असे गाणे झाले. काही कामगार-कार्यकर्त्यांची भाषणे झाली. कामगार भगिनी पार्वतीही काबुली फुटाण्याप्रमाणे बोलली. ती म्हणाली, “मरमर आम्ही मरतो, परंतु अंगावर या चिंध्या! लाखो वार कापड तेथे तयार होतो; परंतु आम्ही उघडी. सारा पापाचा बाजार. सुंदरदास पापाचा धनी आहे. तिकडे देवळे बांधतो; इकडे आम्हांला ठार करतो. हा कुठला दुनियेवेगळा धर्म? हा राक्षसांचा धर्म आहे. आपण संप करू, उपाशी राहू; परंतु हा अन्याय नाही सहन करायचा. सगळ्या गावाने आम्हांला पाठिंबा दिला पाहिजे. माझ्याजवळ द्यायला काय आहे? परंतु संपफंड सुरू केलात तर माझ्या बोटातील ही मुदी देईन. ही मुदी त्यांची आठवण! याच गिरणीत ते काम करीत होते. क्षयी होऊन मेले. परंतु मालकाने पोराबाळांना काही दिले का? ही मुदी उराशी बाळगून आहे, तीही मी देईन.”
टाळ्यांचा कडकडाट झाला.
आणि घनाने समारोप केला. तो म्हणाला, “मी सुंदरदासांची भेट घेणार आहे. पगारवाढ, कामगारांकडून पूर्वी रुपयामागे पैसा घेतलेली दहा वर्षांतील रक्कम परत मिळणे, अशा मागण्या मी करणार आहे. इतरही किरकोळ गोष्टी आहेत. परंतु या वस्तू मुख्य. मालक तयार होईल असे वाटत नाही. आपण संप करायचा ठरविले तर सर्वांना एकजुटीने वागले पाहिजे. एकदा संप पुकारल्यावर मी तुम्हांला मागे जाऊ देणार नाही. संपकाळात मदत म्हणून तुम्ही येत्या पगारास फंड द्या. तसेच एखादा उद्योग शिकून ठेवा. आपण रिकामे नाही बसता कामा. काही मिळवू तरच संप लढवू शकू. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची : सर्वांना शांतता राखायची. नागरिकांनी या न्याय्य लढ्यात सहकार्य द्यावे. आलीच आणीबाणीची वेळ तर आम्हांला मदत द्या. तुम्हा सर्वांचा संसार शेतकरी व कामगार यांच्यावर अवलंबून. कामगार गिरणीत न खपेल तर तुम्ही उघडे रहाल. तुमच्या अंगावर कपडे असतात. तुम्हाला अंथरुण, पाघरुण मिळते ते सारे कोठून येते? ती वस्त्रे, त्या चादरी, तुमच्याजवळ शेकडो जिभांनी बोलतील की आम्ही घामातून निर्माण झालो. श्रमणा-याच्या घामातून आमचा जन्म. परंतु तो श्रमणारा आज उघडा पडला आहे. जनतेजवळ कृतज्ञता असेल तर ते कामगारांची बाजू उचलून धरतील. कामगार सुखी तर जग सुखी, हे ध्यानात धरा.”
सभा मोठ्या उत्साहात संपली. सर्व गावात चर्चेचा एकच विषय होता संप होणार का?