“दिवसभर श्रमणारा कामगार महिन्यातून दोनचारदा सिनेमा पाहायला गेला तर ती का चैन? आणि सारेच कामगार काही दारू नाही पीत. सारेच जुगार नाही खेळत. गरिबांच्या दु:खावर डाग नका देऊ. तुम्हांला त्यांच्याविषयी किती आपलेपणा वाटतो ते माहीत आहे. त्या पार्वतीचा नवरा क्षयाने मेला. काही दिलेत का तिला? तुमच्या कारखान्यात झिजून तो मेला.”

“तसा का करार आहे?”

“हृदयाचा धर्म म्हणून काही आहे की नाही? म्हणे त्यांना काम देऊन आम्ही उपकार करतो! पन्नास-साठ पैसे देता आणि वीस-तीस रुपयांचा माल त्यांच्याकडून निर्माण करून घेता. पन्नास पैसे देता तर काम रुपयाचे घ्या. परंतु काम घेता वीस रुपयांचे — हातावर ठेवता पन्नास पैसे! सारा चोरांचा बाजार!”

इतक्यात सुंदरदास तेथे आले. व्यवस्थापक उभे राहिले. घनाही उभा राहिला. त्याने नमस्कार केला.

“कशाला चोराला नमस्कार?” सुंदरदास हसून म्हणाले.

“इतर चोरांपेक्षा तुम्ही बरे. कसले व्यसन तरी तुम्हाला नाही. संस्कृतीची, ज्ञानाची तुम्हांला आवड आहे. दानधर्मही करता. तुमचे मुख्य पाप एकच की, जो तुमच्या हातात ही संपत्ती देतो त्याच्याशी तुम्ही कृतघ्नपणे वागता.”

“त्यांना पगार देतो.”

“तो त्यांना पुरत नाही.”

“त्यांनी सोडून जावे. दुसरे कामगार यायला तयार आहेत.”

“हे बोलणे विसरा. असे बोलण्याचे दिवस गेले. कामगारांचे युग येत आहे. जगात क्रांती होत आहे. या देशात रक्तपात व्हायला नको असतील तर जरा विवेकाने बोला. मी तुमच्याजवळ मुख्यत: दोन मागण्या करायला आलो आहे. (१) पगारवाढ; (२) तुम्ही संस्कृतीमंदिरासाठी कामगारांच्या पगारातून मागे कित्येक वर्षे घेतलेला आहे—तो सारा पैसा सव्याज परत करा. त्यातून कामगारांसाठी चाळी बांधू. सहकारी संस्था चालवू. दरसाल तुम्ही पैसे घेतलेत. जवळजवळ लाखभर घेतलेत. पुढे तुम्ही ती प्रथा बंद केलीत. या लाखाचे गेल्या १५ वर्षांतील व्याज काय होईल?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel