“माझ्या पानाशेजारी रुपल्या बसू दे.” सखाराम म्हणाला.
“आम्ही अशाने येणार नाही. तो नको आपल्या पंगतीत. तुम्ही का आम्हांला मुद्दाम हिणवता? मोठे समदर्शी आहात, ठाऊक आहे. आम्ही तुम्हांला सन्मानाने मेजवानी द्यायला निघाले तर त्या पोरट्याला जेवताना बरोबर घेऊन तुम्ही अपमान करणार?” एक पदवीधर म्हणाले.
“यात अपमान कसला? त्या मुलावर माझा लोभ आहे. मी त्याला शिकवतो. स्वच्छ खादीचा सदरा त्याच्या अंगात आहे. तो का घाणेरडा आहे? आपलेच हे सारे बांधव. देशात स्वराज्यासाठी लढे चालले आहेत आणि इकडे सुशिक्षित तरुण या मुलाला आपल्याजवळ जेवायला बसवायला तयार नाहीत! तुम्ही आधी जेवा...मी तुमच्या पंगतीला बसत नाही. मी रुपल्याला बरोबर घेऊन मग जेवेन. तुम्ही उच्च माणसे आधी बसा!”
शेवटी सखाराम व घना मागून बसले. इतर मंडळी आधी जेवून गेली. गणा, रुपल्या, वगैरे सखारामबरोबर जेवले.
सखाराम आणि घना दोघे बराच वेळ बोलत बसले. शेवटी गाडीची वेळ झाली. दोघे मित्र स्टेशनवर जायला निघाले. सामान नव्हतेच. पिशवी नि घोंगडी.
सुंदरपूर स्टेशनवर गर्दी होती. संध्याकाळच्या गाडीला नेहमीच गर्दी असे. गाडी आली. घना एका डब्यात चढला. त्याने जागा मिळवली. मागून सखाराम आत आला. इतक्यात रुपल्या, त्याचा बाप गणा तेथे आले.
“दादा हे घ्या फूल.” रुपल्या म्हणाला.
“गरिबांवर नजर ठेवा.” गणा म्हणाला.
“गणा, नजर देवाची, आपण एकमेकांना कोठवर पुरणार? तुझा रुपल्या मोठा होईल. तोही गिरणीत जाऊ लागेल. तुला काही कमी पडू देणार नाही. रुपल्या, गणाला जप.”
“आता तुम्ही परत कधी येणार? तुमची आम्हांला आठवण येईल. तुमच्याप्रमाणे मला कोण शिकवील? कोण चित्रांची पुस्तके देईल?” रुपल्या डोळ्यांत पाणी आणून म्हणाला.
“हा घना येथे आहे. तो तुला शिकवील. शहाणा हो. चांगला मुलगा हो.” सखाराम म्हणाला.
गाडी सुटायची वेळ होत आली. घनाकडे सखारामने भावनाभराने पाहिले.