“संप करून लढा लढवला. परंतु ते चालायचेच. तुमची काही धोरणे मला पसंत पडत नसली तरी तुमच्यात काही चांगुलपणा आहे. त्या चांगुलपणाला प्रणाम करायला मी आलो आहे. तुम्ही उदार आहात. ज्ञानोपासक आहात. तुमचे औदार्य कामगारांकडे वळत नाही ते निराळे. मंदिर बांधण्याऐवजी चाळी बांधतेत तर अधिक प्रभुसेवा झाली असती, असे मला वाटते. असो. येतो, -- नमस्कार.”

“नमस्कार.”

गाडीची वेळ झाली. आज रविवार. सुट्टी. स्टेशनवर चिक्कार गर्दी होती. गाडी सजवण्यात आली होती. ‘नवभारताचे नवीन साहस’, ‘साहसात संपत्ती’, अशी ब्रिदवाक्ये झळकत होती. जयघोष होत होते. भेटीगाठी होत होत्या. कोणाच्या डोळ्यांतून अश्रूही आले.

निघाली गाडी. हळूहळू सुंदरपूर, ती नदी, ती टेकडी, तो घाट, ती मंदिरे, ती गिरणी, ती संस्कृतिमंदिर संस्था, -- सारे दूर राहिले. जाणारे लोक नमस्कार करीत होते. जन्मभूमीला सोडून ते जात होते. सारा भारत जणू त्यांची जन्मभूमी. जातील तेथे त्यांचे घर.


गाडीत उत्साह होता. गाणी-पोवाडे चालत. घना गोष्टी सांगे. बायकांनीही गाणी म्हटली. मौज आली.

आणि ते स्टेशन आले. तेथे उतरायचे होते. येथून त्या वसाहतीकडे जायचा रस्ता. काही बैलगाड्या आल्या होत्या. एक-दोन लॉ-यांतून माणसे बसली. खेप करून लॉ-या पुन्हा येणार होत्या.

सखारामने घनाला हृदयाशी धरले.

दोघे मित्र क्षणभर बोलले नाहीत.

“मालती कोठे आहे?” घनाने विचारले.

“दोन दिवस झाले तिला ताप येत आहे. फार काम करी. तिने गुलाब लावले होते. तू येईपर्यंत एक तरी फूल फुलेल अशी तिला आशा होती; परंतु कळी आली ती अजून फुललीच नाही.”

रामदास, बाबू वगैरे भेटले. कुतुब, लाला हेही भेटले.

तिकडे वसाहतीत स्वागताची तयारी होती. आलेल्या लोकांना ओवाळण्यात आले. त्यांच्यासाठी जेवण तयार होते. लॉ-या पुन्हा गेल्या. पुन्हा माणसे घेऊन आल्या. माणसे येत होती; तसतशी जेवत होती. आज कामाला रजा होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel