“तुम्ही एकदा बहिणीला बघून तर घ्या.”

“अहो बघायची जरुरी नाही. शिकलेली असली आणि पैसे मिळत असले म्हणजे पास.”

“परंतु माझी बहीण तुम्हांलाही पाहील. ती शिकलेली, तुम्ही शिकलेले. एकमेकांनी एकमेकांस पाहून घ्यावे. एकमेकांजवळ बोलावे, आणि काय ते ठरवावे. पैशाचे पुढे पाहू.”

“ठीक तर. मी येईन. तुमचा पत्ता देऊन ठेवा. कधी येतो ते कळवीन. अच्छा. मला जायचे आहे. अपॉइन्टमेन्ट आहे. शहरात सारे टाइमशीर आसते. आणि मी फार रेग्युलर वागतो!”

सखाराम नमस्कार करून गेला. चे घरी आला. त्याने वडील भावाला, आईला सारी हकिगत सांगितली.

“हे बघ सखाराम, विलायतेला जाण्याआधी लग्न उरकून टाका. नाही तर तो तिकडून एखादी मड्डम आणायचा. आधी नका पैसे देऊ.” आई म्हणाली.

“आई, मला खरोखरच हे लग्न नको. दादाची थोडी-फार असलेली शिल्लक सारी जायची. कर्ज काढायचे. खरेच नको. मला कुठेतरी नोकरी करू दे. त्यात का काही वाईट आहे? वेळ येईल तेव्हा होईल लग्न.” मालती म्हणाली.

“आई मी दादाला मदत करीन. आता मी घरीच राहीन. वकिलीचा अभ्यास करीन. गहान ठेवले घर ते मी सोडवीन. मालतीचे लग्न होवो.” सखाराम म्हणाला.

मालतीला बघायला येणार अशी कुणकुण आजूबाजूला पसरली. जो तो कौतुकाने विचारी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel