सखाराम दोनचार दिवस झाले तरी घरी आला नाही. पुन्हा जगाचा मुशाफीर होऊन घर सोडून गेला की काय? आता आईचा पाश नव्हता, म्हणून का तो गेला? मालती समाधान मानायला शिकली होती. ते पत्र तसेच पडून होते. उत्तर कोण लिहिणार!
तिकडे घना पत्राची वाट पाहात होता. दोन दिवस झाले, चार दिवस झाले,--पत्र नाही. सखाराम वकिलीचा अभ्यास करीत होता. तो कसा येणार? का बहिणीचे लग्न ठरवायला कुठे गेला? घनासमोर मालतीची मूर्ती आली. तिच्याजवळ मी मोकळेपणाने बोलत असे. खेळत असे. तिची इकडे येण्याची इच्छा असावी. तिला सार्वजनिक सेवेची हौस असावी. तिचा कोडमारा होत आहे. सखारामच्या का हे लक्षात येत नाही? परंतु मी तरी एकदम काय म्हणू? आणि मला ना घर, ना दार. आज तुरुंग, तर उद्या गोळी. मालती सुखी असू दे. एकच वेळ, फक्त एकच वेळ तिने भरलेल्या डोळ्यांनी मजकडे पाहिले होते. त्या बघण्यातील अर्थ कोणाला कळणार, कोणाला समजणार? मी मालतीला पत्र लिहू का? सखाराम घरी नसेल, पत्र कोणी फोडले नसेल. लिहू मालतीला पत्र? परंतु काय लिहू? प्रिय लिहू की चिरंजीव लिहू? प्रिय लिहिले म्हणून काय झाले? तो शब्द आता रूढ झाला आहे. त्या शब्दात अधिक अर्थ आता कोणी पहात नाहीत. त्याने पत्र लिहिले.
प्रिय मालती,
सप्रेम प्रणाम,
प्रिय सखाराम का तेथे नाही? तुम्ही दोघे येथे याल का, म्हणून त्या पत्रात मी विचारले होते. येथे परवापासून संप सुरू होईल. कामगारांत उत्साह आहे. परंतु मला लवकरच अटक होईल असे कळते.
सखाराम आला तर तो नेतृत्व घेईल. तुम्हीही आलात तर स्त्रियांत उत्साह येईल. तुम्ही म्हणाला होता, मला नाही का काही काम करता येणार! देवाने काम वाढून ठेवले आहे. ते ताट लोटू नका. नेहमीच अशी संधी येत नसते. जीवनात क्रांती करणारे हे क्षण असतात. जीवनातील नवीन दालने उघडतात. आपण अकस्मात उंच जातो. जणू चंद्र-सूर्य-ता-यांबरोबर बोलू लागतो. खरे ना?
बघा विचार करून कळवा. निदान सखाराम येथे नाही, तो येताच विचार करून काय ते कळवू, असे उत्तर तरी लिहा.
सर्वांस स.प्र.
तुमची वैनी आली का? जयंता, पारवी यांच्या गमती तुम्ही सांगत असा. ती मुले जवळ नसल्यामुळे तुम्हांला करमत नसेल. घर सुने सुने वाटत असेल. मुले म्हणजे घराची शोभा. असो.
तुमच्या पत्राची वाट पाहात आहे.
घना.