तिच्या त्या बांगड्यांचा लिलाव करण्यात आला. गावातील एका श्रीमंत तरुणाने त्या विकत घेतल्या. पाचशे रुपये त्याने दिले.

सभेत इतरांनी आणखी मदत दिली.

मोठ्या उत्साहात सभा संपली.

मालकाचे हस्तक कामगारांत फूट पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते. खेड्यापाड्यांतून बेकार लोकांना आमिषे दाखवून त्यांची भरती करण्याची पराकाष्ठा करण्यात येत होती. परंतु तादृश फळ दिसेना. मालती नि सखाराम चाळीचाळींतून हिंडत. कोणाला काय पाहिजे याची चैकशी करीत.

ती पाहा एक मुलगी. तिचे पोलके फाटले आहे. मालती थांबली.

“थांब, तुझे पोलके शिवून देते.” ती म्हणाली आणि खिशातून तिने सुईदोरा काढला. ते पोलके शिवून तिने दिले. तिच्याभोवती बायका गोळा झाल्या. तिच्याजवळ सुखदु:खे सांगू लागल्या. मालतीला त्या बारा क्षारांची माहिती होती. होमिओपाथीचा घरी बसल्याबसल्या तिने अभ्यात केला होता. ती म्हणाली, “मी माझी पेटी उद्या घेऊन येईन. या मुलांना औषध देईन. गोड औषध.”

तिकडे सखाराम केरसुणी घेऊन झाडू लागला. चाळीतील मुलेही मदतीला आली.

“तुम्ही घनाभाऊंचे मित्र शोभता!” म्हातारा मल्हारी म्हणाला.

“घनाभाऊने येथले संडास साफ केले होते. आम्ही नुसते पाहात होतो.” मार्तमड म्हणाला.

“त्यांच्या खटल्याचे काय होणार?” हरीने विचारले.

“मी आज त्यांना भेटायला जाणार आहे.” सखाराम म्हणाला.

मालती नि सखाराम आतल्या खोलीत आली. तेथे घनाचा चरखा होता. ती सूत कातत बसली. परंतु स्वयंपाक करायला हवा होता. घना हातानेच करून जेवत असे. तिकडे लॉकपमध्ये खाणावळीतील डबा त्याला पाठवण्यात येत असे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel