“तुमची बहीण एकदम पसंत. सुंदर असून विनयी. परंतु इतके विनयी असून उद्या भागणार नाही. हसावे लागेल. शेकहँड करावे लागेल, कधी पेलासुद्धा थोडा तोंडाला लावावा लागेल. अपटुडेट राहावे लागेल. सवयीने जमेल त्यांना. बड्या सर्कलमध्ये एकदा वागायची सवय झाली की होईल सारे. अच्छा. मी जरा पडतो.” तो तरुण म्हणाला.

त्या खोलीतील अंथरुणावर ते पडले.

जयंत शाळेत गेला.

पारवीही झोपली.

दादा व सखाराम बोलत होते. त्यांना तो तरुण तिरस्करणीय वाटत होता.

वामकुक्षी झाल्यावर पुन्हा चहा आला. मालतीही तेथे बसली. मोकळ्याने बोलणे सुरू झाले. त्याने इंग्रजीतून प्रश्न विचारले. तिने टाइम्स वाचून दाखवला. खूष होऊन तो तरुण म्हणाला, “मी आहे का तुम्हांला पसंत? मला विचारा प्रश्न.”

“तुम्ही खादी वापराल का?” तिने प्रश्न केला.

“खादी वापरून साहेब कसे होता येईल? बडी नोकरी कशी मिळेल? मी नाही खादीच्या फंदात पडणार. ती नको तुम्हांला काळजी.”

“तुम्ही उद्या बडे अधिकारी झालात. समजा, देशात स्वातंत्र्याची चळवळ चालू असणारच. तुम्ही आपल्याच लोकांवर लाठी चालविणार का? गोळ्या झाडणार का?” तिने प्रश्न केला.

“राजनिष्ठा हा तर धर्म आहे. मी लाठीमाराचा, गोळीबाराचा हुकूम देईन तेव्हाच बढती मिळेल. मग मोटार घेऊ. तुम्ही तिच्यातून हिंडाल, राजाची जणू राणी व्हाल!”

“तुम्ही दारू पिता वाटते?”

“क्वचित घेतो. परंतु उद्या बडा अंमलदार झाल्यावर घ्यावीच लागेल. म्हणून सवय करीत आहे. आणि विलायतेतील थंड हवेत उद्या दारू न घेईन तर मरेन. थोडी दारू म्हणजे टॉनिक असे म्हणतात. पण या गोष्टी जाऊ देत. मी तुम्हांला पसंत आहे का? मी हडकुळा दिसलो तरी विलायतेत गेल्यावर लठ्ठ होईन. मी काळा असलो तरी तिकडे गेल्यावर गोरा होईन. सांगा.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel