी सांगितलेला षास्त्रसिद्धांत तू एकाग्र चित्ताने श्रवण केल्यावर तो तुझ्या मनात ठसला किंवा नाही हे गीताशास्त्राचा कानांना हिशेब दिला, तसाच तो तुझ्या चित्तात बाणला की नाही? अथवा मधेच त्याची सांडलवंड झाली, किंवा अनादराने ते तू टाकून दिलेस? मी जसे सांगितले तसेच जर तुझ्या अंतःकरणापर्यत पोचले की नाही हे सांग बरे? आम्ही ज्याप्रकारे व जसे सांगितले तसेच तुझ्या अंतःकरणापर्यंत पोचले असेल तर मी विचारीन ते लवकर सांग. अज्ञानग्रस्त झाल्यामुळे तू भ्रमात पडून कर्तव्यापासून विन्मुख झाला होतास आणि मोहात पडला होतास. कर्म करणे किंवा न करणे हे आपल्या हातात आहे असे तुला वाटत होते. तुझा मोह नष्ट झाला आहे का?
अर्जुनाने मोहात पडून आपल्या कर्तव्यापासून विचलित होऊ नये आणि त्याने युद्धास तयार व्हावे, लढावे यासाठी श्रीकृष्णाने गीतेचे विवरण केले आहे. त्यामुळे आता अर्जुनाचे उŸार हाच गीतेचा हेतू होता हे आपल्याला माहीतच आहे. अर्जुन म्हणाला-
मग अर्जुन म्हणे काय देवो। पुसताति आवडे मोहो।
तरी तो सकुटुंब गेला जी ठावो। घेऊनि आपला।। ज्ञा.18.1558
गुंतलो होतो अर्जुनगुणें। तो मुक्त जालों तुझेपणे।
आतां पुसणें सांगणें। दोन्ही नाही।। ज्ञा.18.1563
मी तुझेनि प्रसादें। लाधलेनि आत्मबोधें।
मोहाचे तया कांदे। नेदीच उरो।। ज्ञा.18.1564
अर्जुन म्हणाला, तुझ्या अंतःकरणात मोह आहे का, असा प्रश्न तुम्ही विचारता काय? तो मोह अज्ञानासह आपल्या ठिकाणी परिवारासह गेला आहे. 'मी अर्जुन आहे' अशा देहबुद्धीत अडकलो होतो, तद्रुप होऊन ऐक्य पावलो व मुक्त झालो. तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने मी त्या मोहाचे मूळ जे अज्ञान ते आता मी राहू देणार नाही. आता तू जे सांगशील तेच मी करीन.
तरी आतां तुझी आज्ञा। सकळदेवाधिदेवराज्ञा।
करीन देई अनुज्ञा। भलतियेविषीं।। ज्ञा.18.1575
अर्जुनाच्या या उद्गाराने भगवान श्रीकृष्ण सुखाने नाचायला लागले.
आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की, ज्ञानोबारायांनी भगवद्गीतेची इतकी स्तुती का केली असावी? त्याचे कारण असे आहे की, गीता हे जीवनाचे षास्त्र आहे. गीतेमध्ये ज्ञान,कर्म,योग,भक्ती, त्रिगुण आणि गुणातीत होणे या सर्व बाबींचे विवरण आहे. संपूर्ण विश्वातील मानवी जीवनाला कलाटणी देण्याचे सामथ्र्य भगवद्गीतेच्या तत्वज्ञानात आहे, यावर ज्ञानोबारायांचा ठाम विश्वास आहे. शिवाय गीता प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखाने सांगितली गेली आहे. त्यामुळे तिचे मोल अनन्यसाधारण आहे. गीतेची ही प्रशस्ती वाचून अथवा श्रवण करून आपल्याला गीतेचे महत्व सहजपणे लक्षात येते. ती वाचून आणि ज्ञानोबारायांच्या प्रतिभेचे दर्शन झाल्यामुळे आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो.
सुभाष कि. देशपांडे,
बी. 603, आराध्य टॉवर्स,
न्यू पाईपलाईन रोड?
लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ,
घाटकोपर पूर्व, मुंबई 400077
भ्र.ध्व. 9421576069, 8830770906