२००७ साली माझ्या यजमानांना इंग्लंड मधील लंडन जवळील रिडिंग या शहरात कंपनीने पाठवले होते. तेथे आम्ही १ वर्षांसाठी वास्तव्यास होतो. तेथे माझी ओळख पोलंड येथील रहिवाशी असलेली "दानुता" शी झाली. तिला भारतीय भाज्या खूप आवडायच्या. ती एका सेव्हन स्टार हॉटेलमध्ये असिस्टंट शेफ म्हणून कामाला होती. ती स्वभावाने खूप शांत होती. तिला मी वांगी, भेंडी, चवळी अशा बऱ्याच भाज्या बनवायला शिकवल्या. काही दिवसांनी ती त्या भाज्या मला करून दाखवे. भारतीय संस्कृतीबद्दल तिला कुतूहल आणि आत्मीयता होती. मी तिने विचारलेल्या बऱ्याच गोष्टींचे स्पष्टीकरण तिला दिले जसे - भारतीय स्त्रिया कुंकू का लावतात, मंगळसूत्र का घालतात वगैरे.
डिसेंबर महिन्यात ख्रिसमस साठी ती तिच्या देशात पोलंडला गेली. पोलंडमध्ये तिची आई आणि आजी रहात होती. तिने त्या दोघींना माझ्याबद्दल सांगितले. तेथून येतांना ती खूप वस्तू घेऊन आली. तिच्या आजीने माझ्या मुलांसाठी खास सांताच्या आकाराचे चॉकलेट आणि माझ्यासाठी स्पेशल केक बनवून पाठवला होता. तो केक कोणत्यातरी खास बियांपासून बनवलेला आहे असे ती सांगत होती. आपल्याकडे जसे खसखस असते तशाच कसल्यातरी बिया! तो केक मी तिच्या समोरच खावा असा तिचा आग्रह होता. तिचे माझ्याबद्दलचे प्रेम, माया पाहून मलाही राहवले गेले नाही. मी एक तुकडा खाण्यास सुरुवात केली खरी, पण ती चव मला खूपच अनोळखी होती. तथापि तिच्या आजीने खास पोलंडहून प्रेमाने पाठवला असल्याने तो मी खाऊन टाकला. जेव्हा मी खात होते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे समाधान मी बघत होते!
जीवनात अनेक वेळा काही पदार्थ आपण फक्त कुणाच्या तरी चेहऱ्यावरचे समाधान बघण्यासाठी खात असतो. वाचकांनाही याचा अनुभव कधी ना कधी आला असेलच!
माझ्या व्यवसायाच्या शॉप समोर एक महिला वडापावची गाडी चालवते. ती माझी चांगली मैत्रीण झाली आहे. तिला मी वडापाव मैत्रीणच म्हणते. आता सध्या मी तेथे व्यवसाय चालवत नसले तरीही जेव्हा व्यवसाय सुरु होता ही माझी वडापाव मैत्रीण दर गुरुवारी माझ्यासाठी न चुकता मला साबुदाण्याची खिचडी घेऊन यायची. खरं तर गुरुवारचा उपवास तिचा असायचा पण ती मला दिल्याशिवाय तो खात नसे. मी पण आढेवेढे न घेता माझे जेवण झाल्यावर सुद्धा साबुदाणा खात असे कारण तिच्या चेहऱ्यावरचे समाधान मला जास्त मोलाचे वाटायचे.
मुले जेव्हा घरी पिझ्झा मागवतात तेव्हा मला खायचा आग्रह करतात. तेव्हा पिझ्झावरील मशरूम पाहून लहानपणीच्या गावाकडच्या पावसाळ्यातील खराब जागेवर उगवलेल्या कावळ्याच्या छत्रीची आठवण आवर्जून येते. ते बघून खायची इच्छा होत नाही. पण आपली आई आपल्याबरोबर आवडीने पिझ्झा खाते आहे याचे मुलांना वाटणारे समाधान बघण्यासाठी मी मशरूमसहित पिझ्झा आवडीने खाते.
केरळमधील पण सध्या पुण्यात असलेली माझी एक मैत्रीण ओणम तसेच अनेक सणानिमित्त मला बोलावते. तिच्या खोबरेल तेलात बनवलेल्या भाज्या मी आनंदाने खाते. कशाला काय म्हणतात, ते कसे बनवले ही तिची अखंड बडबड सुरु असते. सांबार, ईस्टू, शर्करा उपेरी, अप्पम, पालडा (खीर), मतन्ना (लाल भोपळा) वगैरे केळीच्या पानावर वाढलेले असते. मी आपले समोर येतील ते शहाण्या मुलीसारखे खात रहाते. हे पदार्थ मला केळीच्या पानावर ती वाढत असते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे समाधान काही औरच असते.
आठवडे बाजारात एक भाजीवाली आहे. ती मूळची माझ्या माहेर म्हणजे मालेगांव जवळील एका गावातली चंदनपूरीची आहे. मी एक दिवशी तिच्याजावळून कशाची तरी भाजी घेतली. माझ्या भाषेवरून तिने मला विचारले मी कोणत्या गावची आहे ते! मी तिला सांगितले मी मालेगांवची! तर तिला खूप आनंद झाला. आता दर आठवड्याला मी बाजारात जाते तेव्हा ती मला आवाज देऊन बोलावते आणि मी सुद्धा तिच्याकडूनच भाजी घेते. जी पण भाजी मी घेते त्यावर ती थोडी जास्त वरून मला देते. मी नको म्हणते तर ती मोठ्या मायेने मला म्हणते की तू माझ्या गाववाली आहे, तुला नाही तर कुणाला देणार गं! तिच्या मनाच्या समाधानासाठी मी जास्त भाजी ठेऊन घेते.
अशा काही अनुभवानंतर मी जेव्हा जेव्हा माहेरी जाते तेव्हा आईने माझ्यासाठी बनवलेल्या त्या सगळ्या भाज्या आईच्या समाधानासाठी आनंदाने खाते ज्या लग्नाआधी मी खायला नखरे करायची!
मायेच्या अन्नाचा प्रभावाच असा असतो, नाही का?
- मंजुषा सोनार, पुणे
sonar.manjusha@gmail.com