लहान गावात लहानशी वार्ताही पटकन पसरते.
“काका, आतेला कोण बघायला येणार? आतेचे लग्न होणार?” जयंताने विचारले.
“जमले तर होईल.” सखाराम म्हणाला.
“काका, तुमचे लग्न कधी होणार? मी तुमचा हात बघू?”
“हातात काय बघायचे?”
“मला आहे माहीत. बघू तुमचा हात?”
“बघ.”
“तुमचे बायकोवर प्रेम नाही. तुम्हांला दहा मुले होतील. आणि काय बरे...”
“तुला कोणी शिकवले हात बघायला, जयंता?”
“आमच्या शाळेत मुले बघतात एकमेकांचे हात. असेच असते ना हातात? काका, आतेचे कधी होणार लग्न? मग बँड, लाडू, होय ना? वरातीत नळे, चंद्रज्योती!”
“आतेचे लग्न असे नाही व्हायचे.”
“मग कसे?”
“मुक्यामुक्याने. नुसत्या अक्षता टाकायच्या.”
“नाही काही.”
तिकडे आईने हाक मारली म्हणून जयंता गेला. सखारामही काही कामासाठी बाहेर जायला निघाला. परंतु दारात टपालवाला आला. त्याने एक पत्र दिले. ते त्या तरुणाचे पत्र होते. तो आज येणार होता. स्टेशनवर जायला हवे होते. त्याने घरात बातमी दिली. दादा बाजारात चांगली भाजी आणायला गेले. सखाराम स्टेशनवर गेला.
“माले, सुंदरसे पातळ नेस. कानात कुडी घाल. हातात सोन्याच्या बांगड्या घाल.” आई म्हणाली.
“आई, मी का प्रदर्शनाची वस्तू?”
“माझे ऐक. आईचे ऐक.”