परंतु सखाराम शांत झाला. तो घर सोडून गेला तेव्हा मालती आठदहा वर्षांची होती. परंतु आता ती अठरा-वीस वर्षांची होती. तिला सारे कळू लागले होते. त्या तुमची बहिणीचे वडलांनी लहानपणीच लग्न केले. आणि पुढे तर सारे दु:खच झाले. या बहिणीला शिकवायचे असे दादांनी ठरवले होते. सखारामही घरी असताना पूर्वी म्हणायचा की मालतीला खूप शिकवू आपण. वडलांनी विरोध केला असता. परंतु ते अकस्मात देवाघरी गेले. आईने त्या दिवसापासून हाय घेतली होती. परंतु दु:खावर काळासारखे औषध नाही. आईचे मन हळूहळू शांत झाले. पुढे सखाराम घर सोडून गेल्यावर पुन्हा तिला धक्का बसला होता. तो घरी यावा म्हणून ता जप करी. आणि देव जणू प्रसन्न झाला. मुलगा बारा वर्षांनी घरी आला.
सखाराम आल्याने घरात अलीकडे प्रसन्नता होती. दादा एका दुकानात नोकरीला जात असे. ते लहानसा वाडा त्यांचाच पिढीजात होता. घरापाठीमागे विहीर होती. तेथे एक पेरूचे झाड होते. ताईला आपण एकदा पेरू वरून टाकले नाहीत म्हणून ती कशी रागावली, ती लहानपणची आठवण सखारामला आली.
“भाऊ, हे चंदनाचे झाड. हे ताईच्या हातचे, ती त्याला पाणी घालायची. मी मेल्यावर हे झाड माझी आठवण देईल, असे म्हणायची. मरायच्या दिवशीही म्हणाली, माड्याला पाणी घातलेस का?” मालती गहिवरून सांगत होती.
सखाराम त्या चंदनाच्या झाडाकडे बघत बसे. जणू ताईचा आत्मा त्या झाडाच्या रूपाने तेथे उभा होता.
वैनीची दोन मुले ही सखारामची करमणूक होती. जयंता सहा-सात वर्षांची होता आणि पारवी तीन वर्षांची. दोनच मुले. ती घरी आलेल्या काकांच्या भोवती भोवती असत.
“तुम्ही आमचे काका? इतके दिवस कुठे होतेत?” जयंता विचारायचा.
“जमतीत होते. होय ना काका?” पारवी डोळे मिचकावीत म्हणायची.
सखाराम त्यांना गोष्टी सांगायचा, गाणी शिकवायचा.