फोन: 9892715370

वृद्धाश्रम म्हटलं की काळजात धस् होतं, मनाला अनेक चरे पडतात. हल्ली वृद्धाश्रम हे एक फॅशन झालं आहे... मुलांना आई-वडील जड वाटू लागले. आई-वडील मुलांना वाढवण्यासाठी जीवाचा आटापिटा  करून रात्रं दिवस खस्ता खातात. तिच मुलं मोठी झाल्यावर त्यांना वृद्धाश्रमचा दरवाजा दाखवतात. हल्ली जागोजागी वृद्धाश्रम चालू केले आहेत. कित्येक आई-वडील रस्त्यावर भीक मागताना सुध्दा आढळतात. देश प्रगल्भ होत आहे, पण काही गोष्टी आहेत ज्या अजूनही तशाच आहेत. सुशिक्षित आणि सुसंस्कृत ह्या देशात अशा शर्मनाक गोष्टी घडत आहेत. गरज पडली तर यांना आई-वडील आठवतात आणि गरज सरली की ही मुलं त्यांना आश्रम मध्ये नेऊन सोडतात.

मनात विचार येतो वृद्धाश्रम जर नसते तर या मुलांनी आई-वडिलांना कुठे ठेवलं असते. त्यांना रस्त्यावर सोडलं असतं की आणखीन काही त्यांच्या बाबतीत पाऊल उचलले असते... काय केलं असतं त्या आई-वडिलांनी... कुठे गेले असते?  कुठे राहिले असते?  असे अनेक प्रश्न उपस्थित होतात...ही मुलं हा का विचार नाही करत की हीच परिस्थिती आपल्यावर येऊ शकते. पण तेवढी विचारशक्ती त्यांच्या मध्ये नसते, म्हणूनच ही मुलं अवैचारीक गोष्टी करतात. आपण आपल्या आईवडिलांचं काही देणं लागतो हे त्यांना  माहीत नसते. असं म्हणतात आपण कितीही काही केलं तरी आई-वडिलांचे पांग फेडू शकत नाही.

सुरुवातीला ज्यांनी आश्रम उघडलं त्यांचे कोटी कोटी आभार मानले पाहिजे.. त्यांच्यामुळे अनेकांना आधार मिळाला.एक राहतं घर मिळालं...नवी नाती मिळाली...मावळलेल्या आशा पुन्हा उजळू लागल्या.आनंदाने एकत्र राहू लागले... प्रत्येक जण तिकडे आनंदीत राहण्याचा प्रयत्न करत असतो... एकमेकांना सांभाळून, प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होवून, सगळे एकमेकांची मनं जपत असतात. वृद्धाश्रमात प्रत्येकाला काम वाटून दिलं जातं, आलटून पालटून कामे असतात. त्यामुळे सगळेच खुष असतात. कोणी कोणाची मनं दुखावत नाही आणि अगदीच कोणी दुखावले तर त्याची छान समजूत काढली जाते..

घरी आई-वडील नाराज झाले तर त्यांची कोणी मनधरणी नाही करत. ते बिचारे एकटेच अंधा-या खोलीत अश्रू गाळत बसलेले असतात.. कोणी त्यांना विचारत नसतं,त्यांची काळजी घेत नसतो. कसं त्यांना वाटत असेल.त्यांच्या मनात अनेक विचारांचं काहूर माजलेलं असतं. चित्रपटा सारखं मागच्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर तरळू लागतात. मुलाला देण्या पासून ते त्यांचं बोट पकडून त्यांना मोठं करे पर्यंतच्या गोष्टी डोळ्यासमोर येतात.

मुलं जेंव्हा लहान असतात तेंव्हा ते आई-वडिलांची खूप काळजी घेतात. पण जसजशी ती मोठी होतात तसं त्यांच्यातलं प्रेम, काळजी कमी होत जाते. पुढे ते कर्तबगार झाले की त्यांच्या लेखी आई-वडिलांना काही किंमत राहत नाही.. जेव्हा मुलं आई-वडिलांना विचारत नाही किंवा त्यांचं ऐकत नाही तेंव्हा त्यांची चिडचिड होते. मग सतत त्यांची बडबड,त्रागा चालू असतं. मग ह्या सगळ्यांना कंटाळून मुलं आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रम मध्ये ठेवतात. पण हि मुलं कधीच मनात विचार करत नाही की आपले आई-वडील असं का वागत असतील.. त्यामागचं काय कारण असेल. असा जराही विचार करत नाही आणि सरळ वृद्धाश्रम मध्ये नेवून ठेवतात. हे कितपत बरोबर आहे,हा त्यांच्यावरचा अन्याय नाही का? कशावरून उद्या यांची मुलं सुद्धा यांना वृद्धाश्रम मध्ये ठेवणार नाही. हे चक्र कायम असंच चालू राहणार आहे. हे कुठे तरी थांबवायला हवं,  नाहीतर माणूस सुखाने आयुष्य न जगता तो हाच विचार करत राहिल की पुढे आपला मुलगा किंवा मुलगी आपल्याला वृद्धाश्रम मध्ये नेवून ठेवणार. विचित्र आहे सगळं, पण बदल घडायला हवा. वृद्धिश्रमची भिती कमी व्हायला हवी...मुलांनी आई-वडिलांना समजून घेतलं पाहिजे...जसे आपले आई-वडील लहानपणी आपले हट्ट पुरवतात, तसंच काहीसं म्हातारपण असतं. आईवडिलांचा अधिकार असतो मुलां जवळ हट्ट करने आणि ते पुरवणं मुलांचं कर्तव्य असतं... असं जर घडत राहिलं तर नक्कीच वृद्धाश्रम बंद होतील आणि आई-वडील आपल्या सोबत आपल्याच घरी राहतील. नातवंडांना आजीआजोबा आणि आजीआजोबांना त्यांचे नातवंडे मिळतील. घराचं नंदनवन होत राहिल, सर्व सुखी आणि आनंदी राहू लागतील. नवे विचारांची सांगता करून वृद्धाश्रमला टाळा लावू...

प्रणाली कदम, मुंबई
kpranali47@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel