फोन: 8655778845
"ऐकलं का मामा, ही लांबच्या लांब रांग कसली म्हणायची? मी आताच गावच्या येष्टीने ह्या समोरच्या आगारात उतरलोय. तिथून सापशीडीच्या डावा परमाने खुनांनी बोर्ड रंगवल्यात ती बघत बघत हित पोचलो. हित कोणी पुढारी येणारे का ? की कोणी शायरुक, सलमान...." सदाभाऊ रांगेत उभ्या असलेल्या समोरच्या व्यक्तीला उत्सुकतेने विचारू लागले.
त्यावर समोरच्या व्यक्तीने पहिला प्रश्न विचारला!, "तुम्ही मुंबईचे दिसत नाही, पहिल्यांदा आलात का गणपतीत?"
"न्हाय न्हाय मागल्या सणाला आलतो. तवा चटदिशी आलो, अन पटदिशी वापीस गेलतो, आता हित शेजारच्या गल्लीत मित्राकड जायचं हाय, बाप्पाच्या दर्शनाला कवा पासन यायचं व्हत, मंग घेतली चार कापडं अन बसलो येष्टीत."
समोरची ती व्यक्ती कौतुकाने सगळं काही ऐकत होती, एक स्मितहास्य मात्र कायम होतं चेहऱ्यावर, कदाचित समोरच्याचा चेहरा वाचायची कला अवगत असणार. सदाच बोलणं थांबलं, आणि ती व्यक्ती त्याला सांगू लागली, "ही समोर पाहताय ना ती राजाची लाईन आहे, राजा म्हणजे आपला बाप्पा आणि इथला राजा, तुमचे मित्र नक्की राहतात कुठे? रस्ता चुकलात का, पत्ता असेल तर द्या मी तुम्हाला वाट दाखवतो!"
त्यावर सदाच उत्तर आलं, "पत्ता त्यो तर न्हाय! येक नंबर दिलता, त्यो बी आता हुडकावा लागेल या गाठूड्यात. फकस्त येष्टीतन उतरल्यावर डाव्या बाजूला सफेद बोर्ड दिसलं त्याच्या माग माग यायचं, त्यो बाप्पा घराकडं आनेल, हितकच बोलला बन्या. अन तसाच आलोया मी हित."
समोरच्या व्यक्तीने त्याच्या गोंधळलेल्या मनाला धीर दिला आणि बोलला, "ठीक आहे काळजी करू नका, आमचा राजा पोचवेल तुम्हाला मित्रा जवळ. या तुम्ही पण आलाय तर दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहा."
सदा भाऊ साठी सगळंच नवं नवं होतं त्यामुळे त्यांनी प्रश्नांची सरबत्ती चालू केली.
"हित येवढी गर्दी असते का ओ बाप्पाला बघायला, आमच्या इथं तर नेत्यांच्या भाषणाला न्हायतर पाण्याचा टँकर येतो तवा होती. आणि तिथं कोपऱ्यात सगळी काय मागतायत? आमच्यात जत्रेला गावातल्या बायका फुल नारळ घेऊन बसत्यात ती बी ओलीत...!"
समोरची व्यक्ती उतरली, "अहो बाप्पाला राजा म्हणतो आम्ही मग राजेशाही थाट नको का, हा आमचा आणि याच्या शेजारी आहे तो या पूर्ण शहराचा... आत मध्ये जाऊया तिथं तुम्हाला राजाचा राज महाल ही दिसेल, खूप सुबक आणि सुंदर कोरलाय त्याच्या भक्तांनी.... आणि ती पुढे गर्दी दिसतेय ना ती फुलं नारळासाठी नव्हे तिथे राजाच्या दरबारात लवकर जाण्यासाठी कुपन्स मिळतात, ते बसलेले द्वारपाल ते वीस पंचवीस रुपयांच्या दक्षिणेवर आपल्याला कुपन्स देतात. इथे कोणाला थांबायला वेळ नसतो ना मग ज्याला घाई आहे तो असा दक्षिणा देऊन जातो लगेच"
सदा पुढे बोलू लागला, "गावी आमच्यात एक गाव एक गणपती असं असतंय, त्याला तेवढी चार डोकी येत्यात अन राजा बिजा नसतो तिथं, गावात चार सालापासून दुष्काळ आहे, समद सुकलेय तवा राजा बी न्हाय रहायचा तिथं जास्त वेळ. गावच्या पाटील कडे तेव्हढा असतो गणपती त्यो बी वर्गनी मागून बसवत्यात चौकात. इथं भारीच हाय, एकदा बघतो राजाला, त्याला च पत्ता इचारतो अन!"
"हो हो, अजून बरंच आहे इथे, रात्री इथे रोषणाई असते, वेगवेगळे स्टॉल लागतात. लोक रात्र रात्र या बाप्पाच्या रस्त्यावर आरामात फिरू शकतात. इथूनच जवळ स्वयंभू गणेशाचे मंदिर आहे, तो नवसाला पावतो,मूर्ती लहान आहे, पण कीर्ती महान. लोक चार चार तास रांगेत उभे राहून त्याचे नवस फेडतात. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला इथे ही नवसाची स्पेशल लाईन दिसेल. बाप्पाला ही वाटत त्याच्या कडे भक्तांनी यावं म्हणून तो ही कारण देतो सगळ्यांना. नाहीतर वेळ कुठे आहे कोणाकडे जाण्या येण्यासाठी. आता तर परदेशी पाहुणे पण येतात राजाला पाहायला, तो बघा तिथे उंच आणि गोरा माणूस दिसतोय ना त्या कुपन्सच्या लाईन मध्ये. त्यालाही बोलावलं बाप्पाने "
त्यावर सदाभाऊ बोलले " व्हय व्हय त्यो का हाफ प्यांट वाला, राजाला बघायला असा कसा आला ह्यो पर, खुळी जनता दिसती हितली, अरे ह्यो दरवाजा इतका म्होटा. अन किती फुल टाकली हायेत रस्त्यात. लय म्होटा अन राजेशाही दरबार हाय बाबा तुमच्या राजाचा."
"हो, हळूहळू बापालाही ग्लोबल केलंय त्यामुळे थोडा लवाजमा तर व्हायला पाहिजे ना, या सगळ्याच इंशोरन्स पण काढतात माहिती आहे का तुम्हाला, राजाला किंवा त्याच्या दरबारात चुकून नुकसान झालं तर पुन्हा करता येत त्यात. आज मंगळवार आहे त्यामुळे गर्दी जरा जास्त च आहे, चांगला दिवस पाहून येतात सगळे भक्त. आम्ही मंडपाच्या शेजारीच राहतो आणि खिडकीतून सार काही पाहत ऐकत असतो, कधी कोण VIP आला की आम्हाला खिडकीतून बाप्पा सोबत त्याचे पण मुखदर्शन होते, नाहीतर आपण कुठे पाहणार समोरासमोर. रात्री महाप्रसादाला लांब लांबून आलेले भक्तगण थांबतात आणि दुसऱ्या दिवशी निघतात. देणगी आणि दान ही करतात बरेच जण, आपल्याला जमेल तस आणि ते, कोण रोख रक्कम, कोण प्रसाद, कोण सोन्याच्या वस्तु किंवा वह्या पुस्तक जस जमेल तस. आमच्या राजाच्या जीवावर बऱ्याच जणांची पोट अवलंबून आहेत त्यामुळे त्याच्याच कृपेने इथे भरभराट झाली आणि आमचा राजा ग्लोबल झाला आहे. कोल्हापुरात झालेल्या महापुरात राजाच्या भक्तांनी ही मदत केली, तेवढाच खारीचा वाटा अजून काय? राजा आपल्याला मोठं करणार आणि त्याला आपण मोठं करायचं, बघा पाहता पाहता आपण राजाच्या चरणाशी आलो, आपल्याला कळलेच नाही!"
भव्य राजच्या मूर्तीकडे सदा एक सेकंद पाहतच राहिला. तेव्हढ्यात शेजारून आवाज आला "चला पुढे चला पटापट, आगे बढो, आगे बढो.."
आणि सदा आणि ती व्यक्ती बाहेर आले. बाहेर येताच त्या अपरिचित माणसाने शेजारीच असलेल्या त्याच्या घरी नेलं, चहा नाष्टा दिला अन सदा तिथून निघाला, जाता जाता त्याने विचारले " तुमचं नाव काय म्हणला... पाव्हन? ती व्यक्ती बोलली, "गजानन विग्नहर्ते."
सदा खूप खुश होता, राजाचा थाट पाहून डोळे दिपले होते त्याचे, म्हणून मनापासून आभार मानून गेला, वरून खिडकीतून विग्नहर्ते पाहत होते, त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य अजून ही तसच होतं, तेवढ्यात एक माणूस सदाला भेटला, "मित्रा तू कुठे होतास घर मिळालं ना, निघालास कुठे हे बघ माझी मुलगी खेळतेय समोर...."
त्यावर सदाचा आवाज येत होता, "कुठं....परत चाललेलो गावी, राजाला पाहून, तुझं घर काय घावत नव्हतं, शेवटी ते शेजारी राहणारे गजानन विघ्नहर्त्याने मला इथे घरी बोलवले अन चाय देऊन पावनचार केला, अन तितक्यात तू हित भेटला. कोण गजानन? हित नाय रे कोण गजानन, तुला फशीवला कोणीतरी चल घरला...बायकोला मस्त तुपातला शिरा करायला सांगतो...चल चल."
नाव - जुईली अतितकर
पत्ता – ३०१, श्री रिद्धी सिद्धी धाम, प्लॉट नं – २१०/२१७, सेक्टर नं – १०, नवीन पनवेल.
संपर्क – ८६५५७७८८४५
इ मेल – juilyatitkar@yahoo.in