Bookstruck

अपेक्षा 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मालतीच्या नावाने कधी पत्र येत नसे. तिला नव्हत्या मैत्रिणी, नव्हत्या बहिणी. आज तिच्या नावे पत्र आले. तिने धावत जाऊन घेतले. त्यांचेच पत्र मला आले! हो, मला, भाऊच्या पत्राची वाट पाहून निराश होऊन बहुधा त्यांनी  मला लिहिले असावे. काय बरे त्यांनी लिहिले असेल! दोनच ओळी असतील की काही भावमधुरता असेल? परंतु ही कामाची माणसे. त्यांना इकडे तिकडे पाहायला वेळ कुठे होत असेल? हे असे लोक सारखे काम लावून न घेतील तर ते उबगतील, कंटाळतील.

तिने पत्र फोडून वाचले. एकदा, दोनदा, तीनदा वाचले. जीवनात क्रांती करणारे क्षण! खरेच का माझ्या जीवनात क्रांती होईल? घरातून बाहेर न पडणारी कामगारांच्या सभेत बोलेल, त्यांच्या चाळीतून हिंडेल, त्यांना धीर दईल. ही का क्रांती नव्हे? परंतु क्रांती एकांगी नसते. खरी क्रांती सर्वांगपूर्ण असते. हे क्षण घनश्यामांच्याही जीवनात नाही का उलथापालथ करणार?

ती विचार करीत होती. माझ्या जीवनात क्रांती झाली तर त्यांच्याही जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही.

सायंकाळी सखाराम आला.

“भाऊ, किती रे दिवस?” तिने विचारले.

“अग मी आजारी पडलो. आता बरा आहे. तुम्हांला काळजी वाटू नये म्हणून कळवले नाही.”

“परंतु काळजी वाटायची थोडीच राहिली? दादा काल सायंकाळी जेवलाही नाही. त्याला वाटले की तू पुन्हा कुठे गेलास! दादाचे आपणा सर्वांवर फार प्रेम. दादावर आपला भार पडतो असे तुला-मला वाटते म्हणून तो दु:खी असतो. मला म्हणाला, ‘माले, शिवणकाम नाही केलेस तरी चालेल.’ मी म्हटले, ‘दादा वेळ जावा, हा मुख्य उद्देश हो.’ भाऊ, तुझ्या त्या मित्राचे पत्र आले आहे. उद्या का परवापासूनच संप सुरू व्हायचा आहे. कदाचित सुरू झालाही असेल. माझ्या पत्रात तसे आहे. आपल्याला त्यांनी बोलावले आहे. जायचे का? ते वाट पहात असतील! तूच त्यांना उद्या काय ते लिही. तू गेलास तर मीही येईन.”

सखारामने पत्र वाचले. विचार करीत तो फे-या घालीत होता. तिकडे मालती स्वयंपाकात होती. तो तिला मदत करायला गेला. दोघे भावंडे बोलत होती.हात आहे.

« PreviousChapter ListNext »