“हो. त्यानेही ती संस्था सोडली. तो तेथेच गावात राहतो. त्याने कामगारांची संघटना आरंभली आहे. तो त्यांचे रात्री वर्ग घेतो. त्यांना बरोबर घेऊन स्वच्छता करायला जातो. संडासही त्याने स्वच्छ केले.- मी घरी येऊन बसलो. घना सेवेत रमला!”

“त्याच्या पत्रात काय आहे?”

“तो आजारी पडला आहे. त्याने मला बोलावले आहे. मी जाऊ का?”

“त्यांना आपल्याकडेच का नाही घेऊन येत? येथे त्यांना बरे वाटेल. घरचे जेवण मिळेल. तेथे तू जाऊन तरी काय, घरच्यासारखे सारे थोडेच करता येणार आहे? नाही का?”

“मी त्यांना कळवतो की, तुला येण्याइतपत बरे वाटत असेल तर हवापालट करायला येथे ये. नसेल येववततर कळव; म्हणजे मी तुला घ्यायला येतो.”

“लिही, असेच लिही.”

सखारामने त्याप्रमाणे पत्र लिहिले. एके दिवशी घनाचे‘मला बरे वाटते, मी येतो.’ असे पत्र आले. सखाराम व मालती दोघे स्टेशनवर गेली होती; आणि उंच, सडपातळ घना भोटला. दोघा मित्रांनी एकमेकांचे हात हातात घेतले.

“किती वाळलास तू!” सखाराम म्हणाला.

“आता टॉनिक देऊन मला परत पाठव.”

“ही माझी बहीण, मालती हिचे नाव. मी तुमच्याजवळ हिच्याविषयी बोलत असे. बाबांची हा फार लाडकी होती. आईचीही. आई गेल्यापासून ती दु:खी-कष्टी असते. आजच तिची कळी जरा खुलली आहे.”

“ती तशीच राहो. पुन्हा म्लान न होवो.” घना म्हणाला.

तिघे घरी आली. घनाला थकवा वाटत होता.

स्नान केलेस तर बरे वाटेल.” सखाराम म्हणाला.

“भाऊ, पाणी तापलेले आहे.” मालती म्हणाली.

घनाने स्नान केले. नंतर जेवण करून तो झोपला. किती तरी दिवसांनी आज त्याला शांत झोप लागली होती. तिसरे प्रहरी तो उठला. त्याच्या तोंडावर प्रसन्नता होती. थकवा जणू पार निघून गेला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel